Internet Shutdown In India : इंटरनेटशिवाय आपला स्मार्टफोन, लॅपटॉप, डेक्सटॉप, टेबलेट या वस्तू एक डब्बा आहेत. इंटरनेट नसेल तर या उपकरणांवर आपण कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन काम करु शकत नाही. यामुळे केवळ भारतातचं नाही तर जगभरात इंटरनेटचं एक मोठं जाळं तयार झालं आहे. पण तुम्ही विचार करा एक दिवस इंटरनेट बंद झाले तर आणि पुढील दोन दिवस देखील हीच परिस्थिती राहिली तर काय कराल? या गोष्टीचा विचार करूनचं तुम्ही चिंतेत पडलात ना… आपण तुम्हाला माहित नसेल की, इंटरनेट सेवा बंद करण्यात जगात भारत हा सर्वात आघाडीचा देश आहे. इंटरनेट अॅडव्होकसी वॉचडॉग एॅक्सेस नाऊने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, इंटरनेट शटरडाऊनमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. मागील पाच वर्षात एकट्या भारतात सर्वाधिक वेळा इंटरनेट सेवा बंद झाली आहे.
गेल्या वर्षभरात ८४ वेळा इंटरनेट सेवा बंद
एक्सेस नाऊच्या अहवालानुसार, जगभरात गेल्या वर्षभरात १८७ वेळा इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. यापैकी ८४ वेळा एकट्या भारतात इंटरनेट सेवा बंद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात जम्मू काश्मीरमध्ये सर्वाधिक वेळा इंटरनेट सेवा बंद केली होती. एकट्या जम्मू काश्मीरमध्ये तब्बल ४९ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत सलग ६ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यानंतर राजस्थानमध्ये १२ वेळा इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती तर पश्चिम बंगालमध्ये ७ वेळा इंटरनेट सेवा बंद होती. राज्यातील राजकीय अस्थिरता, हिंसाचार, दंगल, अशा कारणांमुळे अनेक राज्यात इंटरनेट सेवा बंद केली जाते.
एका वर्षात ४५०० कोटींचा आर्थिक तोटा
गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये भारतात सुमारे ११५७ तास इंटरनेट सेवा ठप्प होती, यामुळे देशाचे जवळपास ४३०० कोटींचे नुकसान झाले आहे. इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने सर्व आर्थिक व्यवहार थांबतात. यामुळे मोठ्याप्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागतो. यात २०२१ मध्ये इंटरनेट सेवा बंद झाल्याने सुमारे ५.९ कोटी लोकांना याचा फटका बसला. भारताव्यतिरिक्त युक्रेनमध्ये २२ वेळा आणि इराणमध्ये १८ वेळा इंटरनेट सेवा बंद झाली होती.
इंटरनेट सेवा बंद करण्याची नेमकी कारणं काय?
एखाद्या राज्यात हिंसाचार, दंगल किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत असतील तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून त्या संबंधीत राज्यातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला जातो.संकटाच्या काळात चुकीच्या माहितीचा प्रवाह थांबवण्यासाठी इंटरनेट शटडाऊन लागू करतात. विशेषत: भारतात मोठ्याप्रमाणात हिंसाचार, आंदोलनाच्या घटना घडल्या की परिस्थिती शांत ठेवण्यासाठी इंटरनेट सेवा बंद केली जाते. ज्या ठिकाणी इंटरनेट शटडाऊन होते त्या ठिकाणी कोणत्याही डिव्हाइसवर नेट वापरता येत नाही.
२०२२ मध्ये ३५ देशांमध्ये किमान १८७ वेळा इंटरनेट शटडाऊन झाले. या ३३ देशांपैकी ३३ देशांमध्ये या घटना वारंवार घडल्या. इंटरनेट शटडाऊनमुळे एखादी माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवता येत नाही. यामुळे हिंसाचार, दंगलीसारख्या घटनांदरम्यान समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडल्या की पहिल्यांदा इंटरनेट सेवा बंद केल्या जातात. पण वाढत्या डिजिटल जगामध्ये इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने मोठे नुकसान सहन करावे लागते.
