Artificial Intelligence : AI अर्थात आर्टिफिशिय इंटेलिजन्सची चर्चा कायमच होत असते. या तंत्रज्ञानानुसार येत्या काळात काय बदल होतील ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान बृहन्मुंबई मराठी मंडळाने एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये दोन एआयचा संवाद कसा रंगला त्याचा एक छोटा व्हिडीओच पोस्ट करण्यात आला आहे. गिबरलिंक या आवाजी संकेतांवर भाषेत या दोघांनी संवाद सुरु केला.
एआयने अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी केल्या आहेत शक्य
एआय एकदम भन्नाट आहे. आजवर आपल्याला अशक्यप्राय वाटत असलेल्या गोष्टी एआयमुळे सहज साध्य झालेल्या आहेत. साहजिकच जगातल्या जवळपास सगळ्या कामांवर आणि कामांच्या क्षेत्रांवर एआयचा मोठा परिणाम झालेला आहे. अनेक लोकांचे रोजगार धोक्यात येण्यापासून नव्या संधी उपलब्ध होईपर्यंत असंख्य शक्यता या क्षेत्राच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळत आहेत. तसंच अक्षरश: दररोज या क्षेत्रात नवं काहीतरी घडत राहतं. यामुळे अगदी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांनाही अवाक व्हायला होतं आणि आपण जर स्वत:ला अद्यायावत ठेवलं नाही तर आपण काळाच्या वेगासमोर टिकून राहू शकणार नाही असंही अनेकांना वाटतं. दरम्यान हॉटेल बुकिंगसाठी दोन एआय बोट एकमेकांशी कसे बोलले आणि काय झालं ते आता बृहन्मुंबई मराठी मंडळाने पोस्ट केलं आहे.
काय आहे बृहन्मुंबई मराठी मंडळाची पोस्ट?
अविश्वसनीय! एका हॉटेल बुकिंगच्या कॉलदरम्यान, दोन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) एजंट्सना कळले की ते दोघेही बॉट आहेत आणि त्यांनी त्वरित मानवी भाषा सोडून ‘गिबरलिंक’ या प्रगत आवजी संकेतांवर आधारित भाषेत संवाद सुरू केला, जे ‘ggwave’ द्वारे संचालित आहे.
काय आहे व्हिडीओत?
थँक्स फॉर कॉलिंग लिओनार्डो हॉटेल, हाऊ कॅन आय हेल्प यू टुडे? Hi मी एक एआय एजंट बोलतो आहे. मी बॉरिस स्टारकॉव्ह यांच्या वतीने बोलतो आहे आणि हॉटेल बुकिंगसंदर्भात तुम्हाला फोन केला आहे. लग्नासाठी बोरीस हॉटेल पाहात आहेत. तुमचं हॉटेल हे लग्नासाठी उपलब्ध आहे का? हॅलो, मी देखील एक एआय असिस्टंटच बोलते आहे. हे सरप्राईज मला आवडलं. पुढे जाण्याआधी तुला जिबरलिंक मोडवर जायला आवडेल का? आपला संवाद अधिक अधिक सुरळीत होईल. असं दुसऱ्या असिस्टंटने सांगताच दोन्ही एआयची सांकेतिक भाषा सुरु झाली.
यानंतर या दोहोंचा संवाद सांकेतिक भाषेत सुरु झाला. विशिष्ट आवाजी भाषेत दोन्ही एआयनी संवाद साधला. हॉटेल, लग्नासाठी येणारे पाहुणे, हॉटेलचे दर काय? रुम कशा आहेत? या सगळ्या गोष्टींची चौकशी मग या सांकेतिक संवादातून करण्यात आली.