सागर नरेकर

चौदा वर्षांपूर्वी २६ जुलै रोजी आलेल्या महाभयंकर पुरामुळे जवळपास सर्वच यंत्रणांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. काय करायला हवे होते, काय टाळायला हवे होते हेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झाले होते. मागच्यास ठेच पुढचा शहाणा हे म्हणणे बहुधा प्रशासकीय यंत्रणांना मान्यच नसावे. तसे ते असते तर चौथी मुंबई म्हणून नावारूपास येणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर, वांगणी या भागांतील निसर्गाचे जे लचके तोडणे सुरू आहे ते किमान थांबले असते. गेल्या चार दिवसांपासून बदलापूर आणि आसपासच्या भागात पुराने जे थैमान घातले आहे ते अशाच अनिर्बंध अशा विकासाचे प्रतीक म्हणावे लागेल.

चौथी मुंबई म्हणून नावारूपाला येणाऱ्या बदलापूर शहराला २६ आणि २७ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने हादरा दिला. कर्जत आणि उल्हास नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे उल्हास नदीने पुन्हा एकदा आपली धोक्याची पातळी ओलांडली. २६ जुलैच्या रात्रीपासूनच बदलापूर शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. २७ जुलै रोजी या पाण्याने मोठी पातळी गाठली होती. त्यामुळे बदलापूर पश्चिमेतील नदीकिनारी असलेले बहुतांश भाग पाण्याखाली गेले. या वेळी फक्त नदीच नाही तर नाल्यांनीही आपल्या मर्यादा ओलांडल्या. खरे तर त्या ओलांडण्यासाठी नाल्यांना भाग पाडले गेले. त्यामुळे स्थानक परिसरापासून ते थेट उल्हास नदीच्या मुखापर्यंत जवळपास १०० ते १५० मीटपर्यंतचा भाग पाण्याने व्यापला गेला. चौदा वर्षांपूर्वीपेक्षा कमी मात्र त्यापेक्षा अधिक नुकसानकारक पाणी या सर्व भागांत शिरले. त्यानंतर पुन्हा चौदा वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. मात्र तेव्हाचा निसर्गनिर्मित आणि आताच्या मानवनिर्मित पूर हा फरक नागरिकांच्या लक्षात येऊ  लागला.

गेल्या चौदा वर्षांत बदलापूर शहरात नागरीकरण मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. त्या वेळी जे भाग मोकळे होते त्या सर्व भागांत आता टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. अनेक मोकळे भाग इमारतीने व्यापले गेले आहेत. या इमारतींमुळे हा पूर आला असे म्हणणेही धाडसाचे ठरेल. बदलापूर शहरातून बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीकडे ज्या पद्धतीने प्रशासकीय यंत्रणांनी पाठ फिरवली त्याचे हे परिणाम म्हणावे लागतील. या नदीने अनेकदा आपले खरे पात्र बदलापूर आणि आसपासच्या गावांना दाखवून दिले आहे. मात्र तरीही त्या पात्राचा विचार अद्याप कोणत्याही प्रशासनाने केला नाही. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या या उल्हास नदीच्या पूररेषेचा अद्याप कुठेही मागमूस नाही. ही रेषा शहराच्या विकास आराखडय़ात नोंदवली गेली नाही. त्यासाठीचे कोणतेही सर्वेक्षण केले नसल्याचेही वारंवार समोर आले आहे. मात्र त्यावर ठोस काहीही होताना दिसत नाही. पूररेषा नोंदवण्याचे काम पाटबंधारे खात्याचे असल्याचे सांगत पालिका प्रशासन जबाबदारी झटकताना दिसते आहे. तर पूररेषा नोंदवण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे मनुष्यबळ नसल्याचे सांगण्यात येते. मात्र या काळात २००५ साली आलेल्या पुराच्या क्षेत्रातही नव्याने बांधकामांना परवानगी देऊ न कोटय़वधी रुपयांचा विकास कर वसूल करण्यात पालिकेने हात आखडता घेतला नाही. त्यामुळे चौदा वर्षांनंतरही पूररेषेत झालेली बांधकामे पुन्हा एकदा पाण्याखाली गेली. नदीचा किनारा संरक्षित करण्यासाठी कोणतीही रेषा पालिका प्रशासनाकडून रेखांकित केली गेली नाही. त्यामुळे अगदी नदीच्या पात्राला लागून अनेक मोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. अनेक प्रकल्पांसाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी किती नागरिकांना भविष्यातल्या पुराला सामोरे जावे लागेल हे सांगता येत नाही.

निसर्गालगतचे सान्निध्य नियोजनाच्या मुळावर

नदीच्या पात्रात किंवा त्या शेजारी बांधकाम करण्यापर्यंतच बांधकाम व्यावसायिक थांबले नाहीत, तर शहरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्याचे प्रवाहदेखील ठिकठिकाणी वळवण्याचा प्रताप बांधकाम व्यावसायिकांनी केला आहे. त्याला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिकेचे संबंधित अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्याची रुंदी शहरातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी दिसून येते आहे. पश्चिमेतील बेलवली, शनीनगर, दुबे बाग, हेंद्रेपाडा, दीपाली पार्क परिसर या भागांत अनेक ठिकाणी नाला निमुळता झाला आहे. यात अनेक ठिकाणी नाल्याच्या पात्रात भर घालून इमारती उभारण्याचा पराक्रम बांधकाम व्यावसायिकांनी केला आहे. त्यामुळे नाल्यासह त्या इमारतीत राहणाऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. आजही अनेक प्रकल्प नाल्याचे प्रवाह वळवून सुरू असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. याचा फटकाही भविष्यात बसल्याशिवाय राहणार नाही.

गावेही पूरग्रस्त

बदलापूरप्रमाणे कल्याण तालुक्यातील शहराच्या वेशीवर असलेल्या उल्हासनगर महापालिकेच्या शेजारी असलेल्या म्हारळ, वरप आणि कांबा या गावांनाही पुन्हा एकदा पुराचा फटका बसला. कल्याण अहमदनगर रस्त्यावर असलेली ही गावे अगदी उल्हास नदीच्या किनारी आहेत. चौदा वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे येथे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. अनेक घरे, व्यक्ती, जनावरे वाहून गेली होती. अनेक महिने त्यांना पुनस्र्थापित करण्यात गेले होते. गेल्या पाच वर्षांत म्हारळ, म्हारळ पाडा, वरप आणि कांबा या भागांत नदीच्या किनारी अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी आपले गृहप्रकल्प उभे केले आहेत. ५० लाखांपासून ते दीड कोटींपर्यंतची घरे अत्याधुनिक सोयीसुविधांसह येथे देण्यात आली आहे. हेच क्षेत्र उल्हास नदीच्या क्षेत्रात येतात. यापूर्वी येथे शेती होती. ती जागा भर घालून इमारती उभारण्यासाठी वापरण्यात आली. त्यामुळे त्या जागी साचणारे पाणी म्हारळ, वर आणि कांबा या गावात शिरले. या ठिकाणी नदीकिनाऱ्यापासून काही अंतर राखून बांधकाम परवानगी देण्याची गरज आहे. पूररेषेत असणाऱ्या इमारतींचे तळ आणि पहिला मजला सार्वजनिक म्हणून वापरण्याची तरतूद करणे गरजेचे आहे. मात्र तसा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही.