वेस्ट इंडीजचा क्रिकेटर ख्रिस गेल कधी आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे तर कधी वेगळ्याच कारणासाठी चर्चेत असतो. दिलखुलास स्वभावाचा ख्रिस गेल त्याच्या याच स्वभावासाठी ओळखला जातो. त्यामुळे सामना सुरू असताना गेलची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. आताही तसंच झालंय. यावेळी ख्रिस गेलनं ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेविड वॉर्नरचीच मस्करी केली. वॉर्नर मैदानावर फलंदाजी करत असताना गेलने थेट त्याच्या खिशात हात घातला आणि काही क्षणात हा फोटो व्हायरल झाला.

“गेल वॉर्नरच्या खिशात सँड पेपर तपासत आहे का?”

गेलने वॉर्नरच्या खिशात हात घातल्यानंतर काही वेळातच हा फोटो तुफान व्हायरल झाला. इंग्लंड क्रिकेट संघाच्या फॅन क्लबने देखील हा फोटो ट्वीट करत वॉर्नरला खोचक टोला लगावला. त्यांनी हा फोटो पोस्ट करत म्हटलं, “ख्रिस गेल वॉर्नरच्या खिशात सँड पेपर आहे की नाही हे तपासत आहे का?” असं म्हणत इंग्लड क्रिकेट चाहत्यांनी एशेस मालिकेच्या आधी वॉर्नरवर निशाणा साधलाय. २०१८ मध्ये वॉर्नरवर बॉल टेंपरिंगचे गंभीर आरोप झाले होते. त्यावरूनच इंग्लंड क्रिकेट फॅन क्लबने हे ट्वीट केलं.

ख्रिस गेलनं या सामन्यात षटकार ठोकत १५ धावा केल्या. या सामन्यात गेलनं गोलंदाजी केली आणि एक विकेटही घेतली.

ख्रिस गेलकडून निवृत्तीचे संकेत

यूनिवर्स बॉस ख्रिस गेलनेही निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी त्यालाही स्टँडिग ओवेशन दिलं. डावखुऱ्या ख्रिस गेलने आपल्या साथीदार आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारलं. तसेच बॅट वर करून प्रेमपूर्वक स्वीकार केला. यामुळे आता ख्रिस गेलही निवृत्ती घेणार, असं सांगितलं जात आहे. मात्र अजूनही ख्रिस गेलने अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केलेली नाही.

दोन वेळा टी २० विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा ख्रिस गेल सदस्य होता. ख्रिस गेलने वेस्ट इंडिजसाठी ७९ टी २० सामने खेळला आहे. या दरम्यान त्याने १,८९९ धावा केल्या आहेत. गेलने टी २० सामन्यात २ शतकं आणि १४ अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच १९ गडी बाद केले आहेत.