ठाणे तसेच मीरा-भाईंदर या दोन्ही शहरांत सीएनजी इंधनावर चालणाऱ्या शेअर रिक्षांच्या प्रवासी भाडय़ात वाढ करण्याचा निर्णय ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला असून या निर्णयामुळे प्रवाशांना आता शेअर भाडय़ापोटी एक रुपया ६६ पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. तसेच या दोन्ही शहरांतील शेअर रिक्षांचे सुधारित दरपत्रक प्रादेशिक परिवहन विभागाने गुरुवारी जाहीर केले.

मीटर रिक्षांच्या प्रवासी भाडेवाढीपाठोपाठ आता शहरातील शेअर रिक्षांच्या दरातही वाढ करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यास ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने नुकतीच मान्यता दिली असून शहरातील वेगवेगळ्या मार्गावरील शेअर रिक्षांच्या दराचे सुधारित पत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार रेल्वे स्थानक ते वर्तकनगर या मार्गाकरिता ११ रुपये, ठाणे रेल्वे स्थानक ते वसंत विहार या मार्गाकरिता २९ रुपये, ठाणे रेल्वे स्थानक ते लोकपूरम या मार्गाकरिता ३५ रुपये, गावदेवी ते किसननगर या मार्गाकरिता २१ रुपये, गावदेवी ते लोकमान्यनगर या मार्गाकरिता २७ रुपये, सिडको ते कळवा नाका या मार्गाकरिता ११ रुपये, ठाणे स्थानक ते वृंदावन या मार्गाकरिता २० रुपये, माजिवडा ते मॉडेला चेकनाका या मार्गाकरिता २९ रुपये आणि कापूरबावडी ते ओवळा गाव या मार्गाकरिता ४२ रुपये असे दर असतील.