ठाणे स्थानक परिसरातील रिक्षाचालकांची मनमानी; स्थानक ते वागळे इस्टेट प्रवास दोन रुपयांनी महागला

ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रिक्षा थांबा हटवून तो दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केला असून या नव्या थांब्यामुळे एक किमी अंतराचा वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याने शेअर रिक्षाचालकांनी अचानकपणे प्रति प्रवासी दोन रुपयांची भाडेवाढ केली आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवास खर्च महागल्याने प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

दरम्यान, चार वर्षांनंतर ही भाडेवाढ केल्याचा दावा रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे, तर यापूर्वी ठरवून दिलेल्या दरपत्रकाप्रमाणेच रिक्षाचालक भाडे आकारत असल्याचा दावा प्रादेशिक परिवहन विभागाने केला आहे. मात्र, शेअर रिक्षांमधून चार प्रवाशांची नियमबाह्य़ वाहतूक केली जात असताना प्रतिप्रवासी भाडेवाढ करून रिक्षाचालक प्रवाशांना लुटत आहेत.

ठाणे स्थानकाच्या पश्चिम परिसरात अधिकृत रिक्षा थांबा देण्यात आला असला तरी या परिसरात बेकायदा रिक्षा थांबे उभारण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून स्थानकाजवळील आलोक हॉटेल परिसरातून लोकमान्यनगर, यशोधननगर, सावरकरनगर, आशार आयटी पार्क, कामगार नाका आणि ज्ञानेश्वरनगर या भागांत जाणाऱ्या रिक्षांसाठी बेकायदा थांबा उभारण्यात आला होता. येथून शेअर रिक्षांमधून प्रवाशांची वाहतूक सुरू असते. स्थानक ते लोकमान्यनगर या प्रवासासाठी १८ रुपये आकारले जात होते, तर नितीन कंपनीपर्यंतच्या प्रवासासाठी १२ रुपये आकारले जात होते. मात्र, या बेकायदा थांब्यामुळे प्रवाशांना स्थानकातून चालणे शक्य होत नव्हते.

या थांब्यांवर उभ्या असलेल्या रिक्षांमधून प्रवाशांना वाट शोधावी लागायची. याबाबत वाहतूक पोलीस आणि महापालिकेकडे नागरिक तक्रारी करत होते. या तक्रारींच्या पाश्र्वभूमीवर महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत या ठिकाणी पदपथ उभारणीचे काम सुरू केले आहे. त्यासाठी या परिसरात लोखंडी मार्गरोधक उभारले असून हा थांबा बेकायदा रिक्षांसाठी बंद करण्यात आला. हा थांबा बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी या रिक्षांना गावदेवी येथे जागा उपलब्ध करून दिली. मात्र, या नव्या थांब्यामुळे एक किमी अंतराचा वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याने रिक्षाचालकांनी प्रति प्रवासी दोन रुपये भाडेवाढ लागू केली आहे. अचानक झालेल्या भाडेवाढीमुळे प्रवासीही हैराण झाले आहेत.

ठाणे स्थानकापासून ते शहरातील अंतर्गत भागात जाण्यासाठी रिक्षाचालकांना प्रादेशिक परिवहन विभागाने दरपत्रक आखून दिले आहे. या दरपत्रकानुसार रिक्षाचालक प्रवास भाडे आकारत आहेत. मात्र, हे दरपत्रक केवळ तीन प्रवाशांसाठीच तयार करण्यात आलेले आहे.

– नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन  अधिकारी, ठाणे</p>

वाहतूक व्यवस्था बदलल्यामुळे रिक्षाचालकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांकडून दरवाढीची मागणी केली जात होती. त्यामुळे हे दर वाढविण्यात आले. मात्र, परिवहन प्रादेशिक विभागाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा आता वाढविण्यात आलेले दर हे कमी आहेत.

– विनायक सुर्वे, अध्यक्ष एकता रिक्षा टॅक्सीचालक मालक सेना