किशोर कोकणे लोकसत्ता

ठाणे : करोनाचा प्रसार कमी करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे काटेकोर पालन व्हावे यासाठी रस्त्यावर उभ्या ठाकलेल्या पोलिसांनाच आता करोनाचा विळखा पडू लागला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील दोन पोलीस ठाण्यांमधील सुमारे ६० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे. या पोलीस ठाण्यांमध्ये आता मुख्यालय तसेच इतर पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात येणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या टाळेबंदीचे काटेकोर पालन व्हावे म्हणून पोलीस दल पूर्णपणे रस्त्यावर उतरून कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सात हजारांहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या शहरांत संचारबंदीचे उल्लंघन रोखण्यासाठी झटत आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना रोखण्यात पोलिसांचे मोठे श्रम वाया जात आहेत. असे असतानाच आता पोलिसांनाही करोनाची लागण होऊ लागली आहे. आयुक्तालयामधील एका पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा संपर्क करोनाबाधित रुग्णाशी आल्यानंतर या अधिकाऱ्यालाही करोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यानंतर या अधिकाऱ्याच्या संपर्कातील ४२ पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये १२ ते १३ अधिकाऱ्यांचा सामावेश आहे. तर दुसऱ्या एका पोलीस ठाण्यातील १५ कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आलेले आहे.

अटकेत असलेल्या आरोपीला करोनाची लागण झाली होती. या आरोपीच्या संपर्कात आलेल्या संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना विलग करण्यात आले. या दोन्ही पोलीस ठाण्याचा कारभार मुख्यालयातील पोलीस कर्मचारी, अधिकारी तसेच इतर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून पाहण्यात येणार आहे.