‘‘खरं सांगू, श्रीलंकेला जाण्यासाठी तिरंगी ध्वजाची प्रतिमा डाव्या बाजूला लावलेला ट्रॅकसूट जेव्हा मी घातला तेव्हा त्या ‘वीरश्री’च्या भावनेने क्षणभर मला रडूच कोसळले.’’ के. जे. सोमय्या कॉलेजमध्ये शास्त्रशाखेत दुसऱ्या वर्षांत शिकत असलेली सीनियर कॅडेट कॅप्टन रेवा खरे बोलत होती. तेव्हा जरी तिच्या डोळ्यांनी दगा दिला असला तरी या क्षणी भारताचे श्रीलंकेत प्रतिनिधित्व करायला मिळाल्याच्या आनंदाने तिचे डोळे लकाकले होते.
सुट्टी म्हटलं की ट्रेकिंगला जायचं, अशी मनोधारणा असलेल्या अजित आणि सरिता खरे यांची ही कन्या. त्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षांपासून सहय़ाद्री, हिमालय अशी ‘वरवर’ चढण्याची आवड मनात रुजलेली, जालंदरला आर्मी वेल्फेअर हाऊसिंग ऑर्गनायझेशनच्या वसाहतीत राहिल्यामुळे लष्करी पोशाखाचा रुबाब आणि दरारा याला सरावलेली,. शेजारीपाजारी राहणाऱ्या कर्नल, मेजर काकांशी ‘गोळी मारो’ म्हणत लुटुपुटुची लढाई खेळून आजमितीस ठाण्यात स्थिरावलेली.
कॉलेजमध्ये असताना नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटेनिअरिंग उत्तरकाशी, उत्तराखंड येथून, जिथे रेवाची आई प्रशिक्षक म्हणून काम करते, बेसिक माऊंटेनिअरिंगचा कोर्स ए श्रेणीत उत्तीर्ण होताना तिथे एन.सी.सी.मध्ये असलेल्या काही मैत्रिणी भेटल्या. मैत्रिणींशी गप्पा मारताना त्यांचे या वेगळ्या वाटेवरचे अनुभव ऐकून रेवा प्रभावित झाली आणि आपणही एन.सी.सी.त जायचं, हा निर्णय घेऊनच ती घरी परतली. त्यासाठी पशुवैद्यकशास्त्र या शाखेला जाण्याच्या निर्णयावर फुली मारून फिजिक्स, मॅथ्स आणि जिऑलाजी या विषयांतच पदवीधर व्हायचे ठरवले.
आल्या आल्या जयहिंद नेव्हल युनिटमध्ये तिने नाव नोंदवले. दर रविवारी ७ वाजता सेशन कोर्टाच्या आवारात परेड, दहा-दहा दिवसांची निवासी शिबिरं यासाठी आईवडिलांच्या उबदार मायेच्या घरटय़ातून बाहेर पडताना रेवाची पावलं जराशी अडखळली; परंतु ‘मला हे करायचंच आहे’ हा मनाचा निर्धार पक्का होता. त्यामुळे पावलांना गती आली. पुढे अठरा कॅम्पमध्ये सहभागी होताना तिने उंच भरारी मारली.
औरंगाबाद येथील इंटरकॉलेज आरडी कॅम्प (रिपब्लिक डे कॅम्प) म्हणजे दिल्लीत होणाऱ्या आरडी कॅम्पची रंगीत तालीमच. समूहगीत, नृत्य, बॅले, ड्रिल, फ्लॅग एरिया ब्रीफिंग, जिथे तुमच्या सामान्यज्ञानाची कसोटी लागते, अशा सर्व स्पर्धामध्ये भाग घेऊन ती बक्षिसपात्र ठरली. महाराष्ट्राच्या नेव्ही विभागाची ‘सवरेत्कृष्ट छात्र’ म्हणून तिची निवड झाली. सुरुवातीपासूनच नेतृत्वाची धुरा रेवाच्या खांद्यावर विसावली होती. या कॅम्पमध्ये असताना कॉलेजच्या परीक्षेचा एक पेपर लिहिण्यापुरती ती औरंगाबादहून ठाण्याला येऊन परत औरंगाबादमध्ये दाखल झाली ती केवळ तिच्या बाबांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच.
आता लक्ष्य दिल्ली ‘सर’ करण्याचे होते. अतिशय शिस्त, काटेकोरपणे वेळेचे नियोजन, भरपूर अंगमेहनत, चौफेर सामान्यज्ञान, व्यक्तिमत्त्वाला झळाळी प्राप्त करून देणारे प्रशिक्षण यामुळे दिल्लीतील आरडी कॅम्पमध्येही समूहगीत, नृत्य यामध्ये तिला बक्षीस मिळाले. फायरिंग, सामूहिक चर्चा, वैयक्तिक मुलाखत आणि फ्लॅग एरिया ब्रीफिंग यातील नैपुण्यामुळे ती ‘सवरेत्कृष्ट छात्र’ म्हणून निवडली गेली. फ्लॅग एरियामध्ये संत ज्ञानेश्वर, मंदिर, तबला, ढोलकी, सहय़ाद्री, दहीहंडी, गणपती, गेट वे ऑफ इंडिया यामार्फत महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव अधोरेखित करून ती ‘सुवर्णपदकाची’ मानकरी ठरली. अनेक सर्वोच्च पदाधिकाऱ्यांसमोर फ्लॅग ब्रीफिंग करण्याच्या मिळालेल्या संधीचे रेवाने अक्षरश: सोने केले. ‘तू नेव्हीमध्ये आहेस याचा आम्हाला अभिमान वाटतो’ अशा अभिप्रायाने तिचे कान सुखावले. काही गमतीही घडल्या. एका पदाधिकाऱ्याच्या कमरेला असलेल्या तलवारीकडे आकर्षणापोटी तिचे सारखे लक्ष जात होते. त्या वेळी ‘रेवा ब्रीफिंगकडे लक्ष दे, आपल्याला बक्षीस मिळवायचे आहे,’ असे ती सतत मनाला बजावत होती. एका उच्च पदाधिकाऱ्याने ‘उकडीचा मोदक करता येतो का?’ अशी गुगलीही टाकली.
त्यानंतर ‘यूथ एक्स्चेंज’ कार्यक्रमाकरिता शिष्यवृत्ती मिळण्यासाठी रेवाने दिल्लीला एक परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झाल्यामुळे तिचं क्षितिज विस्तारलं. श्रीलंकेत जाण्यासाठी दोन्ही देशांचा इतिहास, भूगोल, अर्थकारण, शेजारधर्म, खाण्यापिण्याच्या चालीरीती, रीतिरिवाज असं उपयुक्त प्रशिक्षण दिल्लीला घेतले. भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारत सरकारकडून मिळालेला कॉम्बॅट युनिफॉर्म, भारतीय साडी आणि पांढरा ट्रॅकसूट घालून ती निळ्या सागरातील सुंदर पाचूच्या बेटावरील कोलंबो येथे पोहोचली. श्रीलंकेतील नेव्हल अ‍ॅकॅडमी, मिलिटरी अ‍ॅकॅडमी, एन.एस. नौका यांना भेटी, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका या देशांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी, श्रीलंकेच्या उच्च पदाधिकाऱ्यांशी समोरासमोर बसून वैयक्तिक रीतीने केलेला सुसंवाद असं सगळं रेड कार्पेटच अनुभवता आलं. एका वेगळ्याच जबाबदारीची अनुभूती रेवाने घेतली. स्कूबा डायव्हिंगमध्येही रेवाला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या संपूर्ण यशस्वी वाटचालीसाठी तसेच एक कुशल संघटक म्हणून एन.सी.सी. छात्राच्या दृष्टीने असणारा सर्वोच्च सन्मान म्हणजे डी. जी. कमांडेशन कार्ड रेवाला नुकतेच बहाल करण्यात आले आहे.