करोनाच्या प्रादुर्भावामुळे वन विभागाचा निर्णय

बदलापूर : वन विभागातर्फे दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने चंद्रप्रकाशाचा पुरेपूर फायदा घेत राज्यभरातील जंगलांमध्ये जलसाठय़ांवर येणाऱ्या प्राण्यांची गणना केली जाते. मात्र, करोनाच्या संकटामुळे यंदाची प्राणीगणना करण्याची ही पद्धत स्थगित करण्यात आली असून गणनेदरम्यान सामाजिक अंतर राखता येणार नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ठाणे जिल्ह्य़ात मोठी वनसंपदा आहे. गेल्या दोन वर्षांत बारवीच्या जंगलात बिबटय़ाचा वावर वाढल्याचे समोर आले होते. रानगवाही या जंगलात आढळून आला होता. दरवर्षी मे महिन्यात बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्र सर्वात मोठा असतो. या चंद्र प्रकाशात वन विभागातर्फे जंगलातील पाणवठय़ाजवळ प्राण्यांची गणना केली जाते. या गणनेसाठी पाणवठय़ांजवळ मचाण बांधून त्यावर वन विभागाचे कर्मचारी आणि प्राणीप्रेमी प्राण्यांची गणना करतात. मात्र करोनाच्या संकटामुळे यंदाच्या प्राणीगणनेलाही खीळ बसली आहे. या उपक्रमात सामाजिक अंतर राखले जाण्यात अडथळा येण्याची भीती असल्याने यंदाची प्राणीगणना स्थगित करण्याचे आदेश राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिल्याची माहिती बदलापूर वनक्षेत्रपाल प्रमोद ठाकर यांनी दिली.