नोकरी, कॉलेज, शाळा आदी ठिकाणांच्या काही महत्त्वाच्या कामांसाठी घरी लॅपटॉप किंवा संगणक असणे महत्त्वाचे असते. पण, विविध कंपन्यांचे अनेक लॅपटॉप खूप जास्त महाग असतात. त्यामुळे हे लॅपटॉप, संगणक खरेदी करायचे की नाही, असा प्रश्न ग्राहकांना पडतो. जर तुम्ही कमी पैशात लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरेल. भारतात टेलिकॉम क्षेत्रात अग्रगण्य कंपन्यांपैकी एक असलेली रिलायन्स जिओ एक लॅपटॉप घेऊन येत आहे. जिओ बुक लॅपटॉप लाँच केल्यानंतर आता आता कंपनी 'क्लाउड लॅपटॉप' (Cloud Laptop) लाँच करण्याच्या तयारीत आहे. या लॅपटॉपची किंमत १५ हजार रुपयांपर्यंत असू शकते, असे सांगण्यात येत आहे. रिलायन्स जिओ कंपनी एचपी, लिनोवो, एसर व इतर संगणक बनवणाऱ्या कंपन्यांसोबत मिळून जिओ या लॅपटॉपच्या निर्मितीवर काम करते आहे. क्लाउड (Cloud) हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. तुमच्या मोबाईलमध्येही हे ॲप उपलब्ध आहे. क्लाउड स्टोरेज म्हणजे तुमची एखादी महत्त्वाची गोष्ट स्टोअर करून ठेवणे. त्यामुळे युजरच्या फोनमध्ये काही जागा शिल्लक राहते. कंपनी आपल्या सर्व्हरवर डेटा सेव्ह करून ठेवते. गूगल फोटो आणि गूगल ड्राइव्हसुद्धा याप्रमाणे काम करते. हेही वाचा…नोकरी मिळत नाहीये? आता ‘या’ प्लॅटफॉर्मच्या मदतीने झटकन मिळेल जॉब… तर, क्लाउड संगणक आणि लॅपटॉपदेखील या ॲपसारखेच काम करते. युजर्सना एखादा साधा लॅपटॉप किंवा संगणक खरेदी करावा लागतो. मात्र, इतर लॅपटॉपप्रमाणे त्यात कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची गरज नसते. त्यामुळे क्लाउडवर सेव्ह असणारे सॉफ्टवेअर या लॅपटॉपमध्ये थेट वापरता येते. त्यामुळे स्वस्तात मस्त लॅपटॉपमध्येही ग्राहकांना उच्च दर्जाचे काम करता येणार आहे . साधारणपणे एखाद्या लॅपटॉपची किंमत ही त्यातील ग्राफिक्स कार्ड, मेमरी व रॅम अशा गोष्टींमुळे वाढते. मात्र, क्लाउड लॅपटॉपमध्ये या गोष्टींची गरज भासणार नाही. लॅपटॉपची संपूर्ण प्रक्रिया जिओ क्लाउडच्या (Jio Cloud) बॅक एण्डला केली जाईल. ग्राहकांना स्वस्त लॅपटॉप घेऊनही उत्तम दर्जाचे काम करता येणार आहे. मात्र, अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, @IndianTechGuide यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली आहे.