जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ‘एलॉन मस्क’ ( Elon Musk ) यांची ओळख आता जगभरात झाली आहे. त्यातच प्रसिद्ध ‘टाइम’ मासिकाने एलॉन मस्क यांची ‘टाईम्स पर्सन ऑफ द इयर २०२१’ म्हणून निवड केली आहे. तंत्रज्ञानातील विविध संकल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न अबजाधीश असलेल्या एलॉन मस्क यांच्याकडून केला जातो. त्यांच्या ‘स्पेस एक्स’ ( Space X ) कंपनीने अंतराळ संशोधन क्षेत्रात नवनवीन विक्रम केले आहेत. तर त्यांच्या ‘टेस्ला’ कंपनीने वीजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कार बनवत जगभरात दबदबा निर्माण केला आहे.

यामध्ये आणखी एक वेगळा मार्ग निवडत वेगळे तंत्रज्ञान जन्माला घालण्याचा इरादा एलॉन मस्क यांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. “स्पेस एक्स कंपनी एक कार्यक्रम सुरु करत आहेत, यामध्ये वातावरणातील-हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचा वापर हा रॉकेटच्या इंधनासाठी करणार आहे. हे मंगळ मोहिमेसाठी सुद्धा महत्त्वाचे आहे ” असं एलॉन मस्क यांनी म्हंटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रावर नासाचे अंतराळवीर २०२४ ला उतरणार आहेत, यामध्ये एलॉन मस्कची यांच्या स्पेस एक्स कंपनीचा महत्वपुर्ण सहभाग असणार आहे. पण त्याचबरोबर भविष्यातील मंगळ ग्रहावरील मोहिमांकरता स्पेस एक्स कंपनी ‘स्टारशिप’ नावाचे अतिशय भव्य असं रॉकेट विकसित करत आहे. थेट मंगळ ग्रहावर अंतराळवीरांना पोहचवण्याचे काम हे रॉकेट करेल असा विश्वास एलॉन मस्क यांना आहे. मात्र काही कोटी किलोमीटर प्रवास करत मंगळावर जाणे आणि परत येणे यासाठी कित्येक टन इंधन लागणार आहे. एवढे इंधन हे पृथ्वीवरुन वाहून नेणे शक्य नाही. तर मंगळ ग्रहावर किंवा त्याच्या वातावरणात ऑक्सीजनचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. उलट ९५ टक्के कार्बन डाय ऑक्साईडचे अस्तित्व आहे. म्हणूनच मंगळ ग्रहाच्या वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचा वापर हा इंथन म्हणून करता आला तर मंगळ ग्रहावरून पृथ्वीकडे परतीचा प्रवास करणे शक्य होणार आहे. तेव्हा कार्बन डाय ऑक्साईडचा वापर हा रॉकेटमधील इंधन म्हणून करण्याच्या तंत्रज्ञानावर एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीचे काम सुरु आहे. त्याबाबतचे सुतोवाच त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केले आहे.