Google Changes G Logo For The First Time : आघाडीचे सर्ज इंजिन म्हणून ओळखल्या जाणार्या गूगलने त्यांचा आयकॉनिक ‘G’ लोगो बदलला आहे. जवळपास १० वर्षांनंतर गूगलने त्यांचा लोगो बदलला आहे, असे सांगण्यात येत आहे. नवीन डिझाइनमध्ये लाल, पिवळा, हिरवा व निळा या चार रंगांच्या ब्लॉक्सपासून दूर जाऊन, त्यांची जागा एका ग्रेडियंट इफेक्टने घेतली आहे. नवीन आयकॉनला एक फ्रेश, नवीन स्वरूप देणे आणि गूगल AI वर सतत लक्ष केंद्रित करतो आहे हे अधोरेखित करणे हा या छोट्याशा बदलाचा उद्देश आहे.
हे वाचताच सर्वांत आधी तुम्ही क्रोमवर सर्च करून लोगोत काय बदल झाला हे पाहिले असेल. तर 9to5Google च्या अहवालानुसार, हे अपडेट सध्या गूगल सर्च ॲपद्वारे आयओएस युजर्ससाठी आणले जाणार आहे. गूगलच्या ॲपच्या बीटा आवृत्ती 16.18 मध्ये आणि iOS युजर्ससाठी गूगल सर्च ॲपद्वारे हे अपडेट रोल आउट होत आहे. तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये अगदी बारकाईने पाहिल्यास गूगलच्या लोगोचा रंग बदलण्यात आला आहे; जो त्याच्या अलीकडील AI ड्रिव्हन उपक्रमांशी सुसंगत आहे.
गूगल वर्डमार्क अद्याप ‘जैसे थे’ (Google Logo)
कंपनीने अद्याप मुख्य गूगल वर्डमार्कमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. क्रोम किंवा मॅप्ससारख्या इतर उत्पादन लोगोमध्येही असेच अपडेट्स येतील की नाही याची अधिकृत माहिती सध्या समोर आलेली नाही. पण, गूगलने त्यांच्या उत्पादनांमध्ये एआयवर भर दिल्याने, भविष्यात ग्रेडियंट इफेक्ट इतर सेवांमध्येसुद्धा वापरले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
२०१५ नंतर गूगलने पहिल्यांदाच आपला ‘G’ लोगो अपडेट केला आहे. कंपनी अधिक एआय फीचर्सचा समावेश करीत असताना, नवीन ग्रेडियंट इफेक्टने त्याची विकसित होत असलेली ब्रँड ओळख अधोरेखित करते. विशेषतः गूगल जेमिनी, त्याचा जनरेटिव्ह एआय असिस्टंट लाँच केल्याने जेमिनीच्या लोगोमध्ये आधीच निळा ते जांभळा ग्रेडियंट इफेक्ट समाविष्ट आहे. त्यामुळे गूगलच्या एकूणच व्हिज्युअल आयडेंटिटीमध्ये ग्रेडियंट डिझाइनचा ट्रेंड स्पष्टपणे दिसतो आहे आणि आणि आता हा नवीन बदल कंपनीच्या AI-केंद्रित भविष्याकडे दिशा दर्शवितो आहे.