भारताचा सध्याचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली दमदार फॉर्मात आहे. पाकविरुद्धच्या नाबाद खेळीनंतर कोहलीचे सर्व स्तरांतून कौतुक केले गेले. भारताचा बुधवारी बांगलादेशविरुद्ध सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी ‘करो या मरो’ अशी परिस्थिती असणाऱया या सामन्यासाठी विराटने नेट्समध्ये भरपूर घाम गाळला. कोहलीने यावेळी नेटमध्ये एका खास फटक्याची तयारी केली. संघाचे संचालक रवि शास्त्री यांच्या देखरेखीखाली विराटने ‘रिव्हर्स पॅडल स्वीप’ खेळण्याचा सराव केला. (FULL COVERAGE || FIXTURES || PHOTOS)
क्रीकेटच्या मैदानात ‘रिव्हर्स पॅडल स्वीप’ हा फटका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आणला होता. फिरकी गोलंदाजी खेळताना सचिन लिलया हा फटका खेळत असे. कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी नेटमध्ये सचिनचा हाच फटका खेळण्याचा सराव केला.
दरम्यान, पाकविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकल्यानंतर कोहलीने सचिनच्या दिशेने अभिवादन करून आपले अर्धशतक सचिनला समर्पित केले होते. सचिन तेंडुलकर आपला आदर्श असल्याचे कोहली वेळोवेळी सांगत आला आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या खेळाडूच्या फटक्याचा सराव करून विराट पुन्हा चाहत्यांचे मन जिंकणार का? हे पाहणे महत्त्वाच असणार आहे.
