News Flash

बारच्या छुप्या खोलीतून १४ मुलींची सुटका

शहरातील एकाही लेडीज बारला यापुढे अग्निशमन विभागाचा परवाना द्यायचा नाही असा निर्णय महापालिकेने घेताच पोलिसांनीही अवैधरीत्या सुरू असलेल्या बारच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.

| August 28, 2015 12:20 pm

शहरातील एकाही लेडीज बारला यापुढे अग्निशमन विभागाचा परवाना द्यायचा नाही असा निर्णय महापालिकेने घेताच पोलिसांनीही अवैधरीत्या सुरू असलेल्या बारच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यातील राबोडी परिसरातील हनी कोम्ब या बारवर बुधवारी रात्री उशिरा ठाणे पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आणि तेथील तळघरात लपलेल्या १४ मुलींची सुटका केली. या बारच्या तळघरात असलेल्या छुप्या खोलीत या मुलींना लपवण्यात आले होते. रिमोट कंट्रोलद्वारे या तळघराचे दार उघडले जात असे. अशा अंधाऱ्या खोली बारबालांना लपविले जात असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी अग्निशमन विभागाचे नियम मोडल्याचा गुन्हाही दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांच्या या छाप्यादरम्यान तळघराचे दार उघडून त्यातून या मुलींना बाहेर काढले.
ठाणे पोलीस दलातील परिमंडळ तीनचे उपायुक्त सचिन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात बार मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील बहुतांश लेडीज बार बेकायदा इमारतींमध्ये सुरू असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. ठाणे महापालिकेने या बारना अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला देण्यास मध्यंतरी बंदी घातली होती. त्याविरोधात काही बार मालकांनी न्यायालयात धाव घेतली असता यासंबंधी धोरण ठरविण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार महापालिकेने आखलेल्या धोरणानुसार शहरातील एकाही लेडीज बारला यापुढे अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला दिला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करताना सर्वसाधारण सभेनेही त्यास मान्यता दिली आहे. महापालिकेचा हा निर्णय होताच ठाणे पोलीस दलाचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांनी अवैधरीत्या चालणाऱ्या बारविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला नसेल तर पोलिसांकडून व्यवसाय परवाना दिला जात नाही. नेमक्या याच मुद्दय़ावर बोट ठेवून पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. राबोडी परिसरातील हनी कोम्ब बारवर पोलिसांच्या पथकाने बुधवारी छापा घातला.
या वेळी येथून ७५ ग्राहकांना अटक करण्यात आली. बारची झडती घेत असताना बारच्या एका बाजूच्या भिंतीतून आवाज येऊ लागला. सामान्य डोळ्यांना भिंतीप्रमाणे दिसणाऱ्या या भिंतीला छुपा दरवाजा होता. पोलिसांनी बारकाईने तपासणी केल्यानंतर तेथील संपूर्ण भिंतीवर धूळ साचलेली होती, मात्र केवळ दोन फुटाचा भाग स्वच्छ असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी तो भाग उघडल्यानंतर तिथे छुपी खोली असल्याचे दिसून आले. १० बाय ३ फुटाच्या या खोलीमध्ये १४ मुलींना बंदिस्त करण्यात आले होते. या खोलीत वातानुकूलित यंत्रणा, पंखे बसवून अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या खोलीला बसवण्यात आलेला दरवाजा रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने खोलण्यात येत होता. या प्रकरणी राबोडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2015 12:20 pm

Web Title: 14 girls rescued from the hidden room of bar
टॅग : Dance Bar
Next Stories
1 वाहतूक नियमनाला हरताळ
2 गुन्हेवृत्त : बिल मागितले म्हणून उपाहारगृह व्यवस्थापकाला धमकी
3 ठाण्यात क्लस्टरसाठी सरकार राजी, पण..
Just Now!
X