मा. हेलन केलर ‘माझी कहाणी’ या आपल्या आत्मचरित्रात म्हणतात, ‘मनात प्रकट झालेली कुठलीही भावना, विचार आणि दृष्टीने पाहिलेला, स्पर्शाने अनुभवलेला, नाकाला जाणवणारा कुठलाही अनुभव, वाचेअभावी प्रगट करण्यास असमर्थ ठरल्यानंतर मनाचा किती कोंडमारा होत असेल याची कल्पना सर्वसाधारण व्यक्तीला येणारच नाही’. शब्द हे स्वत:ला व्यक्त करण्याचं माध्यम किती प्रभावी आहे आपण सर्वजण जाणतो, पण जे निशब्द जगात वावरतात त्यांच्या जगण्याची, पदोपदी कराव्या लागणाऱ्या संघर्षांची, मानसिक कोंडमाऱ्याची, जगापासून काहीसे तुटल्यासारख्या जाणिवेची आपण खरंच कल्पना करू शकत नाही. आणि म्हणूनच विशेष गरजा असलेल्या कर्णबधिर मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या गरजा ओळखून शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण देणे गरजेचे असते. या पाश्र्वभूमीवर जव्हेरी ठाणावाला कर्णबधिर विद्यालय (जयंतीलाल ठाणावाला शिक्षण संस्था संचालित) शाळेचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरते.

१९४८ साली पाच मुलांना घेऊन द. वि. वेलणकर यांनी सामाजिक कार्याच्या भावनेने ही शाळा सुरू केली. १९५० साली शाळेची नोंदणी झाली. सध्या या शाळेचा पट ६४ आहे. शाळेत आठ विशेष शिक्षक, तीन कलाशिक्षक, एक मुख्याध्यापिका, एक सामाजिक कार्यकर्ता आणि कर्मचारी वर्ग आहे. ६६ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेली ठाणे जिल्ह्य़ातली पहिली शाळा म्हणून ही शाळा विशेषत्वाने ओळखली जाते.
सर्वसामान्य व्यक्ती अगदी जन्मल्यापासूनच सतत वेगवेगळे आवाज ऐकत असतात. त्यांच्याशी तेव्हापासूनच सतत संवाद साधला जातो. त्यामुळे असंख्य आवाजांबरोबर शब्दही कानावर पडत असतात. मात्र जन्मताच कर्णबधिर असणाऱ्या मुलांना आजूबाजूचा आवाज ऐकू येत नसल्याने त्यांना भाषाच अवगत नसते. परिणामी, त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणूनच अशा मुलांना विशेष शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेणे त्यांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते.
कर्णबधिर मुलांच्या सर्वागीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ही शाळा पाच तपांहून अधिक काळ कार्यरत आहे. अपंगांच्या शिक्षणासाठी साहाय्य करणारे आधुनिक तंत्रज्ञान, बौद्धिक शिक्षणाबरोबर विविध कौशल्यांचा समावेश करून शाळेतर्फे विद्यार्थ्यांना सक्षम करण्यास प्राधान्य दिले जाते.

सरकारतर्फे एकात्म शिक्षण योजनेंतर्गत समाजातील कर्णबधिर, मतिमंद, अंध इ. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवाहातील शिक्षणव्यवस्थेमध्ये एकत्रित करण्यास प्राधान्य दिले जाते. ठाणावाला शाळेतर्फे ज्या विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक आहे, पालक जागरूक आणि मेहनती आहेत, अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ करून दिला जातो. या योजनेंतर्गत शाळेचे काही विद्यार्थी ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालय, मो.ह. विद्यालय, सरस्वती मराठी शाळा इ. शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.
जव्हेरी ठाणावाला शाळा जरी इ. ७वीपर्यंत असली तरी विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेस बसवले जाते. पण तत्पूर्वी दोन वर्षे त्यांची तयारी शाळेतर्फे करून घेतली जाते. सर्वसाधारणपणे कर्णबधिर विद्यार्थ्यांना गृहशास्त्र, शरीरशास्त्र (विज्ञान १ आणि २ ऐवजी), ७वीचे अंकगणित, टायपिंग, चित्रकला, हस्तकला, मराठी वाचनपाठ इ. विषय असतात. यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर सामान्य गणित विषय १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला आहे.

या विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण अनुभव देण्याच्या उद्देशाने शाळा प्रयत्नशील असते. दोन वर्षे इ. पाचवी ते सातवीच्या निवडक विद्यार्थ्यांना अ‍ॅनिमेशनचे प्रशिक्षण दिले जात आहे. पाचवी ते सातवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना अ‍ॅबॅकसचे मार्गदर्शन दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये यश प्राप्त केले आहे. या वर्षीपासून कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. महापालिकेच्या सौजन्याने शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना तरण तलावावर पोहण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. १९८५ पासून हा उपक्रम राबवला जात आहे. फोटो सर्कल सोसायटीतर्फे शाळेच्या १५ विद्यार्थ्यांना फोटोग्राफीचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, आत्मविश्वास प्राप्त व्हावा, आत्मनिर्भर होता यावे म्हणून शाळा सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबीरही घेतले जाते.
शाळेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना स्वरसंरक्षणविषयक माहिती व्हावी आणि जागृती निर्माण व्हावी म्हणून कार्यशाळेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमधील जागृतीबरोबरच समाजातील विविध घटकांत जनजागृती व्हावी म्हणून ही शाळा विशेषत्वाने प्रयत्नशील असते हे आवर्जून नमूद करण्याजोगे. महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या संमतीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळेचे शिक्षक मार्गदर्शन करतात. यावर्षी ८ ते १० शाळांमध्ये अशा कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या आहेत. जव्हेरी ठाणावाला शाळेतर्फे भुवनेश्वर येथे एनसीईडीतर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेत अशा तक्त्यांचे २५० ते ३०० जणांना वाटप करण्यात आले. देशाच्या इशान्येकडील भागातील राज्यांमधील विद्यार्थी (सर्व प्रकारचे अपंग) विशेष शाळांचा आणि त्यातील शिक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्या भागातील शिक्षक ,समाजसेवकांनी या बद्दल शाळेचे आभार मानले आहेत. सामाजिक बांधीलकीच्या उद्देशाने ही शाळा सुरू झाली आणि आजही ते व्रत जोपासत आहे हे विशेष!
कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाचे व्यापक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना सतत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन, नियमित सराव, चिकाटी, जिद्द आणि अखंड परिश्रम अशा प्रकारे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. जव्हेरी ठाणावाला शाळा त्यादृष्टीने जागरूकपणे व्रतस्थ वाटचाल करीत आहे. मूकं करोति वाचालम्.. या श्लोकात ईश्वराची कृपा असेल तर मुकाही बोलू शकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. आज शाळा आणि पालक यांच्या अथक प्रयत्नांमधून ते साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शिक्षणाची कार्यपद्धती!
या शाळेत इतर विषयांबरोबर मुलांना बोलणेही शिकवले जाते आणि त्यासाठी शिक्षक विशेष मेहनत घेतात. स्पीच ट्रेनरच्या मदतीने त्यांच्या उर्वरित श्रवणशक्तीचा फायदा घेऊन बोलण्याचे शिक्षण टप्प्याटप्प्याने दिले जाते. बोलण्यातील चढउतार, जोर यांचे वाचनात उपयोग करून मुलांच्या बोलण्यातील उच्चार दुरुस्ती केली जाते. या सगळ्या प्रयत्नांमधून मुलांना बोलण्यास प्रवृत्त केले जाते. हे सर्व प्रशिक्षण साऊंडप्रूफ वर्गाच्या अभावी नेहमीच्या वर्गातच घेतले जात असे. अशा तऱ्हेच्या विशेष कक्षाचे शाळेचे स्वप्न मार्चमध्ये पूर्ण झाले. समाजकल्याण कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अनुदानाच्या मदतीने वातानुकूलित वाचा श्रवण कक्ष शाळेत तयार झाला आहे.