Google Gemini Nano Banana AI saree Trend Photos Safety Concerns : सध्या इन्स्टाग्रामवर एक नवीन ट्रेंड चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये लोक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेले फोटो पोस्ट करत आहेत. आपल्यापैकी देखील अनेकांनी गुगल नॅनो बनाना (Google Nano Banana) ट्रेंड आणि व्हायरल होत असलेल्या व्हिंटेज साडी एआय एडिट्स फॉलो केले असेल. किमान हे फोटो तरी तुम्ही तुमच्या फीडवर नक्कीच पाहिले असतील. पण अशा ट्रेंटबरोबरच वापरकर्त्यांच्या फोटोच्या सुरक्षिततेबाबात शंका उपस्थित होत आहेत’.

‘नॅनो बनाना’ची क्रेझ ही गुगलच्या जेमिनी नॅनो मॉडलवर उभारण्यात आलेल्या एआय फोटो-एडिटिंग फीचरमधून सुरू झाली आहे. याच्या माध्यमातून साधारण सेल्फी तुम्ही थ्रीडी फिगर-स्टाइल फोटोमध्ये बदलू शकता. हे फिचर वेगवेगळ्या पद्धतींनी वापरताना वापरकर्त्यांनी आणखी एक वेगळा शोध लावला तो म्हणजे व्हिंटेज साडी एआय फोटो एआय ट्रेंड. यामध्ये एक साधारण फोटो घेऊन त्यापासून रेट्रो लूकमधील फोटो तयार केले जात आहेत.

व्हिंटेज साडी एआय-जनरेटेड पोर्ट्रेट्स फीचर महिला वापरकर्त्याच्या एखादा फोटो वापरून आकर्षक असा पारंपारिक साडी घातलेला सिनेमॅटिक किंवा व्हिंटेज पार्श्वभूमी असलेला फोटो तयार करून देते. महिला वापरकर्त्यांकडून या फीचरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. पण हा एआय ट्रेंड व्हायरल होत असतानाचा वापरकर्त्यांच्या फोटोंची गोपनीयता आणि सुरक्षितता याबद्दल चिंता उपस्थित केल्या जात आहेत.

‘जेमिनी बनाना टूल’ कितपत सुरक्षित आहे?

गुगल आणि ओपनएआय अशा तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्या वापरकर्त्यांनी अपलोड केलेल्या कंटे्टच्या सुरक्षेसाठी टूल्स देतात. मात्र असे असून देखील अशा बाबतीत सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. जे या फोटोंचा वापर करत आहेत त्यांची भावना काय आहे, यावरच याचा गैरवापर किंवा संमतीशिवाय बदल किंवा चुकीच्या पद्धतीने दुसऱ्याच्या नावाने ते वापरला जाण्याची शक्यता कितपत हे ठरते.

अदृष्य डिजिटल वॉटरमार्क

गुगलत्या नॅनो बनाना फोटोंवर एक अदृश्य डिजिटल वॉटरमार्क (SynthID) दिला जातो, तसेच मेटाडेटा टॅग्सही असतात, ज्याचा वापर कंटेंट हा एआय वापरून तयार केलेला आहे हे ओळखण्यासाठी होतो.

“जेमिनी २.५ फ्लॅश वापरून तयार करण्यात आलेले किंवा एडिट केलेले सर्व फोटोंमध्ये अदृश्य SynthID डिजिटल वॉटरमार्कचा समावेश आहे, जेणेकरून ते आय जनरेटेड असल्याचे ओळखता येईल, आत्मविश्वासाने तयार करा आणि तुमच्या वापरकर्त्यांना पारदर्शकता द्या,” अशी माहिती aistudio.google.com वर देण्यात आली आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीला किंवा प्लॅटफॉर्म्सना अशा एखाद्या फोटोचे मूळ तपासण्यासाठी पद्धत उपलब्ध होते.

पण असे असले तरी हा वॉटरमार्क पाहाता येईल असे टूल सध्यातरी उपलब्ध नाही. त्यामुळे वॉटरमार्क असला तरी बहुतांश दैनंदिन वापरकर्त्यांना त्याची पडताळणी करता येणार नाही, अशी माहिती Tatler Asia च्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

वायर्डने दिलेल्या रिपोर्टनुसार, वॉटरमार्क हा सुरूवातीला जरी चांगला उपाय वाटत असला तरी पण वास्तवात त्याचा उपयोग फारसा होत नाही, ते बनावट बनवले जाऊ शकतात तसेच तो काढून टाकला जाऊ शकतो किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते, असे एआय-डिटेक्शन स्टार्टअप रिअॅलिटी डिफेंडरचे सीईओ बेन कोलमन म्हणाले. .

काही तज्ज्ञांच्या मते वॉटरमार्किंगने एआय डिटेक्शनमध्ये मदत होऊ शकते पण याच्या मर्यादा समजून घेणे गरजेचे आहे. कोणालाही वाटत नाही की वॉटरमार्किंग करणे हे पुरेसे ठरेल, असे यूसी बर्कले स्कूल ऑफ इन्फॉर्मेशनचे प्राध्यापक हॅनी फरीद म्हणाले. त्यांच्या मते या टूलमध्ये सुधारणा करणे आणि याचा वापर इतर तंत्रज्ञानाबरोबर मिळून केल्यास असे बनावट फोटो तयार करणे अधिक कठीण होऊ शकते.

तुमचे फोटो सुरक्षित कसे ठेवणार?

फोटो अपलोड करताना काळजी घ्या – कोणतेही एआय टूल वापरताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही अपलोड करत असलेला फोटो सुरक्षित असायला हवा, कारण त्याच्या आढारावरच एआय टूल फोटो तयार करते. त्यामुळे सहसा खासगी, खूपच वैयक्तिक फोटो अपलोड करणे टाळा.

मेटाडेटा काढून टाका – फोटो अपलोड करण्याच्या आधी त्यामधून लोकेशन टॅग्स, तुमच्या डिव्हाइसची माहिती इत्यादी गोष्टी काढून टाका. यामुळे अनावधानाने कोणतीही माहिती लीक होणार नाही.

प्रायव्हसी सेटिंग्ज – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि अॅप्स वापरताना त्यासाठी नेहमी स्ट्राँग प्रायव्हसी सेटिंग्ज वापरणे योग्य ठरते. ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा फोटो कोण पाहू शकेल हे ठरवू शकता आणि यामुळे तुमच्या कंटेंटचा गैरवापर टाळता येतो. एखादी गोष्ट शेअर करण्यापूर्वी नेहमी सावधगिरी बाळगा, कारण एकदा सार्वजनिकरित्या शेअर करण्यात आल्यानंतर फोटो कॉपी केला जाऊ शकतो, त्यामध्ये बदल केला जाऊ शकतो किंवा तो इतरत्र वापरला जाऊ शकतो.

रिटेन कॉपी – तुमचा ओरिजनल फोटो किंवा प्रॉम्ट तुमच्याकडे असू द्या, जेणेकरून तुम्हाला बदल किंवा गैरवापर लक्षात येऊ शकेल.

अटी आणि परवानग्या तपासून घ्या – अपलोड केल्याने प्लॅटफॉर्मला तुमच्या फोटोवर कोणते अधिकार मिळतात, त्या फोटोचा वापर मॉडेल ट्रेंनिंगसाठी केला जाऊ शकतो का, या गोष्टी काळजीपूर्वक समजून घ्या.