१३२ दिवसांच्या लसीकरण कार्यक्रमाची आखणी पूर्ण; साडेसहा लाख जणांना लस देण्याची तयारी

महापालिका क्षेत्रातील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी कार्यक्रम राबविल्यानंतर ठाणे महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या आदेशानुसार लसीकरणाचे नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात १३२ दिवसांचा लसीकरण कार्यक्रम आखला असून या काळात सहा लाख ६० हजार जणांना १३ लाख २० हजार डोस देण्याची तयारी करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य सेवक, फ्रंटलाइन वर्कर, ५० ते ६० वयोगट आणि ६० वर्षांपुढील व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वाचे दोनदा लसीकरण केले जाणार असून ठाणे महापालिका क्षेत्रात २० केंद्रांवर दररोज १० हजार डोस दिले जाणार आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत करोनाचे ५४ हजार ४५० करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५२ हजार ३८८ रुग्ण बरे झाले आहेत, तर ८२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळल्याने जगभरासह देशात चिंतेचे वातावरण असले तरी कोणत्याही क्षणी संपूर्ण देशात ‘को-विन’ मोहिमेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या मोहिमेत सुरुवातीला एकूण लोकसंख्येच्या २० टक्के नागरिकांना दोनदा करोनाप्रतिबंधक लस दिली जाणार आहे. त्यानुसार देशात पहिल्या टप्प्यात ३३ कोटी, महाराष्ट्रात ५१ लाख तर ठाणे महापालिका क्षेत्रात ६ लाख ६० हजार नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे पालिकेची संपूर्ण तयारी झाली आहे.

१०० जणांचे पथक

* लसीकरणासाठी २० आरोग्य केंद्रांच्या जागेची निवड करण्यात आली असून तिथे मुबलक जागा उपलब्ध आहे.

* लसीकरणासाठी १०० जणांचे पथक तयार करण्यात आले असून प्रत्येक केंद्रावर दरदिवशी ५०० डोस देण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

* सर्वप्रथम आरोग्य सेवकांना लस देण्यात येणार असून त्यासाठी ६० हजार लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.

* लसींचा मुबलक साठा उपलब्ध झाला तर, १ लाख ८० हजार फ्रंटलाइन वर्करलाही लस देण्यात येणार आहे. त्यामध्ये आयुक्त, शासकीय, पालिका अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचारी अशा सर्वाचा समावेश असेल.

* ६ लाख ६० हजार नागरिकांचे दोनदा लसीकरण होणार असून त्याचे दुसऱ्या टप्प्यात लसीकरण चुकू नये यासाठी लक्ष दिले जाणार आहे.

लसीकरण आकडेवारी

६०,००० आरोग्य सेवक

१,८०,००० फ्रंटलाइन वर्कर्स

६४,८०० ५० ते ६० वयोगट

४३,२०० ६० वर्षांपुढील

राज्य सरकारच्या निर्देशानुसार लसीकरणाचे योग्य असे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेकडे पुरेशी जागा तसेच लस साठविण्यासाठी आवश्यक सामुग्री पुरेशा प्रमाणात आहे. याशिवाय पहिल्या टप्प्यात ज्या व्यक्तींना लस द्यायची आहे, त्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. लसींचा पुरवठा मोठय़ा प्रमाणावर झाल्यास ग्लोबल रुग्णालयाच्या धर्तीवर एखादी मोठी इमारत या कार्यक्रमासाठी मोकळी करता येऊ शकते.

– डॉ. विपिन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका