WhatsApp: व्हॉट्सअॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणार मेसेजिंग अॅप आहे. अनेक जण व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करत असताना, युजर्सच्या गरजा लक्षात घेत कंपनीकडून अनेक अपडेटही दिले जातात. सध्या व्हॉट्सअॅपने अलीकडेच अँड्रॉइड बीटा अॅपसाठी नवीन अपडेट जारी केले आहे. या अपडेटने अॅपच्या टॅबलेट आवृत्तीमध्ये ‘स्प्लिट व्ह्यू फीचर’ आणले आहे. हे नवीन अपडेट युजर्सना खूप आवडणार आहे कारण अपडेट टॅबलेटच्या इंटरफेसशी सुसंगत आहे. हे तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर चांगला अनुभव देते. अपडेट पूर्णपणे रोलआउट झाल्यानंतर, वापरकर्ते टॅबलेट स्क्रीनवर एकाच वेळी अॅपचे दोन भिन्न विभाग पाहू आणि वापरण्यास सक्षम असतील. चला तर मग या फीचरबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
टॅबलेट व्हर्जनसाठी नवीन अपडेट
नवीन अपडेटची माहिती wabetainfo ने आपल्या रिपोर्टमध्ये दिली आहे. वेबसाइटने एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. Android टॅबलेटसाठी WhatsApp च्या नवीनतम बीटा आवृत्तीवर स्प्लिट व्ह्यू काम करत असल्याचे या स्क्रीनशॉटमध्ये दिसल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी, टॅबलेट आवृत्तीमध्ये व्हॉट्सअॅप वापरताना, चॅट व्ह्यू संपूर्ण स्क्रीन घेत असे. अशा परिस्थितीत, प्रत्येक वेळी एखाद्याचे चॅट उघडण्यासाठी वापरकर्त्यांना चॅट लिस्टमध्ये परत जावे लागले. तथापि, नवीन अपडेटमध्ये, तुम्ही चॅट उघडता तेव्हा चॅट लिस्ट नेहमी दिसेल. यासोबतच कॉल आणि स्टेटस व्ह्यूही उपलब्ध आहे.
(हे ही वाचा : Reels क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता… )
अपडेट न मिळाल्यास काय करावे?
तुम्हाला हे अपडेट मिळाले नसेल, तर तुमच्या Android टॅबलेटसाठी Play Store वरून WhatsApp Beta चे नवीनतम अपडेट इंस्टॉल करा. यानंतर तुम्हाला टॅबलेट आवृत्तीसाठी ट्वीक्ड इंटरफेस मिळेल. यानंतरही तुम्हाला अपडेट मिळत नसेल, तर काही दिवस प्रतीक्षा करा, कारण सर्व यूजर्ससाठी हे अपडेट हळूहळू रोल आउट केले जात आहे. यासोबतच आगामी काळातही व्हॉट्सअॅपकडून असेच उपयुक्त अपडेट्स मिळत राहतील, अशी अपेक्षा आहे.