News Flash

भारतभर.. एकच नंबर!

एखाद्या टेलिकॉम सर्कलमधून दुसऱ्या टेलिकॉम सर्कलमध्ये गेल्यानंतर मोबाइलग्राहकाला ‘रोमिंग शुल्क’ मोजावे लागते.

| July 7, 2015 06:54 am

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी आता देशव्यापीमोबाइल ऑपरेटरकडून बिलात केली जाणारी अवाजवी आकारणी, कॉलचे चढे दर, छुप्या मार्गाने केली जाणारी आर्थिक लूट, नेटवर्कची समस्या, चांगला प्लॅन, वेगवान किंवा स्वस्त इंटरनेट सुविधा अशा विविध कारणांमुळे ग्राहकांना मोबाइल सेवा पुरवणारी कंपनी बदलण्याची इच्छा असते. मात्र, कंपनी बदलताच नंबर बदलण्याची व पर्यायाने या नंबरशी संबंधित संपर्क गमावण्याची भीती असल्याने मोबाइल ऑपरेटर बदलण्यास ग्राहक धजावत नव्हते. अशा ग्राहकांना केंद्रीय दूरसंचार विभागाने ‘मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी’च्या रूपात चांगला दिलासा दिला आहे. गेल्या ३ जुलैपासून ही सेवा देशव्यापी करण्यात आल्याने आता खऱ्या अर्थाने ग्राहकांच्या अधिकाराला बळ मिळाले आहे.
खरे तर भारतात मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी अर्थात ‘एमएनपी’ २०११पासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे या सुविधेबद्दल बहुतांश मोबाइलग्राहकांना माहिती आहे. मात्र, आतापर्यंत केवळ आपल्या टेलिकॉम सर्कलपुरतीच मर्यादित असलेली ही सुविधा आता देशभर लागू झाली असल्याने आपला मोबाइल क्रमांक न बदलता देशाच्या कानाकोपऱ्यात स्थलांतरित होणे शक्य झाले आहे. जास्त बिल, खराब नेटवर्क, दर्जाहीन सेवा अशा विविध कारणांनी आपल्या मोबाइल ऑपरेटरला कंटाळलेल्या लाखो ग्राहकांनी गेल्या चार वर्षांत या सुविधेचा लाभ घेतला आहे. तरीही ‘एमएनपी’ राष्ट्रव्यापी झाल्याने काय बदल होणार आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
एखाद्या टेलिकॉम सर्कलमधून दुसऱ्या टेलिकॉम सर्कलमध्ये गेल्यानंतर मोबाइलग्राहकाला ‘रोमिंग शुल्क’ मोजावे लागते. ‘रोमिंग’मध्ये ‘आउटगोइंग कॉल्स’चे दरही जास्त आकारले जातात. विशेष म्हणजे, एखादा ग्राहक कायमस्वरूपी किंवा दीर्घ काळासाठी दुसऱ्या टेलिकॉम सर्कलमधील शहरात स्थायिक झाला तर त्याला तितका काळ हा भरुदड सोसावा लागतो. २०११पासून लागू झालेल्या ‘मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी’ अंतर्गतदेखील ग्राहकाला आपला नंबर न बदलता त्या सर्कलमधील स्थानिक मोबाइल ऑपरेटरकडे स्थानांतर करता येत नव्हते. हा पेच ३ जुलैपासून अमलात आलेल्या राष्ट्रीय नंबर पोर्टेबिलिटी (एनएनपी) सुविधेमुळे सुटला आहे. या सुविधेमुळे देशाच्या कोणत्याही भागात ग्राहकाला आपला मोबाइल नंबर न बदलता तेथील स्थानिक मोबाइल कंपनीची सेवा मिळवणे शक्य होणार आहे.
कंपन्यांची धावाधाव आधी आणि नंतर..
२०११मध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीचा अधिकार ग्राहकांना बहाल केला तेव्हाच मोबाइल कंपन्यांनी ओरड सुरू केली होती. आपले ग्राहक दुसऱ्या कंपन्यांकडून पळवले जातील, अशी भीती प्रत्येक कंपनीला वाटत असल्याने ‘एमएनपी’बाबत कंपन्या सकारात्मक नव्हत्या. त्यामुळे ‘एमएनपी’ देशव्यापी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतरही त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडत होती. याला तांत्रिक अडचणीही कारणीभूत आहेत. कारण आजघडीला भारतात १९ टेलिकॉम सर्कल आणि ११ मोबाइल ऑपरेटर कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनी प्रत्येक सर्कलमधील प्रत्येक ग्राहकाच्या मोबाइल वापराची नोंद ठेवत असते. ‘एमएनपी’ लागू झाल्यानंतर सर्कलअंतर्गत ग्राहकांचे स्थानांतर शक्य झाले. मात्र, एखादा ग्राहक आपल्या सध्याच्या टेलिकॉम सर्कलबाहेरील क्षेत्रातील सेवा घेण्यास इच्छुक असेल तर त्यासाठी अनेक तांत्रिक बदल आणि नोंदी करण्याची गरज लागते. मोबाइल कंपन्यांनी आपल्या यंत्रणेत या बदलाचा समावेश करण्यासाठी चार वर्षे घेतली. त्यामुळे एमएनपी अमलात येण्यास जुलै २०१५ उजाडले.
आता ही सुविधा लागू झाल्यानंतर कंपन्यांची दुसऱ्या कंपन्यांचे ग्राहक मिळवण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे.  एअरटेलने आपल्या ग्राहकांना आपल्याच कंपनीच्या दुसऱ्या सर्कलमध्ये २४ तासांच्या आत स्थानांतर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिवाय अशा ग्राहकांना त्यांचा नंबर स्थानांतरित होईपर्यंत मोफत रोमिंग सुविधा देण्याचेही जाहीर केले आहे. हे ग्राहक आपल्या प्रीपेड कार्डमधील रक्कम किंवा पोस्टपेड कार्डवरील थकबाकीदेखील स्थानांतरित करू शकतील, असे एअरटेलने म्हटले आहे. व्होडाफोन, आयडिया, रिलायन्स या कंपन्यांनीही आपले ग्राहक कायम ठेवतानाच दुसऱ्या कंपन्यांच्या ग्राहकांसाठी आकर्षक कॉल प्लॅनच्या पायघडय़ा घालण्यास सुरुवात केली आहे.

अशी होणार प्रक्रिया
* जेव्हा तुम्ही तुमचा नंबर स्थानांतरित करण्यासाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला तुमच्या विद्यमान ऑपरेटरकडे ‘सीएएफ’ अर्ज भरावा लागतो. याशिवाय तुम्हाला तुमच्या मोबाइलवरून  ‘ ढडफळ <तुमचा मोबाइल क्रमांक>’ असा संदेश १९०० या क्रमांकावर पाठवावा लागेल.
* तुम्ही मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला एक ‘युनिक पोर्ट कोड’ पुरवला जातो. अशा वेळी तुमचे विद्यमान नेटवर्क ‘डोनर नेटवर्क’ ठरते. ते तुमचा अर्ज/विनंती ‘मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी क्लीअिरग हाऊस’कडे (एमसीएच) पाठवते. ‘एमसीएच’ तुमची विनंती तुमच्या विद्यमान मोबाइल कंपनीकडे पाठवते. ही कंपनी तुमच्या बिलाची थकबाकी किंवा अन्य शुल्क यांची तपासणी करते.
* ही पडताळणी व्यवस्थित पार पडल्यानंतर तुमचा नंबर ‘पोर्ट’ होण्यासाठी पात्र ठरवला जातो. (या दरम्यानच्या काळात तुम्हाला तुमच्या विद्यमान मोबाइल ऑपरेटरकडून स्थानांतरित न होण्याची विनंती करणारे किंवा आकर्षक प्लॅन्स सादर करणारे दूरध्वनी येतील. त्यामुळे याची तयारीही ठेवावी लागेल!)
* तुमचा पोर्टिग कोड तुम्ही ज्या कंपनीकडे स्थानांतरित होऊ इच्छिता तेथे पाठवला जातो. त्या कंपनीकडून तुम्हाला नवीन सिमकर्ड दिले जाते. त्यानंतर तुमची जुनी कंपनी तुमची सेवा खंडित करते व नवीन कंपनी सेवा पुरवण्यास सुरुवात करते.
* या संपूर्ण प्रक्रियेला सात दिवस आणि १९ रुपये इतका खर्च येतो.
* एकदा नंबर स्थानांतरित झाला की पुढे ९० दिवस तुम्हाला ‘एमएनपी’चा लाभ घेता येत नाही.

– आसिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 6:54 am

Web Title: mobile noumber portablity
टॅग : Tech
Next Stories
1 फोन फोर-जी
2 इंटरनेटची शाळा
3 वायरलेस हॅण्डसेट
Just Now!
X