विंडोजची आगामी आवृत्ती विंडोज ९ असेल, अशी सर्वाना अपेक्षा होती. मात्र मायक्रोसॉफ्टने बुधवारी ‘विंडोज १०’ या नव्या आवृत्तीची घोषणा केली. ‘विंडोज ८’मध्ये काढून टाकण्यात आलेले ‘स्टार्ट’ बटन विंडोजच्या चाहत्यांसाठी विंडोज १० मध्ये पुन्हा आणले आहे. विंडोज ८ मधील टाइल्स मात्र कायम ठेवण्यात आल्या आहेत. पुढील वर्षीपासून ही आवृत्ती विक्रीसाठी खुली होण्याची शक्यता आहे.
विंडोज १० मधील सुधारणा एक पाऊल पुढे टाकणाऱ्या असल्याने त्याला विंडोज ९ म्हणणे योग्य होणार नाही, असे कारण देत मायक्रोसॉफ्टने ही आवृत्ती विंडोज १० म्हणून जाहीर केली आहे. संगणक, मोबाइल, टॅबलेट आणि एक्स बॉक्स अशा सर्व प्लॅटफॉर्मवर सारख्याच पद्धतीने ही ओएस काम करणार आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या उपकरणांसाठी अ‍ॅप तयार करणे डेव्हलपरला सोपे जाणार असून, वापरकर्त्यांलाही उपकरणे वापरताना कुठलाही अडथळा जाणवणार नाही वा एकच अ‍ॅप पुन:पुन्हा खरेदी करावे लागणार नाही.
‘विंडोज १०’ची वैशिष्टय़े
*  उपकरणाप्रमाणे ही ओएस स्वत:हून डेस्कटॉप आणि टच मोडची निवड करणार आहे. यात लाइव्ह टाइल्स असून, माऊस आणि टचस्क्रीन अशा दोन्ही प्रकारे त्यांचा वापर करता येईल. त्यामुळे माऊस किंवा टच कुठल्याही प्रकारच्या डिव्हाइसची सवय असलेल्या यूजरला ही ओएस वापरता येईल.
* ‘विंडोज १०’मध्ये व्हच्र्युअल डेस्कटॉपची सुविधा देण्यात आली असून, त्यात एकाच वेळी अनेक डेस्कटॉप सुरू करता येतील. त्यामुळे घरी वापराच्या गोष्टी आणि ऑफिस वापराच्या गोष्टी वेगवेगळ्या डेस्कटॉपवर ठेवता येतील.
* या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सर्च रिझल्टचा पर्याय देण्यात आला आहे. ज्यामुळे आपण आपल्या डेस्कटॉपमध्ये सेव्ह केलेल्या फाइल्सपासून ते सध्या आपल्या संगणकावर सुरू असलेल्या इंटरनेट टॅब्जचे सच्रेसही आपल्याला करता येणार आहे.
* या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये इनबिल्ट अ‍ॅप स्टोअर देण्यात आले आहे.
* विंडोज आठवर करण्यात आलेल्या टीकांचा गांभीर्याने विचार करत विंडोज १०मध्ये हलका टच, कीबोर्ड आणि माऊसमधील ताळमेळ योग्य प्रकारे घालण्यात आला आहे.
* की-बोर्डची सवय झालेले यूजर अछळ+ळअइ दाबून एका अ‍ॅप्लिकेशनवरून दुसऱ्यावर स्विच होतात. त्यांना टचस्क्रीन किंवा माऊसचाही वापर करता यावा यासाठी टास्क बारवर स्वतंत्र बटन देण्यात आले आहे.

इंटरनेटमुळे आपल्या कामाच्या प्रक्रियेत मोठे बदल झाले आहेत. आपल्या जीवनशैलीत ज्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा शिरकाव होत जातो त्या प्रमाणात इंटरनेटच्या वापरासाठी नवे व्यासपीठ तयार होत जातात. अशा तंत्रज्ञानाचा वापर हा सातत्याने वाढत जाणार असून त्यातील अनेक घटक आपल्याला अनपेक्षित असतील. यामुळे भविष्यात इंटरनेटची क्षमता वाढविण्याचे ध्येय असेल.
– ज्युतली वूड्स-मॉस, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य विपणन अधिकारी, टाटा टेलिकम्युनिकेशन