Sam Altman On Use Of AI In Cancer Treatmen: ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांचा असा विश्वास आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता मानवजातीसमोर असलेले सर्वात कठीण आव्हान, कर्करोग बरा करण्यास मदत करू शकते. अ‍ॅबंडंट इंटेलिजेंस नावाच्या ब्लॉग पोस्टमध्ये ऑल्टमन म्हणाले की, १० गिगावॅट संगणकीय शक्तीसह एआय वैद्यकीय क्षेत्रात प्रगती करू शकते, ज्यामध्ये प्रगत कर्करोग उपचार आणि विद्यार्थ्यांसाठीचे पर्सनल एज्युकेशन टूल्स यांचा समावेश आहे. ते म्हणाले, जर “एआयची याच वेगाने प्रगती झाली तर”, कर्करोग कसा बरा करायचा हे ते शोधू शकते.

हे साध्य करण्यासाठी, ओपनएआयने “१०-गीगावॅट चॅलेंज” निश्चित केले आहे, ज्याचे उद्दिष्ट दर आठवड्याला एक गिगावॅट एआय क्षमता वाढवणाऱ्या सुविधा निर्माण करणे आहे. “जर एआय आपल्याला वाटते त्या वेगाने प्रगती करत राहिले तर, आश्चर्यकारक गोष्टीही शक्य होतील”, असे त्यांनी लिहिले.

ही योजना ओपनएआय आणि एनव्हीडिया यांच्यातील भागीदारीत होणार आहे, ज्याचे त्यांनी इतिहासातील सर्वात मोठा एआय पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून वर्णन केले आहे. एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग म्हणाले, “आम्ही प्रत्येक अ‍ॅप्लिकेशन आणि प्रत्येक उपकरणाला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देणार आहोत.”

कर्करोग तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, कर्करोगाचे शेकडो प्रकार आणि त्यातील गुंतागुंत लक्षात घेता, त्यावर कायमचा उपचार अजूनही दूर आहे. तरीही, गुगल डीपमाइंडच्या अल्फाफोल्ड सारख्या एआय टूल्समुळे औषध शोधात गती मिळाली आहे.

ऑल्टमन यांचे व्हिजन हे अधोरेखित करते की, संगणकीय क्षमतेचे वाढते प्रमाण वैद्यकीय विज्ञानाच्या कक्षा कशा वाढवू शकते. आरोग्यसेवेच्या पलीकडे, ऑल्टमन यांनी एआयला एक संभाव्य मानवी हक्क म्हणून मांडले असून, म्हटले की अंतिम उद्दिष्ट अशा पायाभूत सुविधा निर्माण करणे आहे, ज्या शिक्षणापासून ते जीव वाचवणाऱ्या आरोग्य उपक्रमांपर्यंतच्या विविध क्षेत्रांत लाभ देऊ शकतील.