आरबीआय कॉलनी,विजयनगर, जुनी डोंबिवली (प.)
वाढत्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या जंगलात एकीकडे इमारतींचे जाळे उभे राहत असताना डोंबिवलीतील काही ठिकाणी मात्र अजूनही खऱ्याखुऱ्या जंगलाचा अभास वाटावा अशी वृक्षवल्ली टिकून आहे. आरबीआय कॉलनी अशा निसर्गसंपन्न वसाहतींपैकी एक आहे. डोंबिवली पश्चिम विभागातील विजयनगरची प्रमुख ओळख असलेली आरबीआय कॉलनी ४५ वर्षांपूर्वी उभारण्यात आली. या कॉलनीत पूर्वी १६ बंगले होते. त्यांपैकी आता फक्त चार बंगले उरले आहेत. उर्वरित बंगल्यांचे बहुमजली इमारतींमध्ये रूपांतर झाले आहे. साऱ्या शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य असताना विजयनगरमधील स्वच्छता नजरेत भरते..

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या सोळा कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन ४५ वर्षांपूर्वी डोंबिवली पश्चिम भागातील विजयनगर परिसरात आरबीआय कॉलनीची स्थापना केली. हौसिंग सोसायटय़ांना कर्ज देण्यास बँकेने सुरुवात केल्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काचे घर असावे असे वाटू लागले. स्वतंत्र कर्ज मिळत नसल्याने चाकरमानी गट समूह करून, जमीन खरेदी करून हक्काचा निवारा उभारण्याचा प्रयत्न करीत होते.
मुंबई येथे आरबीआयच्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या सोळा जणांनीही एकत्र येऊन जागा घेण्याचा विचार केला. ठाणे येथे आधीच दोन वसाहती स्थापन झाल्या होत्या. ठाण्यापासून थोडे दूर अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात आपलेही घर असावे म्हणून प्रभाकर मुळे, विजयसेन काळे, वैजनाथ कर्णिक यांसह सोळा जणांनी डोंबिवली पश्चिमेला स्टेशनपासून वीस-पंचवीस मिनिटांच्या अंतरावर असलेली दोन एकर ३९ गुंठे जागा १९६४ मध्ये विकत घेतली. डोंबिवली पूर्वेला चाकरमानी येऊन वस्ती करून राहू लागले असल्याने डोंबिवली गावाचा तसा हळूहळू विस्तार होत होता. एकांतात असलेल्या डोंबिवलीत त्या वेळी वाडे संस्कृती होती. यामुळे आपणही बंगले बांधू या असा विचार या सोळा जणांनी केला. १९६९ मध्ये बंगले बांधून पूर्ण झाले. वैजनाथ कर्णिक म्हणजेच कर्णिक काका जुन्या आठवणी सांगताना म्हणतात, जुनी डोंबिवली म्हणजे शेती, खाडी परिसरातील दलदलीतील गाव. पुढे-मागे या गावालापण भाव येईल. मुंबईला ये-जा करण्याच्या दृष्टीने सोयीस्कर. मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने सोपे, असा विचार करून जुन्या डोंबिवलीत आम्ही राहायला आलो. स्टेशन परिसरात कामत यांची एक सोसायटी होती आणि पुढे आगरी लोकांची घरे होती. विजयनगर परिसरात आमचे सोळा जणांचे बंगले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे टुमदार बंगले म्हणजे आमच्या स्वप्नांचे घरच होते. मुळे काका व काळे काका यांच्या मेहनतीमुळेच आमचे हे स्वप्न साकार झाले होते. मुंबईपासून दूर अंतरावर असलो तरी कामावरून थकून घरी आल्यानंतर आम्हाला वेगळाच आनंद मिळत असे. अगदी छान वातावरण येथे होते.
आजूबाजूला मोकळे रान, काही गावकऱ्यांची शेती होती. शेताच्या बांधावरून उडय़ा मारत पायवाटा तुडवत आम्ही स्टेशन गाठायचो. स्टेशनपासून हा भाग थोडा लांब आहे. प्रवासासाठी त्या वेळी कोणतेही वाहन नव्हते. पूर्वेला काही टांगे होते; परंतु द्वारका हॉटेलजवळ रेल्वेचे फाटक होते. ते फाटक उघडेपर्यंत प्रतीक्षा करायला लागायची. सुरुवातीला पाण्याची सोय नव्हती. पिण्याच्या पाण्याची एक लाइन व वीजवाहिनीची एक लाइन स्टेशनवरून आणली. तसेच शंभर फुटी कूपनलिका खोदण्यात आली. पाणी तसे मुबलक होते. बागकामाची आवड सगळ्यांनाच असल्याने प्रत्येकाच्या बंगल्याच्या बाहेर सुंदर असा बगीचा होता. त्यात गुलमोहर, नारळ, शेवगा, फणस, आंबा, जांभूळ आदी सर्व फुलझाडे, फळझाडे डौलाने उभी होती. बकुळाचे आणि कुंती हे फुलाचे झाडही येथे आहे. कुंती हे झाड आता कुठेही पाहायला मिळत नाही. याची फुले रात्री फुलतात आणि सर्वत्र त्यांचा सुगंध दरवळतो. हे झाड केवळ आमच्या भागातच आढळेल असे सुधीर वैद्य सांगतात. सोसायटीच्या आवारात सर्व प्रकारची झाडे आहेत. बाराही महिने पाणी फुलझाडांच्या मुळाशी असल्याने कधी कोणी सदस्य बाहेरून फूलपुडी आणत नाही. सकाळची ताजी फुले देवघरातील देवांवर ठेवून येथील प्रत्येक सदस्य मन:शांती मिळवीत असतो. बंगल्यांच्या आवारातील सांडपाण्याचा पुनर्वापर बागकामासाठी केला जायचा. त्यावर अळूची शेती, केळीच्या पानांची घरगुती शेतीही व्हायची. विविध प्रकारचे पक्षी, त्यांची चिवचिव या ठिकाणी पाहण्यास मिळते. तसेच घोरपड, कासव, साप हे प्राणीही बगीचात वावरताना दिसायचे. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, होळी, रंगपंचमी, माघी गणपती, कोजागिरी पौर्णिमा आदी सर्व सण-उत्सव साजरे होत असत. ७० ते ८० लोक होतो. सणासुदीला आम्ही एकत्र जेवण करायचो. त्या वेळची मज्जा काही औरच होती, असे उदय मोहरीर सांगतात.
पूर्वी रस्ता नीट नसल्याने व वाहनांची काहीच सोय नसल्याने आम्ही सर्वानी सायकली घेतल्या होत्या. पावसाळ्यात मात्र आम्हाला खूप अडचणींचा सामना करायला लागायचा. स्टेशन ते आमचा परिसर यांच्यामधून एक नाला वाहायचा. पावसाळ्यात या नाल्याला पूर आला की आमचा जायचा-यायचा रस्ताच बंद व्हायचा. रस्त्याला लाइट नसायचे. अंधारात वाट तुडवत आम्ही यायचो. १९८५-८६ मध्ये रस्ते झाले. त्यानंतर रिक्षाही आल्या. स्टेशन परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन बसची सोय आहे. मात्र आतमध्ये बस येत नाही. त्यामुळे रहिवाशांना शेअर रिक्षाशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. कॉलनीपासून थोडय़ा अंतरावर आगरी लोकांची वस्ती होती; परंतु त्यांचा त्रास आम्हाला कधी झाला नाही. रात्री-अपरात्री आमच्या सोसायटीतील महिला प्रवास करीत असत; परंतु त्यांनाही कधी कोणी त्रास दिला नाही.
जसजसा डोंबिवलीचा विकास होत गेला, तसतसा कॉलनीतही बदल होत गेला असे म्हणावयास हरकत नाही. प्रभाकर मुळे, विजयसेन काळे, मोहरीर बंधू, डोंगरे, दांडेकर, अप्पा वैद्य यांसह सोळा जणांनी उभारलेल्या बंगल्यांपैकी आता केवळ चार बंगले शिल्लक राहिले आहेत. देवमल्हार, सुधांशु, दत्तकृपा, कांची, अष्टगंधा, सनरे, चंद्रकिरण, निलायणी आदी बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. सोसायटी स्थापन करताना एकत्र असलेली मंडळी आता ७० ते ८० च्या घरात आहेत. मुलेबाळे नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर असतात. आईबाबा नोकरीला, त्यामुळे घरात सध्या आजी-आजोबा आणि नातवंडे असा हसताखेळता परिवार असतो. सकाळच्या वेळेत शाळेच्या बसथांब्यावर नातवंडांना सोडणे-आणणे, संध्याकाळी बागेत फिरायला नेणे अशी कामे आजीआजोबा मंडळी करतात. मैदान नसल्याने सोसायटीच्या आवारातच मुले खेळतात. दोन सोसायटय़ांमध्ये अंतर असल्याने त्या जागेत सकाळ-संध्याकाळी मुले खेळतात.
अरुंद रस्त्यांमुळे कोंडी
पालिकेच्या सोयीसुविधा तशा आम्हाला कमी मिळतात. सर्वात जास्त कर भरूनही पालिका त्या प्रमाणात सोयीसुविधा देत नाही. आजूबाजूला टोलेजंग इमारती उभ्या राहिल्याने रस्ते अरुंद होत गेले. त्यामुळे दोन वाहने समोरासमोर आली की कोंडी होते. परिसरात एक-दोन खासगी शाळा आहेत. मात्र महाविद्यालयासाठी येथील विद्यार्थ्यांना पूर्वेतील कॉलेजवर अवलंबून राहावे लागते. कर्णिक काका (अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश डोंगरे (सचिव), उदय मोहरीर (खजिनदार), सुधीर वैद्य (सदस्य) आदी विश्वस्त कमिटीचा कारभार सांभाळत आहेत. बंगल्यांची जागा इमारतींनी घेतली असली तरी येथील नागरिक सर्वाशी जोडलेले आहेत. माणुसकी जपत, शेजारधर्म पाळत एकाच इमारतीत जणू काही आपण राहात आहोत हे या नागरिकांनी दाखवून दिले आहे. या सोसायटय़ांमधील नागरिकांना समिती सदस्य करावयाचे आहे; परंतु अद्याप कन्व्हेयन्स डीड मिळाले नसल्याने त्यात अडचणी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यानच्या काळात आता येथील जमिनीचे भाव कैकपटींनी वाढले आहेत. मात्र तरीही त्या आमिषाला बळी न पडता गगनचुंबी इमारतींच्या मोहापासून दूर राहण्याचा सोसायटी सदस्यांचा निर्धार आहे.

tanker overturned, tanker overturned,
बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात अल्कोहोलचा टँकर उलटला
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
Nashik, Leopard caught
नाशिक : पाथर्डी परिसरात बिबट्या जेरबंद
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद