News Flash

स्वस्तातले ‘४जी’ फोन

स्मार्टफोनच्या माध्यमातून अधिकाधिक लोक इंटरनेटचा वापर करू लागले आहेत.

कमी किमतीत ‘फोर जी’ सुविधेचा वापर करू देणाऱ्या स्मार्टफोन

सध्या इंटरनेट हा सर्वात जिव्हाळय़ाचा विषय बनला आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून अधिकाधिक लोक इंटरनेटचा वापर करू लागले आहेत. त्याचबरोबर मोबाइल कंपन्यांनी अतिशय माफक दरात अतिवेगवान इंटरनेटची सुविधाही पुरवण्यास सुरुवात केली आहे. भारतात सध्या सर्वाधिक वेगवान मोबाइल इंटरनेट सुविधा ‘४ जी’ तंत्रज्ञानावर आधारित आहे. साहजिकच या वेगवान इंटरनेट सुविधेकडे वळणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, ‘४जी’चा लाभ घ्यायचा म्हटलं की स्मार्टफोनही महागडा घ्यावा लागतो, असा एक अपसमज ग्राहकांमध्ये आहे. या पाश्र्वभूमीवर कमी किमतीत ‘फोर जी’ सुविधेचा वापर करू देणाऱ्या स्मार्टफोनबद्दल..

जिवीचा ‘टच अ‍ॅण्ड टाइप’ फोन

सध्या बाजारात उपलब्ध असलेले सर्वच स्मार्टफोन टचस्क्रीनवर आधारित असतात. टचस्क्रीनमुळे मोबाइल हाताळणे सोपे झाले असले, तरी साधे फीचर फोन वापरण्याची सवय असलेल्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना टचस्क्रीन स्मार्टफोन हाताळणे कठीण जाते. हाच विचार करून जिवी या मोबाइल कंपनीने ‘टच अ‍ॅण्ड टाइप’ अशी दुहेरी सुविधा असलेला स्मार्टफोन बाजारात आणला आहे. ‘रिव्होल्युशन टीएनटी३’ नावाच्या या फोनमध्ये टचस्क्रीनची सुविधा आहेच; पण त्यासोबतच एक कीपॅडही पुरवण्यात आले आहे. हा ‘४जी’ तंत्रज्ञानाशी सुसंगत फोन अवघ्या ३९९९ रुपयांना बाजारात उपलब्ध झाला आहे. फोनची स्क्रीन ४ इंच आकाराची असून सोबत फिंगर प्रिंट सेन्सरही पुरवण्यात आला आहे. फोनमध्ये १.३ गिगाहार्ट्झचा प्रोसेसर असून बॅटरी २३०० एमएएच क्षमतेची आहे. सध्या देशभरातील निवडक रिटेल दुकानांत हा फोन विक्रीस उपलब्ध असून येत्या फेब्रुवारीपर्यंत तो सर्वत्र उपलब्ध होईल, असे कंपनीने म्हटले आहे.

लाइफ फ्लेम ३

रिलायन्सच्या जिओ नेटवर्कशी अतिशय सुसंगत असलेल्या ‘लाइफ’चा फ्लेम३ हा स्मार्टफोन नव्यानेच स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी अतिशय स्वस्त पर्याय आहे. अँड्रॉइड ५.१ ऑपरेटिंग सिस्टीम, चार इंचाची स्क्रीन, ४८० बाय ८०० रेझोल्युशनचा डिस्प्ले, १.५ गिगाहार्ट्झचा क्वाडकोअर प्रोसेसर, ५१२ एमबी रॅम, चार जीबी स्टोअरेज, १७०० एमएएच क्षमतेची बॅटरी, पाच मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा आणि दोन मेगापिक्सेलचा फंट्र कॅमेरा अशी या फोनची वैशिष्टय़े आहेत. हा फोन बहुतांश मोबाइल दुकानांत उपलब्ध आहे. याची किंमत २९९९ रुपये इतकी आहे.

कार्बन ऑरा

कार्बन या कंपनीने नेहमीच भारतातल्या अल्प उत्पन्न श्रेणीतील मोबाइल ग्राहकांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. या कंपनीचाच ‘कार्बन ऑरा’ हा फोरजी स्मार्टफोन ग्राहकांसाठी चांगला पर्याय आहे. अँड्रॉइड ४.४ ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित या फोनमध्ये ५ इंचाचा डिस्प्ले पुरवण्यात आला आहे. १.२ गिगाहार्ट्झचा क्वाडकोअर प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये ५१२ एमबी रॅम आहे. तर, या फोनची अंतर्गत स्टोअरेज क्षमता आठ जीबी इतकी आहे. या फोनमध्ये मागील बाजूस पाच एमपी तर पुढील बाजूने दोन एमपीचा कॅमेरा असून याची बॅटरी दोन हजार एमएएच क्षमतेची आहे. या फोनची किंमत ३४४९ रुपये इतकी आहे.

लेनोव्हो ए२०१०

लेनोव्होचा ए२०१० हा स्मार्टफोन फोरजी तंत्रज्ञानावर आधारित स्वस्त दरातील आणखी एक वैशिष्टय़पूर्ण फोन आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड ५.१ ऑपरेटिंग सिस्टीम असून फोनमध्ये ४.५ इंचाचा ४८० बाय ८५४ डिस्प्ले पुरवण्यात आला आहे. या फोनचा प्रोसेसर एक गिगाहार्ट्झचा प्रोसेसर असून त्याला एक जीबी रॅमची जोड मिळाली असल्याने फोनची कार्यक्षमता चांगली आहे. या फोनमध्ये आठ जीबीची अंतर्गत स्टोअरेज असून ती ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. मागील बाजूस पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेल्या या फोनला एलईडी फ्लॅशची सुविधाही पुरवण्यात आली आहे. तसेच पुढील बाजूस दोन मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरवण्यात आला आहे. फोनची बॅटरी दोन हजार एमएएच क्षमतेची असून तो काळय़ा व पांढऱ्या रंगांत उपलब्ध आहे. या फोनची किंमत ४९९९ रुपये इतकी आहे.

इंटेक्स अ‍ॅक्वा क्रेझ

इंटेक्स या कंपनीच्या स्मार्टफोननी कमी किंमत श्रेणीतील बाजारपेठेत चांगले स्थान कमावले आहे. याच कंपनीचा ‘अ‍ॅक्वा क्रेझ’ हा स्मार्टफोन वापरकर्त्यांना ‘फोरजी’ वापराची सुविधा देतो. पाच इंचाची स्क्रीन असलेल्या या फोनचे डिस्प्ले रेझोल्युशनपण ७२० बाय १२८०असे आहे. यामध्ये एक जीबीची रॅम आणि एक गिगाहार्टझचा क्वाडकोअर प्रोसेसर असल्याने फोनवरील अ‍ॅप्स वेगाने हाताळता येतात. या फोनची बॅटरीही २५०० एमएएच क्षमतेची आहे. महत्त्वाचे म्हणजे या फोनचा मागील कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा असून पुढील बाजूस दोन मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरवण्यात आला आहे. त्यामुळे या फोनवरील छायाचित्रेही चांगल्या दर्जाची आहेत. या फोनची किंमत ४७०० रुपयांच्या आसपास आहे.

स्वाइप एलाइट स्टार

अँड्रॉइड ६.० या ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित ‘स्वाइप एलाइट स्टार’ या फोनची स्क्रीन चार इंच आकाराची असून त्यात ४८० बाय ८०० रेझोल्युशन आहे. या फोनमध्ये १.५ गिगाहार्ट्झ क्षमतेचा सीपीयू पुरवण्यात आला असून एक जीबी रॅममुळे फोनची कार्यक्षमता चांगली आहे. दोन हजार एमएएच क्षमतेच्या बॅटरीमुळे वापरकर्त्यांना सतत चार्जिगचे कष्ट पडत नाहीत. या फोनमध्ये मागील बाजूस पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा असला तरी पुढील बाजूस असलेला १.३ मेगापिक्सेलचा कॅमेरा सेल्फीची आवड असणाऱ्यांना निराश करू शकतो. या फोनमध्ये १६ जीबीची स्टोअरेज पुरवण्यात आली असून ती मेमरी कार्डनिशी वाढवताही येऊ शकते. या फोनची किंमत ३९९९ रुपये इतकी आहे.

इंटेक्स अ‍ॅक्वा स्टार

इंटेक्स कंपनीचा पाच हजार रुपयांच्या खाली उपलब्ध असलेला हा आणखी एक फोरजी स्मार्टफोन आहे. पाच इंचाची स्क्रीन असलेल्या या फोनमध्ये १२८० बाय ७२० पिक्सेलचा एचडी डिस्प्ले पुरवण्यात आला आहे. त्यामुळे या फोनवरून व्हिडीओ पाहण्याचा आनंद चांगला आहे. या फोनमध्ये एक जीबी रॅम पुरवण्यात आली असून क्वाडकोअर मीडियाटेकच्या प्रोसेसरची त्याला जोड लाभली आहे. ‘अ‍ॅक्वा स्टार’ची अंतर्गत स्टोअरेज आठ जीबी असून ती वाढवण्याचीही सुविधा आहे. या फोनचा मागील कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा आहे. मात्र, पुढील बाजूस अवघ्या दोन मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरवण्यात आल्याने तुम्ही जर सेल्फीचे वेडे असाल तर, स्वस्त दरातल्या फोनसाठी तुम्हाला हा पर्याय नाही. या फोनची बॅटरी दोन हजार एमएएच क्षमतेची आहे. या फोनची बाजारातील अंदाजे किंमत ४९९४ रुपये इतकी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 4:33 am

Web Title: cheapest android smartphones with 4g
Next Stories
1 हेडफोनच्या दुनियेत
2 फेसबुक सांभाळा!
3 अँड्रॉइडची स्मार्ट गुपिते
Just Now!
X