News Flash

नालासोपाऱ्यात कडकडीत बंद

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला नालासोपाऱ्यात चांगला प्रतिसाद मिळाला.

मराठा आंदोलकांनी नालासोपाऱ्यात पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील वाहतूक रोखून धरली. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक ठिकाणी आंदोलकांनी वाहनांचे टायर जाळून वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला.

आंदोलकांनी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर वाहतूक रोखली; दुकाने, बाजारपेठा, रिक्षासेवेवर परिणाम

वसई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला नालासोपाऱ्यात चांगला प्रतिसाद मिळाला. नालासोपारा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. उग्र आंदोलन झाल्याने शहरातील रिक्षा वाहतूक आणि बाजारपेठा दिवसभर बंद होत्या.

नालासोपाऱ्यात सकाळपासूनच आंदोलनाला सुरुवात झाली. दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती. आंदोलकांनी नालासोपारा पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर आंदोलन करून वाहतूक रोखून धरली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चंदननाका येथे सकाळी आंदोलकांनी टायर जाळून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. बंदची हाक देत आंदोलक शहरभर फिरत होते. त्यामुळे दुकाने, बाजारपेठा बंद होत्या. रिक्षा वाहतूक सकाळी सुरू होती. मात्र आंदोलन उग्र झाल्यानंतर रिक्षाही बंद करण्यात आल्या.

आंदोलनामुळे नुकसान होऊ नये यासाठी महापालिका परिवहननेही त्यांच्या बसगाडय़ांची वाहतूक बंद ठेवली होती. बस बंद असल्याने  अनेक नागरिकांना चालत घर आणि कार्यालय गाठावे लागले.

नेते गेले, कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी

नालासोपाऱ्यात सकाळपासूनच आंदोलन पेटले होते. नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत आंदोलन सुरू होते. श्रीपस्थ आणि नालासोपारा उड्डाणपुलावर आंदोलन करून नेते निघून गेले. मात्र नंतर कार्यकर्ते ठाम मांडून बसले होते. ‘आम्हाला आरक्षण द्या. त्यासाठी आम्ही हटणार नाही,’ असे ते सांगत होते. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. कार्यकत्रे आणि पोलिसांची बाचाबाची होत होती. एकाने थेट उड्डाणपुलावरून उडी मारण्याची धमकी दिल्याने पोलिसांचा नाइलाज झाला.

विद्यार्थी, पालकांचे हाल

नालासोपारा शहरात सकाळी नियमितपणे शाळा भरल्या होत्या. मात्र आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केल्यानंतर शाळा सोडण्यात आल्या. आपल्या मुलांना घेण्यासाठी पालक शाळेत आले. बस बंद असल्याने पालक खासगी वाहनाने शाळेत आले. परंतु आंदोलनामुळे ते वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांसह चालत घर गाठले. मात्र आंदोलक शाळेच्या बस आणि शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना सोडत होते.

परप्रांतीयांची घुसखोरी

नालासोपारा उड्डाणपुलावर आंदोलकांनी वाहतूक रोखून धरली होती. पोलीस आंदोलकांची मनधरणी करत होते. मात्र कुणीच ऐकायला तयार नव्हते. काही जण प्रक्षोभक वक्तव्य करत होते. त्यापैकी दोघांचा पोलिसांना संशय आला. त्यापैकी एकाला पोलिसांनी नाव विचारले तर त्याने आपले नाव चौहान असल्याचे सांगितले. त्याला अन्य कुणी ओळखत नव्हते. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याचे नाव शिवम पांडे असल्याचे समजले. तो आपल्या साथीदारासह आंदोलकांमध्ये शिरून वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी दोघांना हुसकावून लावले. त्यांच्यावर नंतर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

वसईत प्रतिसाद नाही ! बाजारपेठा, रस्ते वाहतूक सुरळीत

वसई : मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला वसई आणि विरार या शहरांत फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नालासोपाऱ्यात जरी कडकडीत बंद असला तरी वसई आणि विरारमध्ये दुपापर्यंत जनजीवन सर्वसामान्य होते. दुकाने, बाजारपेठा सुरू होत्या. रस्ते वाहतूकही सुरळीत सुरू होती.

दुपारनंतर वसईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काही वेळ रास्ता रोको झाला. नालासोपारा येथील आंदोलन आटपून आंदोलक वसईत आले आणि त्यांनी आंबेडकर चौकात रास्ता रोको करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही वेळ वाहतूक बंद होती. मात्र लागलीच ती सुरळीत झाली. विरारमध्येही दुपारनंतर आंदोलक बंदचे आवाहन करत रस्त्यांवरून फिरत होते. मात्र त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. वसईतील चिचंपाडा औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्यांवर दगडफेक करण्यात आली. मात्र दगडफेक करणाऱ्यांशी आमचा काही संबंध नाही, असे मराठा नेत्यांनी स्पष्ट केले.

मीरा-भाईंदरमध्ये संमिश्र प्रतिसाद

भाईंदर : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मीरा-भाईंदरमध्ये बुधवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. भाईंदर पश्चिम येथे कार्यकर्त्यांनी वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी त्यांची समजूत घातली. मीरा रोडच्या इंद्रलोक, रामदेव पार्क, हटकेश तसेच महामार्ग परिसरात पेणकर पाडा आणि सृष्टी भागातील काही परिसर बंद करण्यात आला होता.

दुपारी बारानंतर कार्यकर्ते ठिकठिकाणी फिरून बंद करण्याचे आवाहन करू लागले. त्यामुळे भाईंदर पूर्व भागातील गोडदेव नाका, नवघर आदी भागांतील दुकाने बंद करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी भाईंदर पश्चिम भागात मोर्चा वळवला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भाईंदर पश्चिम भागातील दुकानेही बंद करण्यात आली. मात्र रिक्षा तसेच शाळा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. उड्डाणपुलावरील वाहतूकही बंद करण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केल्याने काही काळासाठी ही वाहतूक विस्कळीत झाली होती.

ठाण्यात हिंसक आंदोलन

ठाणे : मराठा आरक्षण व महा नोकरभरती रद्द करण्याच्या मागणीसह राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी मराठा संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या बंदमुळे ठाणेकरांची चहुबाजूंनी कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. ‘बंद शांततेत करू’ असे सांगणाऱ्या मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सकाळी दहानंतर ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि अन्य शहरांत रस्त्यांवर उतरून हिंसक आंदोलन सुरू केले. ठाणे स्थानकात जाऊन रेल्वेसेवा बंद पाडण्याबरोबरच सार्वजनिक बससेवा आणि रिक्षांनाही आंदोलकांनी लक्ष्य केले. तसेच पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग आणि घोडबंदर येथील मुख्य मार्गही आंदोलकांनी रोखून धरल्याने ठाण्याचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. बेबंद झालेल्या आंदोलकांनी पोलिसांनाही न जुमानता केलेल्या मोडतोडीमुळे बुधवारी दिवसभर शहरात दहशतीचे वातावरण होते.

मराठा संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी सकाळी शहरातील व्यवहार सावधपणेच सुरू होते. बंद शांततेत पार पडेल, असे वाटत असतानाच सकाळी दहानंतर ठाण्यातील चौकाचौकांत मराठा आंदोलकांचे जथ्थे जमण्यास सुरुवात झाली. हातात भगवे झेंडे घेत आणि राज्य सरकारविरोधात घोषणा देत रस्त्यांवर उतरलेल्या तरुण आंदोलकांनी हिंसक पवित्रा घेतला. मुंबई-नाशिक महामार्गाजवळील नितीन कंपनीजवळील उड्डाणपुलाजवळ आंदोलकांनी रास्ता रोको केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवरील वाहतूकही बंद पाडण्यात आली. तब्बल चार तास हा महामार्ग बंद असल्यामुळे या मार्गावरील वाहनांच्या रांगा काही किलोमीटर लांब पोहोचल्या होत्या. अत्यावश्यक सेवा आणि शाळांना बंदमधून वगळण्यात आल्याने अनेक ठिकाणी शाळांचे सकाळचे सत्र भरले. मात्र, बंदने हिंसक वळण घेताच शाळा सोडून देण्यात आल्या. त्यामुळे कोंडीत अडकलेल्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या शाळाबसही होत्या. पोलिसांनी आंदोलकांची मनधरणी करत त्यांना महामार्ग मोकळा करण्याची विनंती केली. मात्र, त्यानंतरही आंदोलक बधेनासे झाल्याने पोलिसांनी बळजबरीने कार्यकर्त्यांना हटवण्यास सुरुवात केली. मात्र, त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. चवताळलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली तसेच वाहनांचेही नुकसान केले. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडून आणि लाठीहल्ला करत आंदोलकांना हुसकावले. मात्र, त्यानंतरही महामार्गावरील कोंडी कायम होती.

वागळे इस्टेट, माजिवडा, नितीन कंपनी, तीन हात नाका या महत्त्वाच्या चौकात आंदोलकांनी घेराव घातल्याने सकाळी कार्यालयात निघणाऱ्या प्रवाशांची कोंडी झाली होती. महामार्गावरील वाहतूक अडवण्यासाठी रस्त्यातच बेस्ट, टीएमटी बस रोको करण्यात आला होता.

रिक्षा गायब, बसची मोडतोड

आंदोलनाची तीव्रता पाहिल्यावर शहरातील रिक्षा आणि टॅक्सीचालक संघटनेनेही रिक्षा रस्त्यावर वाहतुकीसाठी आणल्या नाहीत. रेल्वेस्थानकाच्या दिशेने जाणारे मार्गही आंदोलकांनी अडवून धरल्याने सकाळी ११ नंतर कामावर जाण्यासाठी निघालेल्यांचे प्रचंड हाल झाले. त्यातच सार्वजनिक परिवहन उपक्रमांच्या बसगाडय़ांवरही आंदोलकांनी दगडफेक केली. त्यामुळे ही बससेवाही काळी काळ बंद ठेवण्यात आली होती.

अन्नपाण्यावाचून हाल

आंदोलकांच्या रास्तारोकोमुळे शेकडो सर्वसामान्य प्रवासी चार तासांहून अधिक काळ आपल्या वाहनांमध्ये अडकून पडले. काही प्रवाशांनी महामार्गालगतच्या परिसरातील दुकानांत जाऊन खाद्यपदार्थासाठी शोधाशोध केली. मात्र, तेथेही सर्व दुकाने बंद होती. अनेक प्रवासी महामार्गालगतच्या इमारतींतील घरांमधून पाण्याची मागणी करताना दिसत होते. काही ठिकाणी वेगवेगळय़ा वाहनांतील प्रवासी, चालक आपल्याजवळील खाद्यपदार्थ, पाणी यांचे इतरांना वाटप करतानाही आढळून आले. शहरातील किराणा माल दुकानदार, हॉटेल व्यवसायिकांनीही दुकाने बंद ठेवली. स्विगी आणि झोमॅटोसारखी खाद्यपदार्थ घरपोच करणारी अ‍ॅप्सही प्रतिसाद देत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांचा उपवास घडल्याच्या प्रतिक्रिया येत होत्या. यावेळी अत्यावश्यक सेवा असलेले दवाखाने आणि औषधांची दुकाने मात्र सुरू ठेवण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 1:38 am

Web Title: bandh called by maratha community get good response in nalasopara
Next Stories
1 वयोवृद्ध महिलेला फसवून साडेतीन लाखांची लूट
2 खारफुटी रोपणासाठी मुंबई पालिकेला २४ हेक्टर जमीन
3 जोगिंदर राणा खोटय़ा चकमकीत ठार
Just Now!
X