19 September 2020

News Flash

निमित्त : आदिवासी पाडय़ांचा ‘प्रगती’मार्ग

ठाणे जिल्ह्य़ातील जव्हार व मोखाडा या दोन आदिवासी व दुर्गम भागांतील लोकांच्या उत्थानासाठी थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ४२ वष्रे ‘प्रगती प्रतिष्ठान’ ही संस्था नेटाने काम

| June 13, 2015 01:26 am

tvlog02या आदिवासी भागात कर्णबधिर विद्यालय, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आदी प्रकल्प या संस्थेने राबवले, तसचे आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प, ग्रामीण नळपाणी योजना, जलसंधारण, शेती विकास प्रकल्प आदी योजनाही या संस्थेने राबविल्या. या संस्थेच्या अथक परिश्रमाचा हा लेखाजोखा..

प्रगती प्रतिष्ठान
निश्चयाला चिकाटी, निष्ठा आणि परिश्रम यांची जोड दिली तर कोणतेही अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवता येते. आदिवासीबहुल भागात थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ४२ वष्रे नेटाने काम करणाऱ्या प्रगती प्रतिष्ठानचे काम पाहून याची प्रचीती येते. वसंतराव पटवर्धन यांनी प्रतिष्ठानची स्थापना बिगरसरकारी, बिगरराजकीय व ना फायदा ना तोटा या तत्त्वावर केली. आदिवासी पाडय़ांमध्ये फिरताना इथल्या आदिवासी लोकांची दुरवस्था पाहून या लोकांच्या उत्थानाचे बीज त्यांच्या मनात रुजले. या भागांमध्ये फिरताना त्यांच्या लक्षात आले की, या लोकांच्या विकासासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही. त्यासाठी निरपेक्षपणे काम करणाऱ्या सामाजिक संस्थेची गरज आहे. या आदिवासी लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूनेच वसंतराव पटवर्धन यांनी ‘प्रगती प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना ७ जून १९७२ रोजी केली. अर्थात, सुरुवातीला येथील आदिवासी पाडय़ांतील लोकांशी संपर्क, त्यांची मानसिकता, गरजा, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्या निवारण्यासाठी आखणी करणे अशी कामे सुरू होती. संस्थेने १९७८ मध्ये प्रकल्पांच्या आखणीला सुरुवात केली आणि १९८० मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला ठाण्यातून संस्थेचे काम सुरू होते. जव्हार-मोखाडापर्यंतचा पल्ला गाठणेही खूप कसरतीचे काम होते. पुढे संस्थेच्या कामाला वेग आला आणि प्रतिष्ठानने आपल्या कामात अनपेक्षित असे यश मिळवले.
ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा या दोन आदिवासी व दुर्गम भागांत कार्यरत असलेल्या या संस्थेने सुरुवातील शिक्षण, अपंग व पुनर्वसन, स्वयंरोजगार यावर भर देतानाच हळूहळू नळपाणी योजना, जलसंधारण, शेती, सौरऊर्जा यासाठी विशेष प्रगती करून स्थानिक लोकांना स्वबळावर उभे करण्याचे शिवधनुष्य पेलले आहे.
आदिवासी पाडय़ातील लोकांसाठी नावीण्यपूर्ण योजना आखून त्यांना अर्थसहाय्य मिळवून देणे, तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देतानाच ते तंत्रज्ञान पुढे योग्य प्रकारे चालविण्याची मानसिकता, क्षमता, विश्वास निर्माण करणे अशी अनेक महत्त्वाची कामे केली जातात. अर्थात हे सर्व करताना आदिवासी पाडय़ांतील लोकांना त्यांच्या पारंपरिक समजुतींमधून बाहेर काढून आधुनिक गोष्टींशी त्यांची नाळ जुळविण्याचे शिवधनुष्यही संस्थेने समर्थपणे पेलले आहे.
संस्थेचे प्रकल्प व कार्यक्रम ’नीलेश लक्ष्मण मुर्डेश्वर कर्णबधिर विद्यालय, जव्हार – १९८५मध्ये संस्थेने कर्णबधिर मुलांसाठी ही शाळा सुरू केली. यात कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या भाषावाढीच्या दृष्टीने मौखिक पद्धत व खुणांची भाषा, तसेच अद्ययावत स्पीच थेरपी युनिट अर्थात वाचा उपचार कक्षात मुलांच्या भाषावाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. आतापर्यंत येथे २८८ मुलांनी शिक्षण घेतले असून, सध्या ६९ मुले शिक्षण घेत आहेत. येथे सौरऊर्जा तंत्र जुळवणी कक्ष व वारली कला केंद्राची स्थापना केली आहे.
गेल्या वर्षी अलियावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने विद्यालयात सध्या शिकत असलेल्या ६५ विद्यार्थ्यांना व ५२ माजी विद्यार्थी व अन्य १८ असे एकूण १३५ व्यक्तींची श्रवणचाचणी करून ऑडिओग्राफ देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे सिव्हिल हॉस्पिटल, ठाणे यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने अपंगत्वाचे दाखले देण्यात आले.
*प्रगति विद्यार्थी वसतिगृह, मोखाडा- या वसतिगृहाला २५ मुलांची मान्यता आहे. या वसतिगृहात जव्हार व मोखाडा तालुक्यांतील दुर्गम भागांतील विद्यार्थी असून ते कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल, मोखाडा येथे शिक्षण घेत आहेत. २०१३-१४ या वर्षीचा वार्षिक निकाल १०० टक्के लागला. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांचे चांगले ज्ञान व्हावे म्हणून विशेष शिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वार्षिक परीक्षेचा निकाला ८० टक्के इतका लागतो. येथील विद्यार्थी निवासी असल्याने त्यांना स्वयंरोजगारांचे शिक्षण द्यावे असा प्रयत्न संस्था करीत आहे.
*सौरऊर्जा- ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी व डहाणू या दुर्गम तालुक्यांमध्ये सौरऊर्जेच्या सहाय्याने प्रकाश व्यवस्था केली जाते. अर्थात या कामी संस्थेला अनेक दानशूर व्यक्ती व संस्था, खाजगी कंपन्या यांची मदत होते. या तालुक्यांमधील प्रत्येक गावात वीज उपलब्ध व्हावी यासाठी संस्था कार्यरत आहे. या तालुक्यांतील ३० पाडय़ांतील ७७४ कुटुंबांना सौर संच व २ पाडय़ांकरिता ६ सौर पथदिवे लावण्यात आले आहेत. ४ माजी कर्णबधिर विद्यार्थी व दोन युवकांना ‘कमवा व शिका’ या तत्त्वावर स्वयंरोजगार मिळाला आहे. विशेष म्हणजे हे सर्व काम युवकांचा बचत गट करीत आहे.
*जलसंधारण- प्राइड प्रकल्पांतर्गत संस्थेने जव्हार तालुक्यातील आकरे, आयरे व कासटवाटी या ग्रामपंचायतींमध्ये बंधाऱ्याचे काम पूर्ण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध होते.
* ग्रामीण नळपाणी योजना- या वर्षी संस्थेने आकरे ग्रामपंचायतीमध्ये ४ महिला बचत गट तयार केले आहेत. या ग्रामपंचायतीच्या ५ पाडय़ांत एकूण १० बचतगट पूर्वीपासून कार्यरत होते. या गटांना संस्थेमार्फत क्षमतावाढ, व्यवस्थापन कौशल्ये, बँकेच्या व्यवहाराबाबत साक्षरता यासाठी प्रयत्न करीत आहोत.
* खेळघर- हसतखेळत शिक्षण या संकल्पनेनुसार खेळघर प्रकल्प सुरू करण्यात आला. आकरे ग्रामपंचायतीच्या पाच पाडय़ांतील प्राथमिक शाळेत आज ८१ विद्यार्थी आनंददायी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. वाडा येथील सोनाळेमधील क्वेस्ट या तज्ज्ञ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा सुरू आहे.
* शेती विकास प्रकल्प- आधुनिक शेतीच्या नवनवीन पद्धतींचा अभ्यास करून त्याचे येथील शेतकऱ्यांना ज्ञान, प्रशिक्षण देणे तसेच ग्रीन हाऊसमध्ये रोपे तयार करून शेतकऱ्यांना देणे, शेतीकरिता पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून सिमेंट बंधारे, शेततळी बांधणे याकरिता संस्थेने सिंजेंटा फाउंडेशनच्या तांत्रिक साहाय्याने २००६-२००७ मध्ये शेती विकास प्रकल्प प्रतिष्ठानने कार्यान्वित केला आहे.
* वॅसरॅग प्रकल्प- दुर्गम आणि अतिदुर्गम पाडय़ांतील आदिवासी लोकांना पाणी मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. पाडय़ातील लोकांना पाणी उपलब्ध व्हावे तसेच पाडय़ांतील स्वच्छतेसाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून ग्लोबल ग्रँट फंडातून (वॅसरॅग अ‍ॅण्ड सॅनिटेशन रोटरी अ‍ॅक्शन ग्रुप) हा प्रकल्प राबविण्यात येतो. यासाठी गावकऱ्यांच्या  पाणी व स्वच्छता साक्षरतेसाठी कार्यशाळा घेतल्या जातात. या योजनेंतर्गत आकरेमधील ९ पाडय़ांचे भूजल तज्ज्ञांमार्फत सर्वेक्षण करून पाडय़ांना पाणीपुरवठा करण्यासाठी बोअरवेल करण्यात आल्या आहेत.

या परिसरातील लोकांच्या प्राथमिक गरजाही भागत नाहीत. त्यांना पोटभर अन्नही मिळत नव्हतं. त्यांची पोटाची भूक भागविल्याशिवाय त्यांना शहाणपण शिकवणं उपयोगाचं नाही. मग आम्ही त्यांना किमान जेवण उपलब्ध करून देणं, त्यांची भूक भागवणं याकडेच लक्ष दिलं. त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासाठी प्रकल्प राबविले. या आदिवासी पाडय़ांमध्ये फिरून या लोकांच्या मुख्य गरजा कोणत्या, याचा अभ्यास करून त्यानुसार प्रकल्पांची आखणी केली. या लोकांची गरज आणि त्यानुरूप प्रकल्पांची आखणी, त्या प्रकल्पांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत या भागांच्या विकासाला संस्थेने हातभार लावला.
 – सुनंदा पटवर्धन,  सचिव, प्रगती प्रतिष्ठान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 1:26 am

Web Title: article about pragati pratishthan in jawhar of thane
Next Stories
1 कर्जतशी भावनिक बंध
2 खाऊखुशाल : कुरकुरीत चिरोटय़ांचा गोडवा
3 ५ लाख अंडय़ांचा दररोज फडशा!
Just Now!
X