वाढत्या शहरात लोकवस्तीच्या तुलनेत जशी नागरी सुविधांची आवश्यकता असते, तशीच उत्तम वाचन संस्कार करणाऱ्या ग्रंथालयांचीही असते. आता ऑनलाइन सुविधेमुळे प्रत्यक्ष ग्रंथालयात येऊन पुस्तके वाचण्याची आवश्यकता नसली तरी त्यामुळे या व्यवस्थेचे महत्त्व जराही कमी झालेले नाही. कारण वैचारिक भूक भागविण्याचा तो सर्वोत्तम पर्याय आहे. ग्रंथालयात जाऊन हवे असलेले पुस्तक शोधण्याची, पुस्तकावर मायेचा हात फिरवून ते पुस्तक छातीशी कवटाळून मग वाचण्याची मजा काही औरच असते. ठाण्यात पूर्व विभागात कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसरातील शारदा सार्वजनिक वाचनालयात या भागातील वाचकांसाठी एक समृद्ध ग्रंथदालन आहे.
पश्चिम विभागाच्या तुलनेने ठाणे पूर्व परिसर शांत आहे. अष्टविनायक चौकही त्याला अपवाद नाही. या भागातही मोठी लोकवस्ती आहे. मात्र गजबजाट, कलकलाट नाही. याच परिसरात शारदा सार्वजनिक वाचनालय आहे. सुरुवातीला राजमाता जिजाबाई ट्रस्टतर्फे १९७३ मध्ये ग्रंथालयाची स्थापना झाली. मात्र आता ग्रंथालयाच्या ट्रस्टशी काही संबंध नाही. स्वतंत्रपणे भाडय़ाच्या जागेत शारदा वाचनालय नागरिकांना ग्रंथसेवा पुरवत आहे. सुरुवातीला संस्थेला देणगी स्वरूपात आलेल्या पुस्तकांपासून ग्रंथालयाची सेवा सुरू झाली. सध्या ग्रंथालयात पंधरा हजारांहून अधिक ग्रंथ आहेत. तीनशेहून अधिक सभासदसंख्या आहे. वाचनालयात प्रवेश केल्यावर जवळच मुक्त वृत्तपत्र वाचन विभाग आहे. या विभागाच्या शेजारीच बालवाचकांसाठी पुस्तकांची कपाटे पाहायला मिळतात. लहान मुलांना या ठिकाणी लहान खुच्र्या ठेवण्यात आल्या असून त्यांना तेथे बसून वाचण्याची सोय केलेली आहे. ग्रंथालयाची जागा लहान असली तरी पुस्तकांची सुयोग्य मांडणी, काचबंद कपाटात काळजीपूर्वक ठेवलेली पुस्तके यामुळे ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांच्या नीटनेटक्या कामाचा प्रत्यय येतो. कथा, कादंबऱ्या, अध्यात्म अशा वेगवेगळ्या विषयांप्रमाणे पुस्तकांची मांडणी, ग्रंथालय प्रणालीनुसार पुस्तकांचे कोडिंग करून ठेवण्यात आले आहे. सध्या वाचकांना त्वरित सेवा पुरवण्याच्या हेतूने ग्रंथालयाचा सर्व व्यवहार संगणकाच्या माध्यमातून करण्यासाठी ग्रंथालयाचा कर्मचारी वर्ग प्रयत्नशील आहे. ज्योत्स्ना भास्कर या ग्रंथालयाच्या मुख्य ग्रंथपाल असून आपल्या इतर सहकाऱ्यांना त्यांनी संगणक प्रणालीचे प्रशिक्षण दिले आहे. श्रद्धा दोंदे आणि सुशीला सावंत या दोन कर्मचारी वर्ग ग्रंथालयाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी मेहनत घेतात. इतर ग्रंथालयांमध्ये फारशी पाहायला न मिळालेली जबाबदारी हिमा शेंडे यांनी सांभाळली आहे. वाचक आणि ग्रंथालय समिती यांच्यात दुवा साधण्याचे काम हिमा शेंडे करतात. वाचकांच्या काही समस्या, मागण्या, पुस्तकांची आवड याबद्दल समितीकडे माहिती पोहचवण्याचे काम केले जाते.
वाचकांची आवड लक्षात घेऊन, काही पुस्तकांची परीक्षणे वाचून दरवर्षी सुमारे चारशे पुस्तकांची खरेदी केली जाते. सरकारी अनुदानातून ६४ हजार रुपयांची पुस्तके खरेदी केली जातात. ग्रंथालयात विश्वकोशाचे ३५ खंड, भक्ती वाङमय कोश असे अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. याशिवाय ४८ मासिके, १० दैनिके येथे वाचनासाठी उपलब्ध आहेत.

उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार
ग्रंथालयाच्या पूर्वीच्या ग्रंथपाल सुचिता मुळे आणि शुभदा कोपरकर यांनी ४० वर्षे या ग्रंथालयात आपली जबाबदारी सांभाळली. त्यापैकी सुचिता मुळे यांना उत्कृष्ट ग्रंथपालाचा पुरस्कार देण्यात आला होता. सध्या अनुराधा साठे या ग्रंथालयाची अध्यक्षपदाची भूमिका सांभाळत आहेत. ग्रंथालयातर्फे काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी मान्यवरांची व्याख्याने, लहान मुलांसाठी काही स्पर्धा आयोजित केल्या जातात. ग्रंथालयातर्फे दरवर्षी उत्साहात साजरा होणारा कार्यक्रम म्हणजे नवरात्रोत्सव. या कार्यक्रमात मान्यवर लेखकांना आमंत्रित करून व्याख्यान आयोजित केले जाते. स्मिता तळवलकर, रमेश देव, आसावरी जोशी, मंगला गोडबोले, सुषमा देशपांडे, यशवंत देव, डॉ. विजया वाड, विश्वास पाटील अशा काही मान्यवरांनी या निमित्ताने ग्रंथालयाला भेट दिली आहे.
शारदा सार्वजनिक वाचनालय,
पत्ता- राजमाता जिजाबाई ट्रस्ट, अष्टविनायक चौकाजवळ
ठाणे (पूर्व).
वेळ – सकाळी ९ ते १२.३०,
संध्याकाळी ५ ते ८.३