02 March 2021

News Flash

मैफिल मराठी गाण्यांची

गाणी ऐकणे आणि ती गुणगुणत त्यात रममाण होणे हा लहान-थोरांचा आवडता छंद. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी असते.

| March 17, 2015 06:23 am

गाणी ऐकणे आणि ती गुणगुणत त्यात रममाण होणे हा लहान-थोरांचा आवडता छंद. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी असते. मराठी, िहदी गाणी याबरोबरच काही जणांना शास्त्रीय संगीत ऐकण्यात रस असतो. एकूण काय कर्णमधुर सुरेल संगीत सर्वानाच भावते. आपण कामात कितीही व्यस्त असलो किंवा मनावर कसलाही ताण असला तरी गाणी ऐकताना हा ताण हलकेच दूर होतो. मनाला विरंगुळा मिळतो.
पूर्वी अनेकजण आवडीच्या गाण्यांच्या रेकॉर्ड्स, कॅसेट्स जमवायचे. नंतर त्याची जागा सीडीजनी घेतली. आता इंटरनेटवर हे  सहजपणे उपलब्ध आहे सर्वानाच माहीत आहे. मराठी संगीतप्रेमींची ही आवड लक्षात घेऊन अलका विभास यांनी ‘आठवणीतील गाणी’  (http://www.aathavanitli-gani.com/) नावाची साइट तयार करून हे शिवधनुष्य पेलले आणि आपल्यासाठी श्रवणीय अशा ३००० मराठी गीतांचा खजिना उपलब्ध करून दिला. दिवसेंदिवस हा आकडा वाढतोच आहे.
ही साइट अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने बनवली आहे. मुख्य म्हणजे ही साइट मराठी भाषेत आहे. आवडीचे गाणे शोधण्यासाठी सहज सोपी अनुक्रमणिका येथे दिली आहे. ‘नाच रे मोरा’ हे सुंदर गाणे ऐकण्यासाठी अनुक्रमणिकेतील ‘न’वर क्लिक करून तुम्हाला न अक्षराने सुरू होणाऱ्या गाण्यांची यादी दिसू शकते. गीतकार, संगीतकार, स्वर, चित्रपट, नाटक, संतवाणी, गीतरामायण, विविध वाहिन्यांवरील मालिका गीते अशाप्रकारे गाण्यांचे वर्गीकरण केलेले आहे.
भक्तीगीते, भावगीते, बालगीते याप्रकारे गाणी ऐकायची आहेत? अलकाताईंनी त्यासाठी गीत प्रकारानुसारही गाण्यांचे वर्गीकरण करून दिले आहे. तुम्हाला एखाद्या विशिष्ट  रागप्रकाराची गाणी ऐकायची असतील तर त्यासाठी त्यांनी रागसरिता हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आवडीच्या रागावर क्लिक करून तुम्ही ती गाणी ऐकू शकता.
तसेच एखादे गाणे विविध गायकांनी गायलेले असते. उदाहरणार्थ ‘एका तळ्यात होती बदके’ हे गाणे आशा भोसले आणि मधुबाला जव्हेरी या दोघींच्या आवाजात आपल्याला ऐकायला मिळते. अशी काही निवडक गाणी तुम्हाला स्वराविष्कारखाली दिसतील. तुम्ही एखादे गाणे निवडल्यावर गाण्यासंबंधीची माहिती (गीतकार, संगीतकार, स्वर, चित्रपट/नाटक) दिलेली आहे. गाण्याबद्दल काही आठवणी असतील तर त्याही दिलेल्या आहेत. प्रभाकर जोग, सुधीर मोघे, अरुण दाते यांसारख्या अनेक मान्यवरांच्या आठवणी आपल्याला वाचायला मिळतील. मुख्य म्हणजे गाणे निवडले असता गाण्याचे शब्दसुद्धा स्क्रीनवर वाचू शकता आणि ते िपट्र करण्याची सोयही उपलब्ध आहे. काही गाण्यांसाठी व्हिडीओ िलकदेखील दिलेल्या आहेत.
थोडक्यात, रसिकांसाठी गाण्यांच्या मेजवानीची जय्यत तयारी झालेली आहे. आता कोणत्या गाण्यांनी मंत्रमुग्ध व्हायचे हे तुम्ही ठरवायचे आहे.
– मनाली रानडे
manaliranade84@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 6:23 am

Web Title: online marathi songs
Next Stories
1 तुमच्या मोबाईलवर कसा सुरू होईल व्हॉट्सअ‍ॅप कॉल?
2 मनात धरलेली व्यक्ती स्क्रिनवर दाखवणारा अदभुत ‘वेब जीनी’
3 मोबाइलच्या विश्वात
Just Now!
X