गेल्या वर्षीच्या ‘इंटरनेटची शाळा’ या सदरातून आपण वेगवेगळय़ा संकेतस्थळांची माहिती करून घेतली. संकेतस्थळांप्रमाणेच मोबाइलमधील अ‍ॅप्स हेदेखील प्रत्येकाच्याच उपयुक्ततेचा आणि औत्सुक्याचा विषय आहेत. गुगल प्ले किंवा अ‍ॅपल स्टोअरवर उपलब्ध असलेल्या लाखो अ‍ॅप्समधून योग्य अ‍ॅप शोधणे म्हणजे दिव्य काम! वापरकर्त्यांची हिच अडचण दूर करणारे हे नवीन सदर आजपासून..

उपनगरीय रेल्वे आणि बेस्ट बस सेवा या मुंबईच्या जीवनवाहिन्या आहेत. या दोन्हीविषयी इत्थंभूत माहिती या अ‍ॅपवर आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही सेवांचे पूर्ण टाइम टेबल या अ‍ॅपमधे भरलेले आहे. तुम्ही रेल्वेच्या कोणत्या स्थानकावर उभे आहात आणि कोणत्या दिशेने प्रवास करायचा आहे हे सांगितल्यावर त्या दिशेने जाणाऱ्या पुढील सर्व गाडय़ांचे वेळापत्रक दाखवले जाते. त्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर येतात त्याचीही माहिती दिली जाते. त्या गाडय़ा जलद आहेत की धीम्या हेही आपल्याला कळते. हे झाले उपनगरी गाडय़ांबद्दल. संपूर्ण भारतातून मुंबईला येणाऱ्या आणि मुंबईहून संपूर्ण भारतात जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाडय़ा (मेल आणि एक्स्प्रेस, पॅसेंजर) यांच्या वेळापत्रकांची माहितीही येथे देण्यात आलेली आहे. जर तुमचे एखाद्या गाडीचे रिझव्‍‌र्हेशन वेटिंग लिस्टमधे असेल तर पीएनआर क्रमांकाची चौकशीही या  अ‍ॅपद्वारे करता येते. तुमच्या नातेवाईकांना गाडीतून उतरवून घ्यायला जायचे  असेल तर ती गाडी वेळेवर येते आहे की विलंब होत (असल्यास किती) आहे ते कळते. याच प्रकारे बेस्ट बसेसच्या विविध मार्गाची (बस रुटस) त्यांच्या सर्व थांब्यांसहित माहिती येथे दिलेली आहे. त्याचप्रमाणे एखाद्या बसस्टॉपवर कोणकोणत्या क्रमांकाच्या बसेस येतात त्यांचीही माहिती यावर मिळते. तुम्हाला मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल आणि या दोन ठिकाणांमधे बस उपलब्ध नसेल तर बस बदलून तुम्हाला इच्छित स्थळी कसे पोचता येईल याचेही मार्गदर्शन या एॅपवर करण्यात आलेले आहे. थोडक्यात नव्याने मुंबईत आलेल्या लोकांना बेस्ट प्रवासासाठी याचा खूप उपयोग होऊ शकतो.
याशिवाय मुंबईतील इतर प्रवासी साधने उदाहरणार्थ मुंबई मेट्रो, मोनो रेल, जलवाहतूक यांचेही पूर्ण वेळापत्रकही पाहता येते. रिक्षा आणि टॅक्सींचे अंतरानुसार दरपत्रक यात दिलेले असल्यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होते. येथेच मुंबईतील मुख्य प्रेक्षणीय स्थळांची माहिती, तसेच सहलीची ठिकाणे, अत्यावश्यक सेवांचे (उदाहरणार्थ हॉस्पिटल्स, रेल्वे, एअरलाइन्स) फोन नंबर्स याशिवाय नाटय़-चित्रपट गृहांमध्ये चालू असलेल्या खेळांची माहिती देऊन ही साइट आणखीनच उपयुक्त करण्यात आलेली आहे.
m-Indicator – Mumbai हे अ‍ॅप अँड्रॉइडधारकांसाठी गुगल प्ले स्टोअर तसेच आयफोन, आयपॅड आणि आयपॉड टच धारकांसाठी एॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. या अ‍ॅपच्या धर्तीवरच पुणे परिवहन सेवेची माहिती देणारे p-Indicator – Pune PMPML & BRT& इफळ हे अ‍ॅपसुद्धा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. इच्छुक स्मार्टफोनधारकांनी त्यांचा जरूर लाभ घ्यावा.
manaliranade84@gmail.com