20 February 2019

News Flash

फेसबुक सांभाळा!

फेसबुक खाते हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काय करता येईल, हे आपण जाणून घेऊ.

प्रतिनिधिक छायाचित्र

‘फेसबुक’ने आपल्या सर्वाचेच आयुष्य व्यापून टाकलेले आहे. अगदी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण फेसबुकचा वापर करत असतात. फेसबुकने सर्वसामान्यांना मोठे समाज व्यासपीठ मिळवून दिले आहे, यात शंकाच नाही. मात्र, अनेकदा त्याचा वापर करताना पुरेशी खबरदारी न घेतल्याने एकतर वापरकर्त्यांला नुकसान सोसावे लागते किंवा त्याच्यामुळे इतरांना मनस्ताप होतो. त्यातच फेसबुकच्या वैयक्तिक सुरक्षिततेची काळजीही अनेक जण नीट घेत नाही. याचाच गैरफायदा हॅकर्स मंडळी घेतात व वापरकर्त्यांचे अकाऊंट हॅक करतात. अशा ‘हॅक’ झालेल्या खात्याचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी केला जातो. त्यामुळे फेसबुकचा वापर करताना वापरकर्त्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. आपले फेसबुक खाते हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काय करता येईल, हे आपण जाणून घेऊ.

फिशिंग :

यामध्ये हॅकर्स फेसबुकच्या लॉगिन पेजसारखे दिसणारे बनावट लॉगिन पेज बनवतात. यानंतर हॅकर्स त्या व्यक्तीच्या ईमेलवर खोटय़ा पेजची लिंक पाठवतो किंवा माहितीतल्या व्यक्तीला  स्वत:चा मोबाइल फेसबुकसाठी वापरण्यास देतात आणि जेव्हा ती व्यक्ती आपला लॉगिन आयडी व पासवर्ड त्या नकली पेजवर टाइप करते तेव्हा त्याचा ईमेल पत्ता आणि पासवर्ड मिळतो. हॅकर वापरकर्त्यांचा फेसबुक अकाऊंट हॅक करतो. फिशिंगचा वापर करून गोपनीय माहिती चोरणे हे बेकायदेशीर कृत्य असून सदर कृत्य दंडनीय अपराध आहे.

की लॉगर (Keylogger) :

हॅकर्स विविध सॉफ्टवेअर तसेच फोटो यामधून या प्रोग्रॅमचा प्रसार करतात. हा प्रोग्राम युजरच्या कॉम्प्युटरवर इंस्टॉल झाल्यानंतर युजर्सचे सर्व डिटेल्स रिकॉर्ड करतो. युजर्सचे हे डिटेल्स हॅकर्सला एफटीपीद्वारे किंवा ईमेल पत्त्यावर पाठविले जातात.

फेक मजकूर प्रसारित केल्यास..

अश्लील व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल भारतीय दंडविधानाच्या २९२ कलमान्वये गुन्हा दाखल होऊ  शकतो. त्या अंतर्गत दोन ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. माहिती तंत्रज्ञानाचे कलम ६६ हे संगणकाशी संबंधित गुन्ह्यांसाठी वापरले जाते.  आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल ६६ (अ) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. ‘आयडेंटिटी थेफ्ट’ म्हणजे ‘वैयक्तिक संवेदनशील माहिती’ची चोरी व गैरवापर केल्याबद्दल ६६(क) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडापर्यंतची शिक्षा होऊ  शकते.

‘प्रायव्हसी’च्या उल्लंघनाबद्दल ६६(इ) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि दोन लाखांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ  शकते. आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित, प्रकाशित केल्याबद्दल ६७(अ) कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा वर्षे दंडाची शिक्षा होऊ  शकते. अल्पवयीन मुलांचे आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित केल्याबद्दल ६७ (ब) कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.

हॅकिंगपासून कसे सुरक्षित राहाल?

फेसबुक लॉगिन केल्यानंतर होमपेजच्या उजव्या बाजूला असलेल्या सेटिंग्जवर क्लिक करा. त्यामध्ये General, Security and Login, Privacy,Timeline and Tagging असे पर्याय दिसतील. तिथे Security and Login क्लिक केल्यावर Setting Up Extra Security या पर्यायात असणाऱ्या Use two-factor authentication वर क्लिक करून तुमचा मोबाइल नंबर त्यात नोंदवा. त्यानंतर तुम्ही फेसबुकवर लॉगइन करताना मोबाइल क्रमांकावर एक कोड येईल. त्याआधारे तुमचा फेसबुक पासवर्ड आणि हा कोड नोंदवून तुम्ही फेसबुकवर लॉगइन करू शकाल.

– प्रा. योगेश हांडगे

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

 

First Published on December 19, 2017 4:24 am

Web Title: security precautions when using facebook