scorecardresearch

Premium

अ‍ॅपची शाळा : नोनोग्राम्सचा खेळ

आज आपण नोनोग्राम्स नावाने प्रसिद्ध असलेल्या कोडय़ांच्या अ‍ॅपची माहिती घेणार आहोत.

अ‍ॅपची शाळा : नोनोग्राम्सचा खेळ

आज आपण नोनोग्राम्स नावाने प्रसिद्ध असलेल्या कोडय़ांच्या अ‍ॅपची माहिती घेणार आहोत. नोनोग्राम्सचा उगम प्रथम जपानमधे झाला. त्यामुळे या कोडय़ांना हान्जी (Hanjie) असेही नाव आहे. या खेळात उभ्या आणि आडव्या समांतर रेघांनी जी जाळी (Grid) तयार होते त्या जाळीतील चौकोन रंगाने भरून किंवा पांढरे म्हणजेच रंगहीन ठेवून विविध चित्रे तयार करता येतात. यामुळे या खेळाला ग्रिडलर्स (Griddlers) असेही नाव आहे.
प्रत्येक उभ्या किंवा आडव्या ओळीत किती ठिपके रंगाने भरलेले असणार आहेत व ते सलग किती ठिपक्यांच्या गटाने असणार आहेत हे दिलेल्या जाळीबरोबरच सूचक माहिती म्हणून (क्लू) दिली जाते. चित्र कशाचे आहे हे शब्दाने सांगितले जाते. उदाहरणार्थ, फूल किंवा कार. यावरून तुम्ही मनातल्या मनात हे चित्र तयार करून त्यानुसार चौकटींमधे ठिपके भरायचे असतात.
बहुतेकांना माहितीच आहे की संगणक, मोबाइल किंवा टॅब्लेट्सच्या पडद्यावरील सर्व अक्षरे, आयकॉन्स, चित्रे या सर्व गोष्टी अशा ठिपक्यांच्या माध्यमातूनच तुम्हाला दिसत असतात. संगणकाच्या परिभाषेत या ठिपक्यांना पिक्सेल असे नाव आहे. मोबाइल किंवा संगणकाच्या स्क्रीनचे रेझोल्युशन क्ष गुणिले य पिक्सेल्स अशा पद्धतीने सांगितले जाते हे तुम्ही पाहिले असेलच. या पाश्र्वभूमीमुळे या खेळाला ‘पिक्रॉस’ (Picross) असेही म्हटले जाते.
Nonograms Katana ( https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.ucdevs.jcross ) हे अ‍ॅप उघडल्यावर प्रथम तुम्हाला हा खेळ कृष्ण-धवल खेळायचा आहे किंवा रंगात हे विचारले जाते. (नवशिक्यांनी कृष्ण-धवल खेळापासून सुरुवात करावी. रंगीत खेळ हा पुढचा टप्पा आहे.) पाच बाय पाचने सुरुवात करून ३० बाय ३० पर्यंत चौकटींचे नोनोग्राम्स सोडवण्यासाठी दिलेले आहेत. पाच बाय पाच किंवा दहा बाय दहाच्या चौकटीत झेंडा, विमान, घर, झाड, टीव्ही यासारखी चित्रे बनवण्यासाठी दिलेली आहेत.
चौकटीमधे रंग भरल्यावर योग्य चित्र तयार होत नसल्यास आपण रंग भरलेल्या चौकटींवर बोट लावून तो रंग काढून टाकू शकतो. किंवा संगणकाप्रमाणेच undo आणि redo करण्याची सोय या खेळात उपलब्ध आहे. चौकटींमधे रंग भरत असताना तयार होणारे चित्र कसे दिसणार आहे हे डावीकडील वरील कोपऱ्यात एका छोटय़ा चौकटीत दर्शवले जाते. ज्यावेळी तुम्ही मोठे चित्र बनवत असता तेव्हा ही सोय विशेष उपयोगी होते.
हा खेळ खेळताना विविध सेटिंग्ज उपलब्ध आहेत, ज्याद्वारे स्क्रीनवरील भरलेले रंग कसे दिसावेत, उदाहरणार्थ फुली, गोळा किंवा भरलेला चौकोन. येथे मदतीचे विविध पर्याय उपलब्ध असून ते गरजेनुसार निवडता येतात. उदाहरणार्थ, एखाद्या अयोग्य चौकोनात रंग भरल्यास तो त्याच्या चुकीची सूचना देतो. अशी सूचना आपल्याला हवी की नको ते सांगता येते. हा खेळ कसा खेळायचा याचा अंदाज येण्यासाठी यू-टय़ुबवरील लिंक सोबत देत आहोत. https://www.youtube.com/watchAGv=d-I5Ng2oYyM

मनाली रानडे – manaliranade84@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Griddlers plus android apps on google play

First published on: 23-08-2016 at 04:30 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×