अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे काळूनगरमधील प्रकार उघड

कल्याण-डोंबिवली भागात बेकायदा नळजोडण्यांना ऊत आला आहे. डोंबिवली पश्चिमेतील काळूनगर भागात अशीच नळजोडणी करणाऱ्या प्लंबरला पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. मात्र पोलिसांनी त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करून सोडून दिल्याने पालिका कर्मचारी हतबल झाले आहे.

चार वर्षांपूर्वी महापालिकेच्या डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभाग कार्यालयात नळजोडणी घोटाळा उघडकीला आला होता. याच प्रभागात आता चोरीची नळजोडणी घेताना एका खासगी प्लंबरला पालिकेच्या अभियंत्यांनी पकडले आहे. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेत मोठय़ा प्रमाणात खासगी प्लंबरकडून पालिकेच्या मुख्य जलवाहिन्यांना छिद्र पाडून चोरीच्या नळजोडण्या देण्याची कामे सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम डोंबिवलीत खासगी प्लंबरचा धंदा सर्वाधिक जोरात असल्याची पालिकेत चर्चा आहे.

रविवारी दुपारी ‘ह’ प्रभागाचे उपअभियंता अनिरुद्ध सराफ, त्यांचे सहकारी संतोष आहेर डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडीतील काळूनगर रस्त्यावरून जात होते. त्यांना या भागातील इंदिरा निवास इमारतीसमोर रस्त्यावर खड्डा खणलेला आढळला. तेथे चार कामगार काम करीत होते. सराफ यांनी चार कामगारांना खड्डा का खणला, म्हणून विचारणा केली. त्यामधील एक प्लंबर व दोन कामगार पळून गेले. सराफ व आहेर यांनी हिरामण नारायण फर्डे (रा. धसई, शहापूर) या प्लंबरला पकडले. इंदिरा निवाससमोर या कामगारांनी मुख्य जलवाहिनीवरून चोरीची नळजोडणी घेण्याचे काम सुरू केले होते.

यानंतर हिरामणला रिक्षेत बसवून विष्णुनगर पोलीस ठाण्यात आणले. त्याच्यावर फक्त अदखलपात्र गुन्हा पोलिसांनी दाखल केला. यामुळे प्लंबर पुन्हा मोकाट सुटला आहे. या प्रकरणाची माहिती आयुक्त, पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आली आहे.

काळूनगर भागात पाणीचोरी करताना एक प्लंबर पालिका कर्मचाऱ्यांनी पकडला. त्याच्यावर गुन्हा दाखल करणे हे कर्मचाऱ्याचे काम होते. फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्या प्लंबरला सोडले गेले. म्हणजे चोरी करून काहीच होत नाही, असा एक संदेश कर्मचारी भूमाफिया, प्लंबर, पाणीचोरांना कर्मचारीच देत आहेत. हा प्रश्न येत्या महासभेत आपण उपस्थित करणार आहोत.

-वामन म्हात्रे, नगरसेवक