मवाळ पँथर

पँथर हा शब्द उच्चारला, की सळसळत्या ऊर्जेचं, भारदस्त आणि धडकी भरवणारं जंगलातलं चैतन्य डोळ्यासमोर उभं राहतं. संगणकविश्वात उत्तमोत्तम डिव्हाइस निर्मिणाऱ्या आयबॉल कंपनीने ‘अँडी ५के पँथर’ नावाचा स्मार्टफोन नुकताच लाँच केला.

पँथर हा शब्द उच्चारला, की सळसळत्या ऊर्जेचं, भारदस्त आणि धडकी भरवणारं जंगलातलं चैतन्य डोळ्यासमोर उभं राहतं. संगणकविश्वात उत्तमोत्तम डिव्हाइस निर्मिणाऱ्या आयबॉल कंपनीने ‘अँडी ५के पँथर’ नावाचा स्मार्टफोन नुकताच लाँच केला. मात्र हा पँथर नावलौकिलाला साजेसा नाही हे पाहता क्षणीच लक्षात येतं. स्मार्टफोनधारकांच्या सर्वसाधारण गरजा पूर्ण करणारा हा एक मवाळ पँथर असेच म्हणावे लागेल.
स्मार्टफोन वापरण्याची प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते, मात्र फोनचा लूक हा मुद्दा जिव्हाळ्याचा असतो. कॉलेजिअन्सपासून कॉर्पोरेट जॉब करणाऱ्या मंडळी ते पन्नाशीत येऊनही टेक्नोसॅव्ही असणाऱ्या प्रत्येकाला आपला फोन दिसायला कुल, फन्की असावा असं मनापासून वाटतं. फोन पाहताच ‘बंदे में कुछ दम है’ अशी एक दाद घरच्यांनी, मित्रमैत्रिणींनी, ऑफिसातल्या मंडळींनी दिली, की आपण भरून पावतो. पँथर नावाने उत्सुकता चाळवली जाते, मात्र त्याचे मुखदर्शन होताच भ्रमनिरास होतो. फोनच्या लूकमध्ये वाईट असं काहीच नाही; पण मोहात पडावं, पाहतच राहावं असंही
काहीच नाही.
सगळ्यात मूलभूत यामध्ये डय़ुअल सिमकार्डची व्यवस्था आहे. दोन्ही सिम स्लॉट मोठय़ा सिमचेच आहेत. पाच इंच स्क्रीन असल्याने खिशात ठेवायला आणि प्रवासात हाताळायला सुटसुटीत आहे. फोन वजनाला खूपच हलका असल्याने स्मार्टफोन बाळगतोय असं वाटतच नाही. ऑक्ट्रा कोअर १.४ गिगाहर्ट्झ कॉट्रेक्स असा दणकट प्रोसेसर या फोनला लाभला आहे. मात्र या प्रोसेसरचा सदुपयोग होईल अशी साथ बाकीचे फीचर्स देत नाहीत. १ जीबी रॅम देण्यात आल्याने हालचालीला मर्यादा आहेत. स्मार्टफोन कंपन्यांमधील तीव्र स्पर्धेमुळे डेटा साठवण्याची क्षमता आणि कॅमेरा अत्याधुनिक देण्याचा प्रयत्न होतो. पँथरमध्ये इंटर्नल स्टोरेज क्षमता फक्त ८ जीबी एवढी आहे. गाणी, चित्रपट, व्हिडीओप्रेमी मंडळींसाठी ही स्पेस कमी पडू शकते आणि म्हणूनच ३२ जीबी एक्सपान्डेबलची यंत्रणा उपलब्ध आहे. ८ मेगापिक्सल कॅमेऱ्याचा दर्जा उत्तम आहे, मात्र रात्रीच्या- कमी उजेडातल्या फोटोंचा दर्जा तितका चांगला नाही. हँडिकॅममधून काढलेल्या फोटोप्रमाणे फोनच्या कॅमेऱ्यातून काढलेल्या फोनवर डाव्या बाजूला तारीख, वेळ अशी निळ्या अक्षरांत नोंद येते. एका अर्थाने पाहायला गेल्यास ही बाब उपयुक्त आहे; पण आवश्यकता नसताना त्याची नोंद डोकेदुखीही ठरू शकते. एचडी व्हिडीओ रेकॉíडंगची सुविधा यामध्ये नाही. त्यामुळे दर्जात्मक फरक पाहायला मिळतो.
पँथरकर्त्यांनी सोयीसुविधांमध्ये ध्रुवीकरण केल्याचे जाणवते. ४.४.२ किटकॅट हे अँड्राइडचे सुरेख व्हर्जन पुरवण्यात आले आहे, मात्र त्याच वेळी फोन लॉक, अनलॉकसाठी कोणताही विशेष कोड किंवा पासवर्ड यंत्रणा नाही. आयबॉलच्या लोगोवर क्लिक करताच फोनचा वापर सुरू करता येतो. स्मार्टफोन ही अगदीच वैयक्तिक मालमत्ता असते. अनेक कामांसंदर्भातील गोष्टी यावर नोंदलेल्या असतात. त्यामुळे माहितीची सुरक्षितता फोन वापरणाऱ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची असते. पँथर याबाबतीत निराशा करतो. अर्थात अँड्रॉइडवरील अ‍ॅप्सच्या मदतीने हे काम करता येऊ शकतं. फोनला संजीवनी देण्यासाठी चार्जर असतो. अनेकदा स्विचबोर्डजवळ फोन ठेवण्यासाठी जागा नसते. अशा वेळी चार्जिग कॉर्ड मोठी असेल तर उपयुक्त ठरतं; पण या फोनची चार्जिग कॉर्ड बेतास बेत अंतराची आहे. यामुळे स्विचबोर्डजवळ फोन ठेवायला काही नसेल तर फोन लोंबकळत ठेवावा लागतो. आयबॉलतर्फे बायडिफॉल्ट देण्यात आलेले वॉलपेपर बालिश स्वरूपाचे आहेत. नावाशी साधम्र्य राखणारा पँथर फोन ऑन केल्यावर अवतरतो. मात्र अ‍ॅनिमेटेड कृत्रिम पँथर पाहून आपला पुढच्या गोष्टी पाहण्याचा उत्साह मावळतो.
नेहमीच्या अ‍ॅप्लिकेशन्सच्या जोडीला बुक माय शो, फ्लिपकार्ट, ऑपेरा मिनी, ओएलक्स, डॉ. सेफ्टी, अशी अ‍ॅप्लिकेशन्स बाय डिफॉल्ट पुरवण्यात आली. आयवॉच बेसिक हे आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरणारे अ‍ॅप्लिकेशन आहे. व्हॉट्स अप, फेसबुक हे लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशन्स व्यवस्थित चालतात.
गाणी ऐकण्यासाठी देण्यात आलेले हेडफोन्स आकर्षक आहेत, मात्र ध्वनी दर्जा ठीकठाक आहे. सगळ्या स्मार्टफोन्सची गाडी बॅटरी या ट्रॅकवरून घसरते. १९०० एमएएच क्षमतेची बॅटरी फोनमध्ये आहे, जी साधारण एक दिवस पुरते; पण सातत्याने व्हॉट्सअपसारखी हेवी अ‍ॅप्लिकेशन्स वापरात असतील, तर नेहमीची रडगाथा सुरू करावी. कनेक्टिव्हिटीसाठी थ्रीजी-टूजी, वायफाय, ब्ल्यूटूथ या सगळ्या सुविधा फोनमध्ये आहेत. सिम काढता-घालताना बॅटरी बाहेर काढण्याचा उपद्व्याप करावा लागतो.
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या फोनची किंमत. १३,००० रुपयांमध्ये म्हणजे तुलनेने बऱ्याच कमी किमतीत बेसिक गरजा पूर्ण करणारा हा नॉर्मल स्मार्टफोन आहे, मात्र केवळ किंमत कमी आहे म्हणून पँथरच्या नादाला लागणं नुकसान करू शकतं.
थोडक्यात
नाव    – आयबॉल अँडी ५ के  पँथर
रंग    – वाइन, मिल्की सिल्व्हर
किंमत    – १२,९९९ रुपये फक्त
डिझाइन    – पाच इंच
प्रोसेसर    -ऑक्ट्रा कोअर १.४ गिगाहर्ट्झ कॉरट्रेक्स
स्टोरेज    – १ जीबी रॅम     
जीबी इंटर्नल मेमरी- एक्सपान्डेबल ३२ जीबी
कॅमेरा    – ८ मेगापिक्सल, फ्रँटकॅमेरा- २ मेगापिक्सल
बॅटरी    -१९०० एमएएच
कनेक्टिव्हिटी    – थ्रीजी, जीपीआरएस, वायफाय, ब्ल्यूटूथ.
अँड्राइड    – ४.४.२ किटकॅट
सिम    – डय़ुअल
फोनसह काय    – मुख्य हँडसेट, बॅटरी, ट्रॅव्हल अ‍ॅडॅप्टर, यूएसबी केबल, युझर मॅन्युअल, वॉरंटी कार्ड

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Iball andi 5k panther

ताज्या बातम्या