कल्याण-डोंबिवली पालिकेकडून ५० हजार खाटांची तयारी 

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत करोना रुग्णांचा आकडा वाढत असून अलगीकरणात जाणाऱ्या रहिवाशांचे प्रमाणही वाढू लागले आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत हे प्रमाण आणखी वाढू शकते. या शक्यतेने महापालिका प्रशासनाने कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव परिसरांतील शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालये ताब्यात घेण्याची तयारी  केली आहे.

याशिवाय सर्वसमावेशक आरक्षणाखाली मिळालेल्या जागा, मोकळे आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या जागांच्या माध्यमातून सुमारे ४० ते ५० हजार अलगीकरणातील खाटांची सज्जता करता येऊ शकते असा महापालिकेचा दावा आहे.

सद्यस्थितीत पालिकेच्या १० प्रभागांमधून दररोज प्रत्येकी २० ते २५ रहिवासी अलगीकरणासाठी बाहेर काढले जातात. येत्या दोन ते तीन महिन्यांत अलगीकरणात जाणाऱ्या रहिवाशांची सोय करण्यासाठी वाढीव जागा लागणार असल्याने प्रशासनाने नगररचना विभागाच्या सहकार्याने शहरातील शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालये, निवारे उभारणीसाठी मोक्याचे आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. यामध्ये पालिकेला सर्वसमावेशक आरक्षणाखाली विकासकांकडून ताब्यात मिळालेल्या जागांचाही अलगीकरण केंद्रासाठी वापर केला जाणार आहे. विकासकांनी उभारलेल्या पण ग्राहकांनी ताबा न घेतलेल्या नवीन इमारती प्रशासन ताब्यात घेणार आहे. शहाड रेल्वे स्थानकाजवळ अशाप्रकारची ३० माळ्याची एक इमारत प्रशासनाने ताब्यात घेतली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

महापालिका हद्दीत शंभरहून अधिक शाळा, वीसहून अधिक महाविद्यालये आहेत. पन्नासहून अधिक मंगल कार्यालये आहेत. या जागा ताब्यात घेतल्यानंतर तेथे खाटा, पंखा, पाणी, वीज या सुविधा पालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विलगीकरणातील खाटा उपलब्ध केल्या तरी तेथे वैद्यकीय कर्मचारी वर्ग कसा उपलब्ध करून देणार, असा प्रश्न जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे.

विलगीकरण केंद्र तयार करण्यासाठी सर्वसमावेशक आरक्षणाखाली मिळालेल्या तयार जागा, आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी सव्‍‌र्हेक्षण सुरू केले होते. ते पूर्ण झाले आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालयांची पाहणी करण्यात आली आहे. या जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

– मारुती राठोड, सहाय्यक संचालक, नगररचना