मीरा-भाईंदरमध्ये रुग्णालये आणि कार्यालय इमारतींमध्ये अग्निसुरक्षा सामग्रीचा अभाव

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या दीड वर्षांत ५४४ ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. कोणत्याही प्रकारची आगीची दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने जीवसंरक्षक व आग प्रतिबंधक उपकरणे याबाबत शहरातील इमारती, उपाहारगृहे, मॉल, चित्रपटगृहे, औद्योगिक वसाहती यांची योग्यरीत्या तपासणी होणे आवश्यक आहे. मात्र शहरातील अनेक इमारतींची अजूनही तपासणी झाली नाही.

२०१९ मध्ये २८२ आगीच्या दुर्घटना घडल्या होत्या, मात्र यंदाच्या ऑगस्टपर्यंत २६२ ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत, अशी माहिती महानगरपालिकेने दिली आहे. या घडलेल्या दुर्घटनेत मागच्या वर्षीपेक्षा आगी लागण्याचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी अग्निशमन विभागाच्या वतीने अग्निसुरक्षा सप्ताह आयोजित केला जातो, मात्र तरीदेखील शहरात अग्निसुरक्षा तपासणी केली जात नाही.

शहरात अनेक लहानमोठय़ा औद्योगिक वसाहती आहेत, मात्र अजूनही काही इमारती व वसाहतींचे सुरक्षा ऑडिट झाले नाही, तर काही इमारतींना अजूनही नोटिसा बजावण्यात आल्या नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगी

लागण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. अग्निसुरक्षेच्या दृष्टीने या औद्योगिक वसाहती, इमारती, उपाहारगृहे, शैक्षणिक संस्था, मनोरंजनाची ठिकाणे अशा अनेक ठिकाणचे ऑडिट करणे गरजेचे होते, मात्र ते अजूनही झाले नाही. आतापर्यंत फक्त  नोटिसा बजावण्यात आल्या आहेत; परंतु प्रत्यक्षात कारवाई ठप्प आहे.

४ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार नाही

शहरातील वाढत्या दुर्घटनेवर नियंत्रण मिळवण्याकरिता २०१९ साली अग्निशमन विभागात तब्बल ७० सहायक कर्मचारी ठेकेतत्त्वावर जोडण्यात आले. राजकीय पुढाऱ्यांच्या दबावामुळे जोडण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांना आता उपयुक्त संसाधनांसह वेतन उपलब्ध करणेदेखील पालिकेला कठीण झाले आहे. गेल्या ४ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार उपलब्ध नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.