05 June 2020

News Flash

ही किमया स्पर्शाची

‘टचस्क्रीन’ हा आजच्या घडीला परवलीचा शब्द आहे

स्मार्टफोनपासून वेअरेबलपर्यंत आणि लॅपटॉपपासून टॅब्लेटपर्यंतची अनेक उपकरणे आपल्या नियमित वापरात आली आहेत. मुळातच त्यांची हाताळणी व्यवस्था अतिशय सहजसोपी असल्याने अगदी कमी काळात लहान मुलेही या उपकरणांशी अवगत होतात. पण हे सगळं वरवरचंच! या उपकरणांमध्ये प्रक्रिया कशा चालतात, यातील भाग कसे काम करतात अशा प्राथमिक प्रश्नांपासून या उपकरणांमध्ये बदल करता येतील का, त्यातील बिघाड आपल्यालाच दुरुस्त करता येईल का, असे तांत्रिक प्रश्न प्रत्येकालाच सतावत असतात. अशाच शंकांचं निरसन करणारं हे नवीन सदर..

स्पर्शाची भाषा म्हणे वेगळी असते. स्पर्शातून एकाच वेळी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माया वगैरे अनेक भावना जाणवतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये स्पर्शाने तंत्रज्ञानाच्या जगतात बोटं फिरवली आणि तिथली भाषाही आत्मसात केली. ‘टचस्क्रीन’ हा आजच्या घडीला परवलीचा शब्द आहे. सध्या तरी आपण मोबाइल फोन्समधल्या टचस्क्रीनबद्दलच बोलू या.
पारंपरिक की-पॅड असणारे मोबाइल फोन्स तर केव्हाच मागे पडलेत. मात्र त्या फोन्सचं एक बरं होतं. की-पॅड गंडलं, बिघडलं की बदलून मिळत होतं. त्यासाठी फार खर्चही येत नसे. पण ‘टचस्क्रीन’ मोबाइल फोन्सच्या बाबतीत मात्र तसं नाही. मोबाइलचं स्पर्शज्ञान कमी झालं किंवा संपलं की खिशाला मोठा फटकाच. हा फटका बसण्याआधी काही उपाय करता येतात. ते निष्फळ ठरले की मग मात्र खिसा रिकामा करण्याशिवाय पर्याय नाही. हे उपाय तर आपण बघणारच आहोत पण त्या आधी बघू या की मुळात मोबाइलला स्पर्शज्ञान होतं कसं!
टचस्क्रीनमध्ये प्रामुख्याने तीन प्रकार आहेत- ‘रेझिस्टिव सिस्टीम’, ‘कॅपॅसिटिव्ह’ किंवा ‘इलेक्ट्रॉस्टॅटिक टचस्क्रीन’ आणि ‘इन्फ्रारेड टचस्क्रीन’.
रेझिस्टिव्ह सिस्टीम : विंडोज फोन्समध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जातं. पाणी आणि धूळरोधक असं हे तंत्रज्ञान स्वस्त असलं तरी अशा स्क्रीन्सवर स्क्रॅचेस लवकर येतात.
एक पॉलिस्टिक प्लास्टिक आणि एक काच असे दोन थर असतात. हे दोन्ही थर प्लास्टिक किंवा विसंवाही पटलाने (इन्सुलेटिंग मेम्ब्रेन) वेगळे केलेले असतात. जेव्हा आपण स्क्रीनवर बोट ठेवतो तेव्हा प्लास्टिकचा थर काचेच्या थराला स्पर्श करतो आणि सर्किट पूर्ण होतं. की-बोर्डमध्ये जसं होतं अगदी तसंच. ज्या जागेवर आपण बोट ठेवतो त्याचे सहनिर्देशक (को-ऑर्डिनेट्स) स्क्रीनच्या आतल्या बाजूला असणारी चीप जाणते आणि पुढच्या प्रक्रियेसाठी मदरबोर्डकडे पाठवते.
कॅपॅसिटिव्ह टचस्क्रीन- सध्याच्या मोबाइल फोन्समध्ये प्रामुख्याने वापरलं जातं ते तंत्रज्ञान म्हणजे कॅपॅसिटिव्ह किंवा इलेक्ट्रॉस्टॅटिक टचस्क्रीन. याचं कारण म्हणजे या तंत्रज्ञानामध्ये मल्टिपल टच शक्य असतं.
यामध्ये काचेचे अनेक थर असतात, पण सर्वात बाहेरचा आणि सर्वात आतला असे दोन्ही थर इलेक्ट्रिकली चार्ज असतात. थोडक्यात सांगायचं तर हे दोन थर कॅपॅसिटरसारखं काम करतात. जेव्हा बोट स्क्रीनवर ठेवलं जातं तेव्हा त्यांच्यातलं विद्युत क्षेत्र (इलेक्ट्रिक फिल्ड) विचलित होतं. आणि जिथे बोट ठेवलं आहे तिथले सहनिर्देशक चीप ओळखतं आणि पुढची प्रक्रिया होते. हे तंत्रज्ञान महाग आहे मात्र टिकाऊ आहे. तसंच एकापेक्षा अनेक टचची सुविधा असल्यामुळे अ‍ॅपलपासून ते अनेक कंपन्या हे तंत्रज्ञान वापरतात.
इन्फ्रारेड टचस्क्रीन- मिशन इम्पॉसिबल सिनेमामधला इन्फ्रारेड अलार्म आठवतोय का? अगदी तसाच इन्फ्रारेड टचस्क्रीनचं कामकाज चालतं.
स्क्रीनच्या वर आणि आजूबाजूला सेन्सर्स असतात ज्यामुळे इन्फ्रारेड किरणं निघत असतात. बोट अथवा स्टायलस स्क्रीनवर ठेवल्यानंतर ही किरणं विचलित होतात आणि कुठल्या ठिकाणी बोट किंवा स्टायलसचा स्पर्श झाला आहे ते कळून येतं. मुळातच सेन्सर्सचा वापर असल्यामुळे हे तंत्रज्ञान खूपच महाग असतं. त्यामुळेच मोबाइल फोन्समध्ये याचा वापर फारसा होत नाही.

१) सर्वात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे मोबाइल रिस्टार्ट करायचा. यानंतर टचस्क्रीन सुरू होण्याची शक्यता ८० टक्के असते. अनेकदा स्क्रीन मॅनेजिंग अ‍ॅप्लिकेशन्स टचस्क्रीनला प्रतिसाद देत नाहीत. रिस्टार्ट केल्यानंतर ती पुन्हा कामाला लागतात.
२) दुसरा सोपा उपाय म्हणजे सिम कार्ड, मेमरी कार्ड, बॅटरी काढून पुन्हा घालणं. अनेकदा काही अ‍ॅप्लिकेशन्स हँग झाल्यामुळे टचस्क्रीनच्या अ‍ॅप्लिकेशनवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
३) डिव्हाइस हार्ड रिसेट करा. अर्थात हे करण्याआधी मोबाइलमधला बॅकअप घ्या, कारण रिसेट केल्यानंतर मोबाइल पुन्हा बालवाडीत जातो आणि बालवाडीत जाताना तो सगळा डेटाही डीलीट करतो.
४) हा पर्याय स्वत:च्या जबाबदारीवर करा. अनेकदा स्क्रीन आणि मदरबोर्ड यांच्यातली वायर सैल होते. अशा वेळी स्क्रीनवर हलक्या टिचक्या मारल्यानंतर टचस्क्रीन सुरू होतो. कृपया जोरात टिचक्या मारू नका स्क्रीन फुटू शकतो.
५) भरमसाट अ‍ॅप्लिकेशन्स इन्स्टॉल केलेली असल्यास टचस्क्रीनच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. मोबाइलच्या ऑपरेटिंग सिस्टीमसोबत जुळवून घेऊ शकतात अशीच अ‍ॅप्लिकेशन्स मोबाइलवर ठेवा. अति-अ‍ॅप्लिकेशन्समुळे टच-रिस्पॉन्सची कार्यक्षमता कमी होते.
६) स्क्रीनला तेलकट बोटं लावू नका. वेळोवेळी स्क्रीन नीट पुसा आणि स्वच्छ करा. स्क्रीन खराब असल्यास मोबाइलला स्पर्शाचा ज्ञान होण्यास वेळ लागतो.
७) सर्वात महत्त्वाचं म्हणजे पातळ स्कॅ्रचगार्ड किंवा स्क्रीन प्रोटेक्टर वापरा. जाडजूड प्लास्टिक, काचांमुळे टचस्क्रीन नीट काम करत नाही.
हे वरचे उपाय केल्यास टचस्क्रीन व्यवस्थित काम नक्कीच करेल, मात्र तरीही जर का स्क्रीन काम करत नसेल तर मग खिसा हलका करायची वेळ आली आहे असं समजावं.
pushkar.samant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2016 10:29 am

Web Title: how to handle touch screen products
टॅग Tech It
Next Stories
1 ‘एलजी’ घेऊन येतोय गुंडाळून ठेवता येणारा डिस्प्ले
Just Now!
X