भारत-पाकिस्तान सामन्याचे औचित्य साधून क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालतर्फे (कॅब) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते दोन्ही देशांतील मान्यवरांचे खास सत्कार करण्यात आले. यामध्ये भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांच्यासहीत पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान, वसिम अक्रम, इंजमाम उल हक आणि वकार युनूस यांचा समावेश होता. सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. (Full Coverage|| Fixtures||Photos)
२०१२मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळीसुद्धा अशा प्रकारे दिग्गज खेळाडूंच्या सत्काराची योजना आखण्यात आली होती. ‘‘पाकिस्तानी क्रिकेटमधील दिग्गज मंडळी व्यासपीठावर आहेत, हा अतिशय चांगला योग आहे. हा सामना रंगतदार होईल, अशी आशा आहे. चला सर्वानी क्रिकेटचा आनंद लुटूया,’’ असे सचिनने या वेळी सांगितले. तर इम्रान म्हणाले, ‘‘ईडन गार्डन्सवरील शेवटच्या सामन्यातील निकालच अपेक्षित आहे.’’
अमिताभ यांनी आपल्या भाषणात आधी कोलकातावासीयांशी बंगाली भाषेत संवाद साधला. ‘‘जो संघ सर्वोत्तम खेळेल, तो जिंकेल,’’ असे त्यांनी पुढे सांगितले. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘‘भारत-पाकिस्तान सामन्याप्रमाणेच विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचेसुद्धा आम्ही यशस्वीपणे यजमानपद सांभाळू.’’