OpenAI कंपनीद्वारे काही दिवसांपूर्वी ChatGPT-4 लॉन्च करण्यात आला. या अपडेटेड व्हर्जनमध्ये GPT-3.5 पेक्षा अधिक प्रगत अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. काम करताना GPT-4 अधिक विश्वासार्ह, सर्जनशील आणि जुन्या GPT-3.5 पेक्षा सूक्ष्म सूचना हाताळण्यास जास्त सक्षम असल्याची माहिती कंपनीने ब्लॉगच्या माध्यमातून प्रसिद्ध केली आहे. मानवी सूचनांचे योग्य आणि सूक्ष्म पद्धतीने पालन करणे हे या नव्या GPT-4 चे मुख्य ध्येय आहे.
भारतामध्ये ChatGPT ची वाढती लोकप्रियता पाहता ग्राहकांकरिता कंपनीने ChatGPT प्लस सबस्क्रिप्शनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेचा विचार करुन OpenAI कंपनीने हा निर्णय घेतला आहे. देशातील नागरिकांना लवकरच ChatGPT-4 चा अनुभव घेता येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या क्षेत्रामध्ये आता मोठमोठ्या कंपन्यादेखील प्रवेश करत आहेत.
चॅटबॉटची निर्मिती प्रामुख्याने मानवाचे जीवन सुखकर व्हावे यासाठी करण्यात आली होती. परंतु हे तंत्रज्ञान मानवापेक्षा सरस ठरु शकते अशी भीती अनेकांच्या मनात आहे. यामुळे आपल्या नोकरीवर गदा येऊ शकते असे बऱ्याच जणांना वाटत आहे. OpenAI मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ChatGPT चे संस्थापक सॅम ऑल्टमन यांनी एका मुलाखतीमध्ये या तंत्रज्ञानाबाबत त्यांच्या मनात असलेली भीती बोलून दाखवली. ‘भविष्यात चॅटबॉट मनुष्याची जागा घेऊ शकतो’, असे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, “भविष्यामध्ये मोठ्या तांत्रिक बदलांशी मानवाला जुळवून घ्यावे लागणार आहे. अशा वेळी कामे करण्यासाठी मानवापेक्षा तंत्रज्ञानाचा वापर व्हायला लागला, तर लोक बेरोजगार होतील. येत्या काही वर्षांमध्ये अशी परिस्थिती उद्भवू शकते. पण मानवी सर्जनशीलता अमर्याद आहे. त्यामुळे मानव उदरनिर्वाहासाठी काहीतरी नवीन शोधून काढतील आणि या संकटातून बाहेर पडतील.”
“चॅटजीपीटी हे एक साधन आहे. जो व्यक्ती त्यावर नियंत्रण ठेवून आहे, त्या व्यक्तीने दिलेल्या आज्ञांवर ते कार्य करते. याचा गैरवापर होईल अशी भीती मला वाटत आहे. या तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास प्रचंड प्रमाणात हानी होऊ शकते. चॅटबॉट्सनी सध्या संगणकीय भाषेवर प्रभुत्त्व मिळवले आहे. त्यामुळे याचा वापर सायबर हल्ल्यांसाठी होऊ शकतो”, असे सांगत त्यांनी चॅटजीपीटीसंबंधित मनातील भयावह विचार बोलून दाखवले.