मानसी जोशी

ठाणे जिल्ह्य़ात स्किझोफ्रेनियाचे ८५ हजार रुग्ण; १८ ते ४४ वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक

नैराश्य, अश्लील चित्रफिती पाहणे आणि तुटत चाललेला संवाद यामुळे गेल्या तीन वर्षांपासून स्क्रिझोफ्रेनियाचे ८४ हजार ८५८ रुग्ण उपचारासाठी ठाणे मनोरुग्णालयात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वात जास्त असल्याचे ठाणे मनोरुग्णालयाने दिलेल्या आकडेवारीवरून निदर्शनास आले आहे. या रुग्णांत वृद्धांची संख्याही कमालीची आहे.

ठाणे, भिंवडी, पालघर आणि पुणे येथून रुग्ण विविध मानसिक आजारांवरील ठाणे मनोरुग्णालयात उपचारांसाठी येत असतात. गेल्या काही वर्षांपासून यातील स्किझोफ्रेनिया या आजाराच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत ४१ हजार ५८६ रुग्णांनी, तर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत ३९ हजार ८७६ रुग्ण उपचारासाठी मनोरुग्णालयात आल्याची नोंद आहे. तर, या वर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ३ हजार ३९६ एवढे रुग्ण आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. गेल्या तीन वर्षांत ८४ हजार ८५८ इतके रुग्ण उपचारासाठी आले असून यात पुरुषांची संख्या सर्वाधिक आहे. तर रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांची संख्या २ हजार ३००च्या घरात आहे. नैराश्य, अश्लील चित्रफीती पाहणे, तुटत चाललेले संवाद यामुळे हे आजार बळावत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या आजारातील केवळ २० टक्के रुग्ण पूर्णत: बरे होत असल्याचेही डॉक्टर म्हणाले.

काय आहे स्किझोफ्रेनिया आजार?

स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असून मेंदूचा विकारही आहे. मेंदूमधील डोपामिन या रसायनाच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. जनुकांमधील बदल तसेच गर्भवती महिलेला ताप अथवा कुपोषित असल्यास बाळाला हा स्किझोफ्रेनिया आजार होण्याची जास्त शक्यता असतो.

स्किझोफ्रेनिया झालेल्या रुग्णांना विचार, भावना आणि वागणूक यात दोष निर्माण होतो. या आजारामध्ये व्यक्तींचा वास्तवाशी संबंध तुटतो, आणि तो माणूस स्वत: भ्रामक आणि आभासी जगामध्ये जगायला लागतात. रुग्णाचा मनावरील ताबा सुटतो. आजाराच्या स्वरूपानुसार त्यांच्यावर उपचार करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ठाणे मनोरुग्णालयात विशेष कार्यक्रम

जगभरात २४ मे हा दिवस जागतिक स्क्रिझोफ्रेनिया दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने ठाणे प्रादेशिक  मनोरुग्णालयात रुग्णांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रुग्ण गाण्यांवर नृत्य सादर करणार आहेत. तसेच सकाळी योगासने, ध्यानधारणा यांसारखे कार्यक्रम आयोजित करणार आले आहे.

लक्षणे

* दैनंदिन जीवनामधील कामावर लक्ष न लागणे

* स्वत:सोबतच पुटपुटणे

* भीती किंवा आभास निर्माण होतो

* लैगिंक भावना वाढतात

स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल समाजामध्ये जनजागृती पसरण्याची गरज आहे. यासाठी ठाणे मनोरुग्णालयातर्फे रुग्णांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. रुग्णालयात तरुणांचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. यासाठी पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

– डॉ. सुनील बदोडे, वैद्यकीय अधीक्षक, ठाणे मनोरुग्णालय