अडगळीच्या ठिकाणी पोहोचण्यास मदत; ४९ लाखांचा खर्च

वसई-विरार शहर महापालिका अग्निशमन दलाच्या ताफ्यात ७ अद्ययावत अग्निशमन बुलेट (फायर फायटिंग बाइक) दाखल झाल्या आहेत. या बुलेटमध्ये आग विझविण्याचे उपकरण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची साधने असल्याने वेळेवर अडगळीच्या ठिकाणी मदत पोहोचवता येणार आहे. एका बुलेटची किंमत सात लाख रुपये एवढी आहे.

वसई-विरार शहर महापालिका हद्दीत छोटय़ा-मोठय़ा आगी लागण्याच्या घटना घडत असतात. छोटय़ा आगी विझविण्यासाठी मोठय़ा फायर फायटिंगच्या गाडय़ा पाठविल्या जातात, तसेच घर, इमारतीच्या परिसरात साप आल्याचे कॉल अग्निशमन दलाला येत असतात. त्यासाठीही मोठय़ा गाडय़ा पाठविण्याशिवाय पर्याय नसतो. अनेकदा वाहतूक कोंडी असल्यास अग्निशमन विभागाची चार चाकी वाहने त्यात अडकतात. अशा वेळी चार चाकी वाहने अडचणीच्या ठिकाणी जाणे अवघड पडते आणि आगीच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होतो. त्यामुळेच फायर फायटिंग बाइक घेण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यानुसार सोमवारी या बुलेट अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्या.

  • या बुलेट अद्ययावत असून या बुलेट वाहनावर फायर इस्टिंग्विशर, स्नेक स्केचर स्टीक, वॉटर मीस्ट फायर फायटिंग सिस्टीम अशा यंत्रणा आहेत.
  • अडगळीच्या ठिकाणी जाण्यास, साप पकडण्यास या बुलेटचा उपयोग होणार आहे.
  • एका बुलेटची किंमत तब्बल सात लाख रुपये आहे.
  • महापालिकेने सात बुलेट खरेदी केल्या असून आणखी अशा बुलेट टप्प्याटप्प्याने विकत घेतल्या जाणार आहेत.