News Flash

तन्वी हर्बल आयुर्वेदिक औषधांची सात्त्विक मात्रा

मानवी जीवनाचे आरोग्य राखण्यात आधुनिक वैद्यक शास्त्राचे फार मोठे योगदान आहे

तन्वी हर्बल

मानवी जीवनाचे आरोग्य राखण्यात आधुनिक वैद्यक शास्त्राचे फार मोठे योगदान आहे, ते मान्य करावेच लागेल. मात्र त्या बरोबरीनेच पारंपरिक वनौषधींची उपयुक्तताही कालबाह्य़ झालेली नाही. पूर्वी घरोघरी सर्वसाधारणपणे भेडसावणाऱ्या आजारांवर आजीच्या बटव्यात साधी, सोपी औषधे असत. हळद, सुंठ, चंदन, तुळस, शतावरी आदींचे गुणधर्म परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत होते. आयुर्वेदात त्यांचे सविस्तर वर्णन आहे. अनुभवी वैद्य केवळ नाडीपरीक्षा करून वात, पित्त अथवा कफ प्रवृत्तीच्या रुग्णांना भेडसाविणाऱ्या समस्यांवर उपाय सांगत. आता कोणत्याही मोठय़ा आजारात तात्काळ उपायांसाठी अ‍ॅलोपॅथीला पर्याय नसला तरी कोणताही आजार होऊ न देणारे आरोग्यपूर्ण जीवन राखण्यात वनौषधी उपकारक ठरत असल्याचे अनुभवावरून दिसून आले आहे. त्यामुळे अगदी आधुनिक काळातही ही औषधे सहजपणे वापरली जातात. पूर्वी साधारणपणे आयुर्वेदिक औषध म्हटले की काढे, अर्क, चूर्ण आदी प्रकार डोळ्यासमोर येत. अशी औषधे गुणकारी असली तरी तोंडाची चव जात असल्याने तसेच पोटात मळमळत असल्याने अनेकजण ते घेण्याचे टाळत असत. गेल्या काही वर्षांत मात्र या औषधांमध्येही आमूलाग्र बदल होऊ लागला आहे. आपला मूळ गुणधर्म कायम ठेवत आधुनिक टॅबलेट रूप धारण केले आहे. प्रमाणीकरणाचा अभाव आणि मतभिन्नता हे दोन मुख्य दोष दूर सारत रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे. अन्न व औषध विभागाच्या सर्व कसोटय़ा उत्तीर्ण होऊन बाजारात उपलब्ध असलेल्या अशा प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांपैकी एक म्हणजे तन्वी शता. औषधी वनस्पतीच्या उपयुक्त अंगाचे एक दशांश इतके अर्क काढून त्यापासून ‘तन्वी’ने पावडर, गोळ्या (टॅबलेट), लेप, तेल आणि द्रवरूप स्वरूपातील औषधे बाजारात उपलब्ध करून दिली.
निसर्गोपचारतज्ज्ञ मेधा मेहेंदळे यांनी १९८८ मध्ये ठाण्यात वनौषधींपासून निरनिराळी औषधे बनविण्यात सुरुवात केली. ती सर्व औषधे ‘तन्वी’ या नावाने त्या रुग्णांना देऊ लागल्या. सर्वसाधारणपणे विविध आजारांवर जशी आधुनिक वैद्यकशास्त्रात निरनिराळी औषधे उपलब्ध असतात, त्याच पद्धतीने रक्तदाबापासून मधुमेहापर्यंत ते अंगदुखीपासून कापण्या-भाजण्यापर्यंतच्या आजारांवर ३० ते ३५ प्रकारची औषधे ‘तन्वी’ने उपलब्ध करून दिली आहेत. औषधांच्या या मात्रेला त्यांनी ‘सत्त्व’ असे नाव दिले. अनेकदा अशा प्रकारची औषधे त्या त्या शहराव्यतिरिक्त अन्य ठिकाणी मिळत नाहीत. तन्वीने मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर केंद्र उभारून इच्छुक रुग्णांना विनासायास औषधे मिळण्याची व्यवस्था केली आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रातील औषधांचे उपायांच्या जोडीनेच होणारे अपाय (साइड इफेक्ट्स्) लक्षात आल्यानंतर आयुर्वेदिक उपचारांचा वापर वाढू लागला. नेमक्या त्याच काळात ‘तन्वी’ने संशोधनाची जोड देत वनस्पतींपासून बनविलेली निरनिराळी औषधे बाजारात आणली. बरेच डॉक्टर त्यांचे उपचार सुरू करण्यापूर्वी पूर्वीची औषधे बंद करण्याचा सल्ला देतात. मेधा मेहेंदळे मात्र आधुनिक वैद्यकशास्त्राचा आदर राखत त्यासोबत हे आयुर्वेदिक औषधही वापरून पाहा, असा सल्ला रुग्णांना देऊ लागल्या. ‘तपासणी विनामूल्य फक्त औषधांचे पैसे’ हे तन्वीचे सुरुवातीपासूनचे सूत्र आजही कायम आहे.

राज्यभरात केंद्र
हळूहळू रुग्णांचा विश्वास वाढत गेल्याने ‘तन्वी’चे नाव सर्वदूर झाले. डोंबिवली येथील कारखान्यात तन्वीची सर्व प्रकारच्या औषधांची निर्मिती होते. ठाण्यात घंटाळी येथे तन्वीचे मुख्य केंद्र आहे. याशिवाय दादर, मुलुंड, अंधेरी, डोंबिवली, कल्याण, नेरूळ, चिपळुण, पुणे, कोल्हापूर, नाशिक, बीड, लातूर, सोलापूर, नगर, इंदापूर, रत्नागिरी, नागपूर इ. १५० ठिकाणी ‘तन्वी’ची केंद्रे आहेत. या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टर्स रुग्णांना तपासून गरजेनुसार तन्वीचे नैसर्गिक औषध उपचार सुचवितात. परदेशात जाणाऱ्या भारतीयांनी तन्वीची औषधेही तिकडे नेली. गेली काही वर्षे दुबई फेस्टिव्हलमध्ये ‘तन्वी’चा स्टॉल लागतो. त्यामुळे जगभरात आयुर्वेदिक औषधे वितरित होत आहेत. मेधा मेहेंदळे यांची दुसरी पिढी आता या आरोग्य सेवेच्या व्यवसायात आहे. डॉ. ऋचा पै आणि डॉ. मानसी धामणकर या त्यांच्या दोन्ही मुली सध्या ‘तन्वी’चा कारभार पाहतात. आता ‘तन्वी हर्बल’ची औषधे संकेतस्थळाद्वारे ऑनलाइनही मागविता येतात. त्याचप्रमाणे औषधांविषयी माहिती देणारे तन्वी अ‍ॅपही विकसित करण्यात आले आहे. लवकरच औषधांप्रमाणे तन्वीतर्फे श्ॉम्पूही बाजारात आणला जाणार आहे. गेल्या २५ वर्षांच्या ‘तन्वी हर्बल’च्या वाटचालीत मेधा मेहेंदळे यांना प्रियदर्शनी, उद्योगश्री, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा उद्योजिका आदी पुरस्कार मिळाले आहेत.

– प्रशांत मोरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 12:11 am

Web Title: article on tanvi herbal shop
Next Stories
1 राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंगमध्ये बदलापूरच्या नितीन कुडाळकर यांना सुवर्ण
2 ‘थर्टी फर्स्ट’च्या करमणूक कार्यक्रमांनाही परवाना सक्ती
3 मनमोहक ठाणे खाडी!
Just Now!
X