भारताविरुद्धच्या सामन्यात तमाम भारतीय क्रिकेट चाहते अफगाणिस्तानच्या पराभवाचं सेलिब्रेशन करत होते. पण आज तेच चाहते त्याच अफगाणिस्तानचा विजय व्हावा, यासाठी मनोकामना करत आहेत. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये आज सामना होणार असून या सामन्यात जर अफगाणिस्तान विजयी झालं, तर न्यूझीलंड गुणतालिकेत खालच्या स्थानावर जाईल आणि भारताच्या सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा जिवंत राहतील. त्यामुळे आज आख्खा भारत देश अफगाणिस्तानच्या पाठिशी आपल्या शुभेच्छा घेऊन उभा आहे. मात्र, अफगाणिस्तानचा विजय जसा भारतासाठी फायदेशीर ठरू शकतो, तसाच तो भारतासाठी त्रासदायक देखील ठरू शकतो!
गुणतालिकेचा विचार करता दुसऱ्या गटामध्ये पाकिस्तान ८ अकांसह सर्वात वरच्या स्थानावर आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. पण दुसऱ्या स्थानासाठी खरी रस्सीखेच आहे. सध्या न्यूझीलंड ६ गुण आणि १.२७७ च्या नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारत ४ सामन्यांमध्ये ४ गुणांसह १.६१९ नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. आणि अफगाणिस्तान ४ सामन्यांमध्ये ४ गुणांसह १.४८१ नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे.
संघ | सामने | गुण | नेट रनरेट |
पाकिस्तान | ४ | ८ | १.०६५ |
न्यूझीलंड | ४ | ६ | १.२७७ |
भारत | ४ | ४ | १.६१९ |
अफगाणिस्तान | ४ | ४ | १.४८१ |
जर न्यूझीलंडचा संघ जिंकला तर…
पण खरी गोम या आकडेवारीमध्येच आहे. जर आजच्या सामन्यात न्यूझीलंडनं विजय मिळवला, तर न्यूझीलंड ८ गुणांसह थेट सेमीफायनलमध्ये पोहोचेल. भारताला न्यूझीलंडचा पराभव हवा आहे जेणेकरून त्यांचे गुण सहाच राहतील आणि नामिबियाविरुद्धच्या सामन्यात जिंकून भारताला त्यांच्या गुणांशी बरोबरी करता येईल.
जर अफगाणिस्तानचा संघ जिंकला तर..
अफगाणिस्तानचा विजय झाल्यास न्यूझीलंडचे गुण सहाच राहतील. त्यामुळे सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातून ज्या संघाचा नेट रनरेट जास्त असेल, तो संघ यशस्वी ठरेल.
जर अफगाणिस्ताननं मोठ्या फरकानं सामना जिंकला तर..
पण या सगळ्या आकडेमोडीमध्ये जर अफगाणिस्ताननं आजचा सामना मोठ्या फरकानं जिंकला, तर मात्र भारतासाठी ती डोकेदुखी ठरेल. कारण भारत आणि अफगाणिस्तान यांच्या नेट रनरेटमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे अफगाणिस्ताननं आज मोठा विजय मिळवत नेट रनरेट वाढवला, तर भारताला सोमवारी नामिबियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याहून मोठा विजय मिळवावा लागेल. तेव्हा कुठे आपले गुण अफगाणिस्तानएवढेच असले, तरी नेट रनरेटच्या जोरावर भारत सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.
मात्र, आज अफगाणिस्ताननं मोठ्या फरकाने विजय मिळवला आणि सोमवारी नामिबियाविरुद्ध भारत पराभूत झाल्यास किंवा विजय मिळवूनही नेट रनरेटच्या बाबतीत अफगाणिस्तानपेक्षा कमी पडल्यास मात्र भारताऐवजी अफगाणिस्तान सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकतो!