हल्लीची बच्चे कंपनी किती सहजपणे स्मार्ट फोन्स हाताळत असते. कुठलेही अ‍ॅप्लिकेशन वापरणे त्यांना कठीण वाटत नाही. त्यातच ते अ‍ॅप्लिकेशन जर एखाद्या खेळाचे असेल तर तो खेळ काही वेळातच कौशल्यपूर्ण पद्धतीने खेळायला सुरुवात करतात.

बरेचदा अंक ओळख, पाढे, बेरीज-वजाबाकी या संकल्पना मुलांना समजावून सांगताना आणि त्याचा सराव करून घेताना पालकांच्या नाकी नऊ  येत असतात. मग जर या संकल्पनांचा सराव खेळाच्या माध्यमातून झाला तर मुलं हसतखेळत तो सराव करतील यात शंका नाही.

आज आपण अशाच तीन अ‍ॅप्सची ओळख करून घेणार आहोत.

वन टू फिफ्टी (1 to 50 )

या अ‍ॅपमधे एक साधा सोपा खेळ आहे. https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.westriversw.b1to50&hl=en ) या खेळाच्या नावाप्रमाणे यात तुम्हाला १ ते ५० या अंकांची ओळीने निवड करायची आहे. खेळाची सुरुवात केल्यावर प्रथम स्क्रीनवर पन्नासपैकी पंचवीस अंक (५ बाय ५ च्या चौकटीत) दाखवले जातात. आणि ते क्रमाने नसतात त्यामुळे तुम्हाला हवा असलेला पुढचा अंक कुठे आहे ते नजरेने शोधावे लागते. एका कोपऱ्यात घडय़ाळ सुरू होते.

तुम्हाला क्रमाने म्हणजेच १, २, ३ —- असे पन्नासपर्यंत आकडे निवडत जायचे आहेत. तुम्ही जसजसे आकडे निवडाल ते स्क्रीनवरील चौकटीतून गायब होतील आणि नवे अंक स्क्रीनवर दिसायला सुरुवात होईल. पन्नास हा अंक निवडला की हा खेळ संपतो. तुम्ही अंक किती वेगाने न चुकता निवडू शकता हे बघणारा हा खेळ आहे. म्हणजेच कमीतकमी वेळात हा खेळ पूर्ण करण्यासाठी एकाग्रता अतिशय आवश्यक आहे.

चॅलेंजिंग टाइम्स टेबल (Challenging TimesTable)

(https://play.google.com/store/apps/ detailsAGid=com.westriversw.timestable&hl=en)  या अ‍ॅपमध्ये तुमचे एक ते नऊ पर्यंतचे पाढे किती पक्के आहेत हे तपासून बघण्याची सोय आहे. स्क्रीनवर तुम्हाला दोन १ अंकी संख्यांचा गुणाकार विचारला जाईल. एकूण १६पर्यायांपैकी एक योग्य उत्तर तुम्हाला निवडायचे असते. एका मिनिटात जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमचे उत्तर बरोबर आहे की चूक हे स्क्रीनवर दिसत राहते. येथेही वेगाने उत्तर निवडण्याचे कौशल्य पणाला लागतेच.

किंग ऑफ ऑक्स (The King of OX) (https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.westriversw.thekingofox&hl=en )हे तुमच्या बेरीज वजाबाकीच्या संकल्पना किती पक्क्या आहेत हे तपासणारे अ‍ॅप आहे. स्क्रीनवर तुम्हाला काही समीकरणे दाखवली जातात. त्यांपैकी काही बरोबर काही चूक असतील. उदाहरणार्थ ३ + ५ = ८  हे बरोबर समीकरण आहे तर ६ + २ = १० हे चुकीचे समीकरण आहे.

एका मिनिटाच्या अवधीत जितक्या जलद जितकी जास्तीतजास्त समीकरणे चूक की बरोबर हे ठरवता तेवढा तुमचा स्कोर जास्त.

स्पर्धा परीक्षांच्या जगात मुलांसमोर वेगाने अचूक उत्तरे सोडवण्याचे आव्हान असते. मग बच्चे कंपनीकडून याचा सराव करून घेण्यासाठी ही अ‍ॅप्स एक प्राथमिक टप्पा ठरू शकतात.

आणि हो, ही अ‍ॅप्स मोठय़ांनीही खेळून बघायला काही हरकत नाही. तुम्हालादेखील तेवढीच मजा येईल यात शंका नाही.

manaliranade84@gmail.com