‘महादेव’ या ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप बाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपसह २२ अनधिकृत अ‍ॅप आणि संकेतस्थळांवर सरकारनं बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे.

सक्तवसुली संचलनालयाकडून ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपसंबंधात चौकशी सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईडीनं केलेल्या विनंतीनंतर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं कलम ६९ अ अंतर्गत बंदीचा आदेश जारी केला आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी छत्तीसगड सरकारवर टीका केली आहे. राजीव चंद्रशेखर म्हणाले, “छत्तीसगड सरकारला कलम ६९ अ कायद्याअंतर्गत अ‍ॅप आणि संकेतस्थळे बंद करण्याची विनंती करण्याचा अधिकार होता. पण, सरकारकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. गेली दीड वर्षे छत्तीसगड सरकार यासंबंधी चौकशी करत आहे. पण, ईडीनं केलेल्या विनंतीनंतर संबंधित अ‍ॅपवर कारवाई करण्यात आली आहे.”

‘महादेव’ या ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी ( ३ नोव्हेंबर ) केला. तसेच हे प्रकरण चौकशीच्या कक्षेत येत असल्याचे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुख्यमंत्री बघेल यांनी दुबईला जाण्यास सांगितलं”

‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपप्रकरणी ईडीनं फरार घोषित केलेल्या शुभम सोनीनं दुबईतून व्हिडीओ प्रसारित केला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून शुभम सोनीनं मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तसेच, ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपचा मालक असल्याचंही शुभम सोनीनं सागितलं. “मुख्यमंत्र्यांनी बुकीचं काम वाढवण्याच्या सूचना दिल्या आणि दुबईला जाण्यास सांगितलं,” असं शुभम सोनीनं म्हटलं आहे.