शहरातील हवा पुन्हा प्रदूषित; गेल्या काही दिवसांपासून धुरके
ठाणे : मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या टाळेबंदीमुळे शहरातील हवेचा सुधारलेला दर्जा टाळेबंदी शिथिलिकरणांनतर पुन्हा खालवला आहे. शहरातील हवा प्रदूषण वाढले असून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरात धुरके पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ठाणे शहराला एका बाजूने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पट्टा तर दुसऱ्या बाजुने विस्तीर्ण खाडी किनारा लाभला आहे. या निसर्गामुळे शहराची हवा शुद्ध असल्याचे मानले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून शहराचे झपटय़ाने नागरीकरण झाले असून शहराच्या वेशी रुंदावल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील वाहनांची संख्याही वाढली आहे. तसेच शहरात सध्या मेट्रोसारखे मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शहरातील वायू प्रदूषणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मार्च महिन्याच्या अखेरपासून टाळेबंदी लागू केली होती. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते आणि रस्त्यावरील वाहनांची वर्दळही कमी झाली होती. याशिवाय, मजूर निघून गेल्याने मेट्रो तसेच गृहप्रकल्पाची कामे ठप्प झाली होती. त्यामुळे २३ मार्च ते ३१ मे या टाळेबंदीच्या काळात शहरातील हवेचा दर्जा कमालीचा सुधारला होता. मात्र टाळेबंदी शिथिलीकरणानंतर शहरातील सर्वच व्यवहार आता पूर्ववत सुरू झाले असून रस्त्यावर वाहनांची वर्दळ पुन्हा वाढली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मंदावलेली मेट्रोची कामे पुन्हा वेगाने सुरू झाली आहेत. याचा परिणाम शहरातील वातावरणावर होऊ लागला असून शहरातील हवा पुन्हा प्रदुषित होत असल्याचे चित्र आहे. त्यातच शहरातील महत्त्वांच्या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडलेले असल्यामुळे सर्वत्र धूळधाण उडत आहे. तसेच वातावरणातही गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बदल झाले आहेत. त्यामुळे शहरात धुरके दिसून येत आहेत. शहरातील धुरक्याचे हे प्रमाण असेच वाढत राहिल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘शहरात धुरके नेमके कशामुळे पसरले आहे याचा अभ्यास सुरू आहे,’ महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले.
हवेची गुणवत्ता
ठिकाण प्रदूषण निर्देशांक
तीन हात नाका १६६ टक्के
कोपरी प्रभाग समिती ४० टक्के
नौपाडा प्रभाग समिती ३५ टक्के
रेप्टाकोस कंपनी ३० टक्के
हवेची गुणवत्ता – ० ते २५ टक्के : चांगली, २६ टक्के ते ५० टक्के : मध्यम, ५१ टक्के ते ७५ टक्के : प्रदूषित, ७५ टक्कय़ांपेक्षा जास्त : अत्यंत प्रदूषित
शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून धुरके पसरल्याचे दिसून येत आहे. हे धुरके आरोग्यासाठी हानीकारक आहे. मात्र, ते नेमके कशामुळे पसरले आहे हे आता सांगणे कठीण असून त्यावर आभ्यास सुरू आहे.
— विद्याधर वालावलकर, पर्यावरण अभ्यासक
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2020 12:24 am