पदभार स्वीकारताच आयुक्तांकडून करोना उपाययोजनांचा आढावा

ठाणे : ठाणे महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त विजय सिंघल यांनी शुक्रवारी सकाळी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेऊन करोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला आणि महापालिकेत कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांपर्यंत ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना वगळून इतर सर्व खासगी आस्थापना तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले.

नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिका मुख्यालय इमारतीत येणाऱ्या नागरिकांना अत्यावश्यक कामे वगळता प्रवेश बंद करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. ट्रेन किंवा बसने येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहू नये आणि आवश्यकतेनुसार घरातूनच काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

तसेच महापालिका कार्यालयातील तातडीचे कामकाज सुरू ठेवण्याच्या दृष्टिीकोनातून दररोज ५० टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहील याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले निवासी पत्ते, ईमेल आयडी, मोबाइल आणि निवास दूरध्वनी क्रमांक आपापल्या विभाग कार्यालयांना उपलब्ध करून द्यावेत. तसेच संपर्क पत्त्यावर ते उपलब्ध राहतील याची प्रत्येक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. याशिवाय, कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या तर त्यांनी त्यानुसार कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य राहील, असेही त्यांनी सांगितले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने कासारवडवली येथे निर्माण केलेल्या ४० खाटांच्या स्वतंत्र कक्षाचा तसेच त्या ठिकाणी दाखल होणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या विविध आवश्यक सोयीसुविधांचाही त्यांनी आढावा घेतला. महापालिका क्षेत्रात करोनाचा संसर्ग वाढू नये तसेच तात्काळ उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागासह सर्व विभागास दिले. तसेच करोनाबाबत नागरिकांमध्ये असणारे गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बसमधून उभ्याने प्रवास करण्यास मनाई

ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसमधून प्रवासी उभे राहून प्रवास करणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. उभे राहून प्रवास करण्यास मज्जाव करणे तसेच प्रत्येक बसमध्ये एका सीटवर एक प्रवासी बसेल याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.   तर रेल्वे किंवा बसने येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहू नये आणि आवश्यकतेनुसार घरातूनच काम करावे, अशा सुचनाही त्यांनी केल्या आहेत.