ज्येष्ठ हिंदी कवी रामावतार त्यागी यांची ‘मेरी थकन उतर जाती है’ ही कविता काही वर्षांपूर्वी शालेय अभ्यासक्रमात होती. या कवितेत कवीने

‘खाली पात्र किसिका अपनी प्यास बुझाकर

भर देनेसे मैने अक्सर यह देखा है

मेरी घागर भर जाती है’ असे नमूद केले आहे. या काव्यपंक्ती आपल्या जीवनात प्रत्यक्षात आचरणात आणणारे आणि वयाच्या ८३व्या वर्षांतही तरुणाला लाजवेल अशा उत्साहात काम करणारे बोरिवली येथील बाळकृष्ण भागवत आजच्या ‘सेकंड इनिंग’चे मानकरी आहेत. ‘बाळासाहेब भागवत’ किंवा ‘भागवत सर’ म्हणून ते अधिक परिचित आहेत. विविध विषयांवर व्याख्याने, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसाठी या वयातही फिरून आर्थिक मदत गोळा करणे आणि ‘देहदान’ या विषयाचा प्रचार-प्रसार आदी कामे करणारे भागवत सर खऱ्या अर्थी ‘निरलस सेवाव्रती’ आहेत.

भागवत यांचे वडील वासुदेव भागवत तेव्हाच्या ‘जीआयपी’ रेल्वेत नोकरीला होते. भागवत यांचे प्राथमिक शिक्षण नवी दिल्ली येथे झाले. पुढे वडिलांची मुंबईत/ ठाण्याला बदली झाल्यानंतर (१९४१) मॅट्रीकपर्यंतचे त्यांचे शिक्षण ठाण्याच्या मो. ह. विद्यालयात झाले. मुंबई विद्यापीठातून १९७३ मध्ये ते दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून हिंदी विषय घेऊन ‘बी.ए.’ आणि नंतर उल्हासनगरच्या आर.के.टी. महाविद्यालयातून हिंदी विषय घेऊन ‘एम.ए.’ झाले. सुरुवातीची काही वर्षे मो. ह. विद्यालयातच हिंदी विषयाचे शिक्षक म्हणून नंतर १९५९ ते १९८९ या कालावधीत त्यांनी मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली. नोकरी करत असतानाच नोकरी सांभाळून विविध सामाजिक संस्थांसाठी त्यांचे काम सुरू होते. नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आपली ‘सेकंड इनिंग’ पूर्णपणे सामाजिक कामासाठी दिली. सामाजिक सेवेचा हा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार घेऊन एक स्वयंसेवक म्हणून सेवाव्रताचा हा वसा पुढे सुरू  ठेवला असल्याचे भागवत आवर्जून सांगतात.

निवृत्तीनंतर आपण काय करू शकतो याचा विचार नोकरी/ व्यवसाय करत असतानाच प्रत्येकाने करावा आणि निवृत्त झाल्यानंतर आपला किमान काही वेळ समाजासाठी/ सामाजिक कामासाठी द्यावा. आपली आवड, शिक्षण, नोकरी-व्यवसायातील अनुभव आणि आपले ज्या विषयात प्रावीण्य आहे त्याचा विचार करून समाजाला आपण काय देऊ शकतो, हे प्रत्येकाने मनाशी ठरवावे, असे त्यांचे सांगणे आहे आणि भागवत यांनी ‘आधी केले मग सांगितले’ या वृत्तीने आपले काम अव्याहतपणे सुरू ठेवले आहे.

‘आम्ही धर्मनिष्ठ की विज्ञाननिष्ठ’, ‘वाचन आणि व्यक्तिमत्त्व विकास’, वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी महापुरुषांची चरित्रे, ‘कालिदास दर्शन’ या आणि अशा अन्य सुमारे ३५ विविध विषयांवर ते व्याख्याने देतात. व्याख्यानांसाठी जेथून बोलविणे येईल तिकडे ते जातात. अमुकच रक्कम मानधन म्हणून हवी असा त्यांचा आग्रह नसतो. आयोजक संस्था देतील ते मानधन अशा प्रकारे ते ही व्याख्याने देतात. नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यापासून विविध सामाजिक संस्थांसाठी ते आर्थिक निधी संकलनाचे काम करत आहेत. गेल्या काही वर्षांत विविध संस्थांनी त्यांनी आजवर लाखो रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आणि ती देताना आजवर कोणत्याही संस्थेसाठी खर्चाचे कोणतेही ‘व्हाऊचर’ कधीही जोडलेले नाही. विलास चाफेकर यांच्या ‘वंचित विकास’ संस्थेसाठी त्यांनी गेल्या सव्वा वर्षांत २ लाख रुपये तर सह्य़ाद्री आदिवासी बहुविध सेवा संघासाठी गेल्या चार महिन्यांत ६५ हजार  रुपये मिळवून दिले आहेत. बोरिवली येथील उमा पारकर त्यांच्या पतीच्या स्मरणार्थ गेली आठ वर्षे नियमितपणे दर महिन्याला सुरुवातीला ५०० रुपये आणि आता एक हजार रुपये भागवत यांच्याकडे देत आहेत. ही रक्कम भागवत त्यांच्या संमतीने वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना सुपूर्द करतात. भागवत यांच्याकडे दिलेले पैसे योग्य संस्थेकडेच जातील आणि आपले दान सत्पात्रीच राहील, असा विश्वास भागवत यांनी आपल्या कामातून निर्माण केला आहे.

डोंबिवलीच्या ‘दधिची देहदान मंडळ’ संस्थेसाठी ते गेली १३ वर्षे पालघर ते गिरगाव या पश्चिम रेल्वे क्षेत्रासाठी प्रचार-प्रसाराचे काम करत आहेत. ‘देहदान’ विषयावर ते व्याख्यानेही देत असतात. त्यांनी गेल्या काही वर्षांत वैयक्तिक कामातून सव्वाचारशे लोकांकडून देहदानाचे अर्ज भरून घेतले आहेत. रेल चाइल्ड संस्था, राष्ट्रीय शिक्षण संस्था येथे पदाधिकारी, विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या ‘रामायण’ परीक्षेसाठी मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. अंदमान-निकोबारचे माजी राज्यपाल आणि माजी खासदार दिवंगत प्रा. राम कापसे यांच्या खासदारकीच्या काळात (१९९०) त्यांनी रामभाऊंसाठी हिंदी शिक्षक म्हणूनही एक वर्षभर काम केले. त्यासाठी ते दिल्ली येथे राहिले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बिगर राजकीय भाषणांच्या ‘राजनिती के उसपार’ या पुस्तकासाठी वाजपेयी यांची ध्वनिमुद्रित भाषणे ऐकून त्यांचे शब्दांकन करण्याचे तसेच अरविंद मुळगावकर यांच्या ‘तबला’ या मराठी पुस्तकाच्या हिंदी अनुवादाचे कामही त्यांनी केले आहे. हिंदी विषयासाठीही त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले आहे.

पत्नी सुनंदा, विवेक, लता, महेश ही मुले, सुना, जावई, नाती, नातजावई आणि पतवंड असा त्यांचा परिवार. ‘आमच्या वडिलांनी स्थावर-जंगम मालमत्ता ठेवली नसल्याची कोणतीही खंत नाही. वडिलांनी माणसे जोडायला शिकविले आणि आजवरच्या आयुष्यात मी अक्षरश: हजारो माणसे जोडली आहेत. ही माणसेच माझी आयुष्यभराची कमाई आहे. मी नोकरीतून निवृत्त आहे, सेवानिवृत्त झालेलो नाही आणि होणारही नाही. शेवटच्या श्वासापर्यंत काम आणि काम करत राहणार, हेच माझ्या आयुष्याचे सूत्र असल्याचेही भागवत यांनी सांगितले.