नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने नेपच्यून ग्रहाचा नवीन फोटो प्रसिद्ध केला. या फोटोत नेपच्यूनचे तेजस्वी वलय अगदी स्पष्ट दिसत आहे. गेल्या ३० वर्षांतील नेपच्यून ग्रहाचे हे सर्वात स्पष्ट चित्र आहे. यापूर्वी १९८९ मध्ये व्हॉयेजर-२ या अंतराळ यानाने नेपच्यूनचे सर्वात जवळून फोटो घेतले होते.नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून आठवा व सूर्यमालेतील सर्वांत दुरचा ग्रह आहे. नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने घेतलेल्या या चित्रात अनेक तेजस्वी वलयांच्या व्यतिरिक्त, धुळीचा एक पट्टा देखील दिसतो.
याबद्दल नेपच्यून सिस्टम एक्सपर्ट हेडी हॅमेल म्हणाले की, आम्ही नेपच्युनच्या या धुरकट, धुळीने माखलेल्या कड्या तीन दशकांपूर्वी पाहिल्या होत्या. आम्ही त्यांना इन्फ्रारेडमध्ये पहिल्यांदाच पाहिले आहे. १९८९ मध्ये नासाच्या व्हॉयेजर २ ने नेपच्यून पहिल्यांदा पाहिला होता. तेव्हापासून या निळ्या ग्रहावर कोणतेही अंतराळयान गेलेले नाही. नेपच्यून पृथ्वीपेक्षा सूर्यापासून ३० पट जास्त दूर आहे. नेपच्यून गुरू आणि शनिपेक्षा हायड्रोजन आणि हेलियम सारख्या घटकांनी भरलेला आहे.




(आणखी वाचा : Jupiter Opposition: १६६ वर्षांनी ‘या’ दिवशी गुरु व पृथ्वी येणार सर्वात जवळ; शनीचेही होणार दर्शन, कुठे व कसे पाहाल? )
सर्वात शक्तिशाली टेलिस्कोप
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली टेलिस्कोप आहे. पृथ्वीपासून सुमारे १.६ दशलक्ष किलोमीटर अंतरावरील गोष्टी यात टिपता येतात. डिसेंबर २०२१ मध्ये जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप लाँच करण्यात आले होते. वेबचा नियर-इन्फ्रारेड कॅमेरा ०.६ ते ५ मायक्रॉनच्या नियर-इन्फ्रारेड कक्षेतील फोटो काढतो.
सुर्यमालिकेतील आठवा ग्रह
नेपच्यूनचा शोध ४ ऑगस्ट १९६४ रोजी लागला. नेपच्युन हा ग्रह टेलिस्कोपने पाहता येतो. नेपच्यून युरेनसच्याही पुढे एक अब्ज मैल अंतरावर आहे. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणत: ४,४९८,२५२,९०० कि.मी. एवढे आहे. स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास याला साधारणत: १९ दिवस लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास नेपच्युनला जवळपास १६५ वर्षे लागतात.