Google’s gift to Jio users: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि गुगलने भारतात आर्टिफिशियल इंटेलिजंसचा वापर वाढवण्याच्या उद्देशाने एक नवीन धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. याअंतर्गत जिओ युजर्सना १८ महिन्यांसाठी गुगल एआय प्रो प्लॅनमध्ये मोफत प्रवेश मिळेल, त्याची किंमत प्रत्येक युजरगणिक अंदाजे ३५,१०० रूपये इतकी आहे.
या ऑफरमध्ये गुगल जेमिनी २.५ प्रो, नवीन नॅनो बनाना आणि व्हेओ ३.१ मॉडेल्स, आकर्षक फोटो आणि व्हिडीओ निर्मितीसाठी विस्तारित मर्यादा, अभ्यास आणि संशोधनासाठी नोटबुक एलएमता प्रवेश आणि २ टीबी क्लाउड स्टोरेज यासारख्या प्रिमियम सेवांचा समावेश आहे.
सुरूवातीला ही सुविधा १८ ते २५ वयोगटातील जिओ युजर्ससाठी उपलब्ध असेल. त्यानंतर हळूहळू ती सर्व जिओ ग्राहकांसाठी उपलब्ध केली जाईल. हे एआय अॅक्सेस फक्त ५जी अनलिमिटेड प्लॅन असलेल्या वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध असेल. हा उपक्रम रिलायन्स इंटेलिजंस लिमिटेड आणि गुगल एकत्रितपणे चालवतील. या भागीदारीचा प्राथमिक उद्देश प्रत्येक भारतीय ग्राहक, संघटना आणि विकासक यांना एआयने जोडणे आणि देशाला डिजिटल उपक्रमाच्या पुढच्या विकसित टप्प्यावर नेणे आहे.
ही डील रिलायन्सच्या ‘एआय फॉर ऑल’ या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी याबाबत सांगितले की, “१.४५ अब्ज भारतीयांना एआय सेवा उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. गुगलसारख्या दीर्घकालीन भागीदारांसह आम्ही भारताला एआय-सक्षम बनवू इच्छितो. जिथे प्रत्येक नागरिक आणि संस्था एआयचा फायदा घेत भरभराट करू शकेल.”
गुगल आणि अल्फाबोटचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, “भारताच्या डिजिटल भविष्याला आकार देण्यात रिलायन्स आमच्यासाठी एक महत्त्वाचा भागीदार आहे. आम्ही या सहकार्याला एआय युगात घेऊन जात आहोत. या उपक्रमामुळे अत्याधुनिक एआय साधने भारतातील ग्राहक, व्यवसाय आणि विकासकांपर्यंत पोहोचतील. “
भारताला जागतिक एआय हब बनवण्यास मदत करण्यासाठी रिलायन्स आणि गुगल भारतात टेन्सर प्रोसेसिंग युनिट्स नावाच्या प्रगत एआय हार्डवेअरची उपलब्धता वाढवतील. यामुळे भारतीय उद्योगांना मोठे आणि जटिल एआय मॉडेल विकसित करण्यास मदत होईल.
कंपनीने रिलायन्स इंटेलिजंसला गुगल क्लाउडचा स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून नाव दिले आहे. ते जेमिनी एंटरप्राइझचा वापर करेल, एक आधुनिक एआय प्लॅटफॉर्म जो कर्मचाऱ्यांना भारतीय व्यवसायांमध्ये विविध कामांमध्ये एआय एजंट तयार करण्यास आणि तैनात करण्यास अनुमती देतो.
