स्वस्त स्मार्टफोनच्या पर्यायांत नवी भर
भारतीय बाजारात स्मार्टफोनची मागणी वाढू लागल्यापासून जगभरातील कंपन्यांनी आपला मोर्चा भारतीय ग्राहकाकडे वळवला आहे. त्यामुळे दिवसाआड एखादी कोरियाई किंवा चिनी कंपनी भारतात स्मार्टफोन सादर करताना दिसते. सहाजिकच स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांची जबरदस्त स्पर्धा भारतात सुरू झाली आहे. या स्पर्धेत टिकायचं म्हटलं तर स्वत:चं वेगळेपण सिद्ध करावं लागतं किंवा ग्राहकाला आकर्षित करेल अशा किमतीत स्मार्टफोन द्यावा लागतो. एकीकडे, मोठमोठय़ा मोबाइल कंपन्या पहिल्या पर्यायाच्या माध्यमातून बाजारात स्वत:ची हवा निर्माण करू पाहात आहेत. तर दुसरीकडे छोटय़ा कंपन्या स्वस्त आणि कमीतकमी किमतीत स्मार्टफोन आणत आहेत. याच दुसऱ्या पंगतीत आता ‘वीओ’ या कंपनीची भर पडली आहे. अगदी चार महिन्यांपूर्वीच स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रात उतरलेल्या या कंपनीने अवघ्या चार हजार रुपयांचा जबरदस्त स्मार्टफोन आणून दुसऱ्याच फटक्यात बाजारात खळबळ उडवून दिली आहे.
जयपूर येथील फॉर्च्यून इन्फोव्हिजन प्रा. लि. या कंपनीने ‘वीओ’ मोबाइल भारतात सादर केले आहेत. या कंपनीच्या वतीने अलीकडेच डब्ल्यूआय ५ नावाचा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. तर आता ‘डब्ल्यूआय स्टार ३जी’ या नव्या स्मार्टफोनच्या माध्यमातून कंपनीने भारतातील कमी किंमत श्रेणीतील, छोटय़ा ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘डब्ल्यूआय स्टार ३जी’ हा डय़ूअल सिमचा स्मार्टफोन किमतीत कमी असला तरी त्याची कामगिरी आणि लूक मध्यम श्रेणीतील स्मार्टफोनलाही टक्कर देणारा आहे. अँड्रॉइड किटकॅट या गुगलच्या आधुनिक ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित या फोनमध्ये अनेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे वैशिष्टय़े मोजली तर हा फोन मध्यम श्रेणीतील स्मार्टफोनच्या तोडीस तोड ठरतो. अर्थात त्याची प्रत्यक्ष कामगिरी या फोनची ‘खरी पात्रता’ दाखवून देतेच.
सध्या हा स्मार्टफोन केवळ ईबे इंडिया संकेतस्थळावरूनच उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोनला एका वर्षांची मॅन्युफॅक्चरर वॉरंटी देण्यात आली असून ईबेकडूनही ‘रीप्लेसमेंट’ गॅरंटी देण्यात आली आहे. ईबेने हा फोन आयसीआयसीआय, सिटीबँक आणि एचडीएफसी या क्रेडिट कार्डावर ‘ईएमआय’द्वारेही हा फोन उपलब्ध करून दिला आहे.
रंगरूप
‘डब्ल्यूआय ३जी’ हा सुमारे १४ सेंमी लांब आणि सात सेंमी रुंद आकाराचा स्मार्टफोन आहे. पाहताक्षणी हा फोन नजरेत भरत नाही. कारण याचा लूक अतिशय साधा आहे. सुमारे ०.९ सेमी जाडीच्या या फोनला चारही बाजूंनी ‘कव्र्हड फिनिशिंग’ देण्यात आले आहे. मागच्या बाजूला असलेल्या कव्हरचा रंग चमकदार किंवा उठावदार नाही. हेडफोनसाठी वरच्या बाजूला तर बॅटरीसाठी खालच्या बाजूला जॅक पुरवण्यात आला आहे. तर वापरणाऱ्याच्या उजव्या हाताला ‘लॉक’ आणि डाव्या बाजूला आवाजाच्या अॅडजस्टमेंटची व्यवस्था पुरवण्यात आली आहे. त्यामुळे रंगरूपाच्या बाबतीत हा फोन साधाच आहे, असे म्हणायला हरकत नाही.
डिस्प्ले
रंगरूपाने साध्या असलेल्या या फोनचा डिस्प्ले मात्र नक्कीच आकर्षित करेल. पाच इंच आकाराच्या या डिस्प्लेचे स्क्रीन रेझोल्यूशन ४८० बाय ८५४ पिक्सेल्स इतके आहे. मात्र, या स्क्रीनची दृश्यात्मकता खूपच चांगली आहे. यूटय़ूबवरील व्हिडीओ अतिशय स्पष्ट दिसतात आणि एचडी व्हिडीओचा इफेक्टही सुस्पष्टपणे जाणवतो. काही विशिष्ट अंशांतून स्क्रीन खूपच
पांढरी पडल्याचे दिसते. अन्यथा या स्क्रीन आणि डिस्प्लेबद्दल तक्रार करण्याचे काही कारण नाही.
कॅमेरा
या फोनला पाच मेगापिक्सेलचा बॅक आणि दोन मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरवण्यात आला आहे. मात्र, दोघांची कामगिरी खूपच खराब आहे, असे दिसून येते. पाच मेगापिक्सेलच्या मागील कॅमेऱ्याने काढलेले फोटोही स्पष्ट येत नाहीत. अगदी तीन फुटांवरील छायाचित्रातही ‘ग्रेन्स’ जाणवतात. पुढच्या कॅमेऱ्याचीही अशीच अवस्था आहे. दोन्ही कॅमेऱ्यांतून काढलेली छायाचित्रे काहीशी काळपट आल्याचे जाणवते. त्यामुळे कॅमेऱ्याच्या बाबतीत हा फोन कमकूवत ठरतो.
कामगिरी
या फोनमध्ये १.३ गिगा हार्ट्झचा डय़ूअल कोअर प्रोसेसर पुरवण्यात आला असून ५१२ एमबी रॅमही पुरवण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये चार जीबीची इंटर्नल मेमरी
असून ती ३२ जीबीपर्यंत वाढवता येते. कामगिरीच्या आधारावर या फोनला
दहापैकी सात गुण द्यायला हरकत नाही. कारण ज्या किमत श्रेणीत हा फोन मिळतो आहे, त्या श्रेणीतील अन्य फोनच्या
तुलनेत ‘डब्ल्यूआय स्टार ३जी’ची कामगिरी चांगली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2015 रोजी प्रकाशित
वीओ.. वीओ..
भारतीय बाजारात स्मार्टफोनची मागणी वाढू लागल्यापासून जगभरातील कंपन्यांनी आपला मोर्चा भारतीय ग्राहकाकडे वळवला आहे.
First published on: 20-01-2015 at 06:28 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheap price smart phone