आजाराची लक्षणे आढळलेल्या ५१० संशयितांची नोंद

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून जिल्ह्य़ातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा १२० इतका झाला असून त्यापैकी आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर मंगळवार सायंकाळपर्यंत ५१० जणांमध्ये करोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली शहरात सर्वाधिक ३७, त्याखालोखाल नवी मुंबईत ३० तर ठाणे शहरात २५ रुग्ण आहेत.

ठाणे जिल्ह्य़ातील शहरी तसेच ग्रामीण भागात करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून त्याचाच एक भाग म्हणून करोनाबाधित रुग्ण आढळून आलेले परिसर पूर्णपणे टाळेबंद करण्यात येत आहे. तसेच रुग्ण राहत असलेल्या परिसरातील घरांमध्ये जाऊन वैद्यकीय पथके सर्वेक्षण करीत आहे. त्यामध्ये तेथील नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे आढळून येतात का, याची पाहणी केली जात आहे. नागरिकांमध्ये अशी लक्षणे आढळून आली तर त्या नागरिकांची तात्काळ तपासणी करून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जात आहे. ठाणे जिल्ह्य़ात करोनाबाधित रुग्णांची संख्या १२० इतकी झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर १२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत २४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पैकी एकाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सहा रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे, तर दोन रुग्णांचा मात्र मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ३० रुग्ण आढळले असून त्यापैकी तीन रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात एक रुग्ण आढळला होता. मात्र, उपचारानंतर त्यालाही घरी सोडण्यात आले आहे. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला होता आणि या दोन्ही रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मीरा-भाईंदर शहरातही रुग्ण संख्येत वाढ होत असून येथील रुग्णसंख्या २२ इतकी झाली आहे. तर ठाणे ग्रामीण परिसरात तीन रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एकाला उपचारानंतर घरी सोडले आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.